श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला’’ (चरित्रातील काळजीविषयक बोधवचने, क्र. ३२). माणूस सूक्ष्म सद्बुद्धीच्या प्रेरणेने विचार करतो तेव्हा कल्पनाशक्तीच्या जोरावर तो अचूक निर्णयही घेऊ शकतो. त्या निर्णयाच्या आधारावर तो योग्य कृतीही करतो. त्यामुळे योग्य कृतीला वाव देणारा जो विचार आहे, ज्या कल्पना आहेत त्यांच्यासाठी गेलेला वेळ अनाठायी नसतो. आपण स्थूल देहबुद्धीच्या ओढीनुसार विचार करतो तेव्हा अनेकदा विचारांच्या जागी अविचार, कुविचार प्रकटतात. त्यांना कल्पनाशक्तीची जोड मिळाली की योग्य निर्णयाऐवजी सारा ओघ काळजीकडेच वाहू लागतो. त्या काळजीनं नको नको त्या कल्पना थैमान घालू लागतात आणि त्या कल्पनांमुळे मग काळजीही अधिकच वाढू लागते. काळजी आणि कल्पनांच्या झंझावातात भांबावलेला माणूस कोणत्याही ठोस निर्णयापर्यंत पोहोचूच शकत नाही. निर्णयच होत नाही तेव्हा ठोस कृतीही होऊ शकत नाही. कल्पना आणि काळजीत भरपूर वेळ जाऊनही जर योग्य आणि आवश्यक कृती योग्य निर्णयाअभावी घडत नसेल तर तो वेळ वायाच गेला. श्रीनामदेव महाराजांचा अभंग आहे- ‘‘जळीं बुडबुडे देखतां देखतां। क्षण न लागता दिसेनाती।। तैसा हा संसार पाहतां पाहतां। अंत:काळी हाता काय नाही।। गारुडय़ाचा खेळ दिसे क्षणभर। तैसा हा संसार दिसे खरा।। नामा म्हणे येथे काही नसे बरे। क्षणाचे हे सर्व खरे आहे।।’’ आपला जीवनप्रवाह कसा आहे? प्रत्येक क्षण उत्पन्न होतो आणि काळाच्या प्रवाहात क्षणार्धात लुप्त होतो. तरी तो प्रत्येक क्षण मला कृतीची संधी देतो. किंबहुना, मी कृती करो, वा न करो, प्रत्येक क्षणात माझ्या देह, मन, चित्त, बुद्धीद्वारेसुद्धा कृती घडतच असते. आपण श्वासोच्छवास करतो, तीसुद्धा कृतीच आहे. आपण विचार करतो तीसुद्धा कृतीच आहे. आपण मनन करतो, तीसुद्धा कृतीच आहे. आपण चिंतन करतो, तीसुद्धा कृतीच आहे. एवढंच कशाला? काहीही न करता शांत बसणे, हीसुद्धा कृतीच आहे! तेव्हा जाणता असो वा अजाणता, प्रत्येक क्षणात माझ्याकडून कृती होतच असते. बरं, कोणतीही कृती निष्फळ नसते. त्या कृतीचे परिणाम होतातच. कधी ते लगेच होतील, कधी नंतर होतील. उदाहरणार्थ, मला तहान लागली आणि मी पाणी पिण्याची कृती केली, तर त्याचं फळ म्हणजे तहान भागणं हे लगेच दिसून येईल. कधी मी परीक्षा दिली, पण त्यामुळे मिळणारे गुण, हा त्या कृतीचा परिणाम ठरावीक कालावधीनंतर दिसून येईल. काही कृती अशा असतात की ज्यांचे फळ मिळण्यायोग्य परिस्थिती निर्माण व्हायलाही प्रदीर्घ कालावधी लागतो आणि त्यामुळेच त्यांचे फळ मिळायलाही प्रदीर्घ अवधी लागतो. हा अवधी काही जन्मांचाही असू शकतो. त्यामुळेच कमी प्रयत्नांत जेव्हा मोठे यश मिळते किंवा जन्मत:च अनेक सुखसोयी मिळतात, त्या आपल्या कोणत्या जन्मांतील कोणत्या कृतीचे फळ आहेत, हे सांगता येत नाही. स्थूल कृतींना जसा हा फलयोग लागू आहे, तसाच सूक्ष्म कृतींनाही तो आहेच!

Story img Loader