बाहेर जो पसारा दिसतो त्याचा उगम माझ्या मनात असतो आणि बाहेर दिसणाऱ्या पसाऱ्यापेक्षा किती तरी मोठा पसारा आतमध्ये असतो. तो पसारा आवरण्याचं काम श्रीसद्गुरू करीत आहेत. बाहेरच्या पसाऱ्याला हात न लावता म्हणजेच प्रपंचाला विरोध न करता ते आतला पसारा आवरत आहेत, म्हणजेच प्रपंचातील आसक्तीतून मला सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. नि:स्वार्थी होण्याचा अभ्यास आणि भगवंताचं अखंड अनुसंधान राखण्याचा अभ्यास हा तो पसारा आवरण्यासाठी साह्य़कारीच आहे. त्यामुळे मी ते करणं म्हणजे एक प्रकारे परमात्म्याचाच भार कमी करणं आहे. ही त्याचीच सेवा आहे. ही चर्चा सुरू झाली ती पैशाच्या मुद्दय़ापासून. पैसा अर्थात भौतिक संपदा ही दृश्यात जितकी मी कमावली आहे त्यापेक्षा कित्येक पटीने ती कमवण्याच्या इच्छेचा पसारा माझ्या अंतरंगात आहे. त्या पैशाचा आधार कायमचा टिकावा म्हणून मी पैशासाठी अधीर असतो. मग तो पैसा मला कायमचा धीर कसा देणार? श्रीमहाराजांचं वाक्य आहे, प्रपंचात पैशाइतकीच धीराची गरज आहे! तेव्हा पैसा गरजेचा आहे, आवश्यक आहे. साधकानं स्वबळावर आणि कुणाचंही मिंधे न होता साधनारत आयुष्य घालवता यावं यासाठी स्वत:ला आवश्यक इतका पैसा कष्टानं कमावलाच पाहिजे आणि वाचवलाही पाहिजे. त्या पैशात अडकू मात्र नये. त्या पैशानेच धीर येईल, असे मानू मात्र नये. हा धीर श्रीमहाराजांच्या बोधाच्याच आधाराने येईल. त्यांचंच होऊन जगण्यानं येईल. श्रीमहाराजांच्या बोधाच्या आधारे आता आपण हा धीर कमावण्याचा प्रयत्न करणार आहोत. माणसाचा धीर कशा-कशामुळे खचतो? तो भीतीमुळे खचतो, काळजीमुळे खचतो, दु:खामुळे खचतो, प्रारब्धभोगांमुळे खचतो. माझ्याच वाटय़ाला इतकं दु:ख का? प्रारब्धाचे तडाखे माझ्याच वाटय़ाला इतके का? असे प्रश्नही आपल्या मनात उद्भवतात. या प्रश्नांचं निराकरण आणि भीती, काळजी, दु:ख, संकट याबाबत श्रीमहाराजांच्या बोधातून होणारा मानसोपचार आपण आता जाणून घेणार आहोत. श्रीमहाराजांचा सारा बोध म्हणजे मानसशास्त्रच आहे हो! भौतिक संकटं, प्रतिकूलता यामुळे आपण भांबावून जातो. कित्येकदा संकट लहान असलं तरी कल्पनेनं भरकटत आपण इतकी भीती उत्पन्न करतो की ते संकट कित्येकपटीनं मोठं आणि भयप्रद भासू लागतं. नकारात्मक आणि निराशाजनकच विचार उसळू लागतात आणि मनावर ताबा मिळवतात. अशा मनाला श्रीमहाराज धीर देतात आणि सांगतात, ‘‘आधी शक्ती येते मग भोग येतो. म्हणूनच सहन होते. असह्य़ होते तेव्हा ते सांगायला माणूस शिल्लक राहातच नाही!’’ (बोधवचने, क्र. ८३१). जीवनात काहीजण खरोखर संकटांची मालिकाच झेलत असतात. कुणी अगदी जवळची माणसं गमावल्याचं दु:खं भोगत असतात, कुणी परिस्थिती दिवसागणिक प्रतिकूल होत असल्याचं संकट भोगत असतात. पण हे संकट माझ्याच कर्मयोगानं माझ्या वाटय़ाला जसं येत असतं तसंच त्याला तोंड देण्याची शक्तीही भगवंताकडून येत असते. ती शक्ती असते म्हणून तर भोग भोगता येतो, असं श्रीमहाराज सांगतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा