श्रीमहाराज अनंत प्रकारे मला मदत करीत आहेतच. नामाच्या रूपाने, बोधाच्या रूपाने, प्रत्यक्ष कृतीतूनही! पण मीसुद्धा स्वतला मदत करण्याची गरज आहे. ही मदत म्हणजे त्यांच्या मदतीच्या आड न येणे! त्यांच्या बोधानुरूप आचरणाचा प्रामाणिक प्रयत्न करणे. जर मी ही मदत स्वतला केली तर ती देवाचीच सेवा होईल. आता देवाची सेवा म्हणजे काय? एखाद्याचा भार हलका करणे, एखाद्याचे परिश्रम कमी करणे, एखाद्याला साह्य़भूत होणे याला आपण सेवा म्हणतो. परमात्मा अर्थात श्रीसद्गुरू काय करीत आहेत? ते या जगाचा पसारा आवरत आहेत. जगाचा पसारा म्हणजे काय? जगात दृश्याचा किती तरी पसारा आपण पाहतो आहोत, अनुभवतो आहोत. माणसाचा जसजसा बौद्धिक, मानसिक, शारीरिक विकास होत गेला तसतसं त्याचं जग अंतर्मुख होण्याऐवजी अधिकाधिक बहिर्मुख होत गेलं. त्यातून किती तरी साधनं निर्माण झाली. एकेकाळी केवळ घोडय़ावरून प्रवास करणाऱ्या माणसानं नंतर घोडागाडी, बैलगाडी, मोटारगाडी, बस, आगगाडी, विमान, नौका अशी प्रवासाची कित्येक साधनं निर्माण केली. वाहतुकीच्या क्षेत्राप्रमाणेच आहार, विहार, वस्त्रप्रावरणं, मनोरंजन, संपर्क अशा प्रत्येक क्षेत्रात माणसानं आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर किती तरी पालट घडवला आहे. तेव्हा आदिम काळातील माणसाच्या जगण्यापेक्षा आजच्या जगातील माणसाच्या जगण्यात दृश्याचा पसारा मोठा आहेच, यात शंका नाही. आता दृश्यात जेवढा पसारा आहे त्यापेक्षा किती तरी मोठा पसारा अदृश्यात असतो. प्रत्येक शोध हा आधी मनात जन्म घेतो आणि नंतर तो प्रत्यक्षात उतरतो. पुन्हा मनातला पसारा हा जे प्रत्यक्षात येईल त्याच्यापुरताच नसतो. जे प्रत्यक्षात येऊ शकत नाही त्याचीही ओढ मनात असते आणि त्याबाबतच्या कल्पनांचा, विचारांचा, भावनांचा पसाराही मनात असतोच. दृश्यातला पसारा दिसतो आणि जाणवतो म्हणून तो मोठा वाटतो. अदृश्यातला पसारा दिसत नाही आणि जाणवतोच असंही नाही म्हणून तो लक्षातही येत नाही. प्रत्यक्षात दृश्यापेक्षा अदृश्यातलाच पसारा फार मोठा असतो. तो आवरता आवरत नाही. तोच पसारा माणसाला वारंवार जन्म-मृत्यूच्या खेळात खेचून आणतो! दृश्यातल्या पसाऱ्यात मन गुंतले नसेल तर तो किंचितही बाधत नाही. अदृश्यातला पसारा हा मनाच्याच ओढीनं वाढत असल्याने तो बाधक आणि घातक असतोच. श्रीसद्गुरू हा अदृश्य पसारा आवरायलाच अग्रक्रम देतात आणि त्यायोगे जगाचा पसारा आवरू लागतात. कसा आवरला जातो हा पसारा? ‘हा प्रपंच आजवर तुम्ही स्वतचा मानून करीत होतात तो आता रामाचा म्हणून करा,’ असं सद्गुरू सांगतात तेव्हा हा मनातला पसारा कमी करण्याचीच सुरुवात असते. लगेच काही कोणी आपला प्रपंच हा रामाचा मानू लागत नाही. सुखाचे प्रसंग येतात तेव्हा हर्षवायूगत वेडावलेल्या जिवाला रामाची आठवणसुद्धा येत नाही. संकट आलं की, रामा तुझाच हा प्रपंच आहे ना? मग का धाव घेत नाहीस, अशी आर्त आळवणी सुरू होते. कुठून आणि कसा का होईना, प्रपंच रामाचा असल्याचा उच्चार तर होतो!

Story img Loader