माझ्या जीवनात प्रत्येक गोष्ट क्षणभंगुर आहे. म्हणजेच कोणत्या क्षणी कोणती गोष्ट नष्ट होईल, हे सांगता येत नाही. इतकंच कशाला, या माझ्या जीवनाचा जो केंद्रबिंदू ‘मी’ आहे, त्याचं हे जीवनही कोणत्या क्षणी नष्ट होईल, याचाही काही भरवसा नाही. मग जीवनातला प्रत्येक क्षण असा अनमोल असताना मी त्याचं महत्त्व जाणतो का? नाही! उलट माझा प्रत्येक चालू क्षण हा बहुतेक वेळा अनवधानानेच सरत असतो. माझ्या आंतरिक आवेगांना अनुसरून प्रत्येक क्षणात माझ्याकडून प्रतिक्रिया उमटते वा कृती घडत असते. त्यात अवधान नसतं. विचाराची जोड नसते. आर्थिक-सामाजिक-बौद्धिकदृष्टय़ा (दुसऱ्याचं मोठेपण जोखायचा आपला क्रम असाच आहे!) आपल्यापेक्षा जो कोणी ‘मोठा’ असेल तर त्याच्याशी वागताना मात्र आपलं अवधान जागृत असतं. अर्थात स्वत:चं नुकसान होऊ नये आणि आपल्याविषयी त्याची प्रतिक्रिया चांगली असावी, एवढय़ाच प्रेरणेतून आपण त्या वेळी सावधान (स+अवधान) असतो. अन्य वेळेस आपण आपल्याकडून होणाऱ्या कृतीबाबत, प्रतिक्रियेबाबत जागरूक नसतो. प्रत्येक क्षणात आपल्याकडून होणाऱ्या कृतीबाबत जसे आपण जागरूक नसतो त्याचप्रमाणे त्या क्षणाच्या माहात्म्याबाबतही आपण जागरूक नसतो. आपण जाणतोच की, गेलेला कोणताही क्षण परत मिळवता येत नाही, तरी तो क्षण जात असताना आपण गाफील असतो. ‘त्या वेळी असं वागायला हवं होतं,’ असं नंतर कितीही वाटलं तरी तो गेलेला क्षण पुन्हा मिळवून झालेली चूक सुधारता येत नाही. उलट पूर्वीच्या क्षणांच्या अशा रुखरुखीमध्ये येणारा क्षणही निसटून जात असतो. निसटून गेलेल्या क्षणांमध्ये जे घडून गेलं ते बदलता येत नाही, याची काळजी आणि उद्याच्या क्षणांमध्ये काय घडेल, याची काळजी करताना या क्षणी जे घडत आहे, त्याकडे माझं लक्षच नसतं. आत्ताचा क्षण जेव्हा निसटून जाईल, भूतकाळात जमा होईल तेव्हा माझं त्याकडे लक्ष जाईल! अगदी याचप्रमाणे कोणतेही कर्म करताना प्रथम भविष्यकाळाची चिंता असते म्हणजेच जे कर्म करीत आहोत, त्याचं चांगलं फळ मिळेल ना, ही काळजी असते आणि कर्म झाल्यावर फळ मिळालं की हेच का फळ मिळालं, म्हणूनही मन खंतावतं आणि काळजी लागते. श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘आपले कसे होते ते नीट पहावे. कर्माच्या सुरुवातीला काळजी लागते. कर्म करीत असताना ‘काय होतेय कुणास ठाऊक,’ म्हणूनही काळजी लागते आणि कर्म झाल्यावर शेवटी, ‘अरे, हेच का फळ मिळाले!’ म्हणून काळजी लागते. याप्रमाणे मनुष्याला सुखसमाधान केव्हाच मिळत नाही’’(चरित्रातील काळजीविषयक बोधवचने, क्र. २२). तेव्हा कालच्या आणि उद्याच्या काळजीत माझा आत्ताचा प्रत्येक क्षण सरत असल्यामुळे माझ्या सूक्ष्म वासनात्मक देहावर त्या काळजीचाच ठसा पक्का होत जातो. श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘उद्याच्या काळजीने आजची भाकरी आपल्याला गोड लागत नाही’’(चरित्रातील काळजीविषयक बोधवचने, क्र. १९).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा