प्रपंचातली माझीच भूमिका अशी प्रत्येक टप्प्यावर बदलत असली तरी दुसऱ्यांच्या वागण्याबोलण्यातला बदल आपल्याला रुचत नाही. दुसऱ्यानं माझ्या मनासारखं वागावं, हाच आपला हट्टाग्रह असतो. पण अनिश्चितता हेच प्रपंचाचं रूप असल्यानं माझ्या मनानुसार गोष्टी घडतातच असं नाही. बरं प्रपंचात कितीही अनिश्चितता असली तरी तो आपल्याला सोडवत नाही, हे मात्र निश्चित! श्रीमहाराज म्हणाले, एका गावात चोरांची एकदा सभा भरली. त्यात काही चोर म्हणाले, लूट करताना प्रसंगी कुणाची हत्या करावी लागली तरी काही हरकत नाही. काही चोर म्हणाले, कुणालाही उगीच मारणं बरं नाही, नुसतीच लूट करावी. थोडक्यात लूट कशी करावी, याबाबत त्यांच्यात मतभेद होते पण लूट करावी, याबद्दल कुणाचंच दुमत नव्हतं! तसं काहीजण म्हणतात, प्रपंच व्यवहाराला धरून करावा तर काही म्हणतात, प्रसंगी दुसऱ्याची पर्वा न करता आपला स्वार्थ साधून  प्रपंच करावा. थोडक्यात प्रपंच कसा करावा, याबाबत मतमतांतरे आहेत पण तो करावाच, याबद्दल दुमत नाही. बरं जे वरकरणी प्रपंचाचा त्याग करतात त्यांच्याही चित्तातला प्रपंच कणभरही कमी होत नाही. लोकांना भक्तीमार्गावर वळवण्याच्या नावाखाली अधिक भ्रामक आणि व्यापक असा प्रपंच उभा ठाकतो. तेव्हा प्रपंच कुणालाच सुटत नाही आणि तो सोडण्याची गरजही नाही. हा प्रपंच अनिश्चित आहे. तो आनंदाचा होईल, याची काही हमी नाही, हे मात्र खरे. पण तरीही त्या प्रपंचातला मी आनंद भोगू शकेन, अशी श्रीमहाराजांची ग्वाही आहे. त्या आनंदाचा आधार प्रपंच नसला तरी प्रपंचात राहूनही तो आधार मिळवता मात्र येईल. तो आधार आहे भगवंताचा! आणि इथेच खरी गोम आहे. प्रपंच अस्थिर, अनिश्चित असूनही त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. जगात जे काही सुख मिळायचं ते प्रपंचातूनच मिळेल, ही आपली श्रद्धा आहे. भगवंतावर आपला तेवढा दृढ विश्वास नाही. भगवंत आहेच, अशी आपली पक्की धारणा नाही. त्यामुळे आपल्या जगण्याचा आधार प्रपंच असतो, भगवंत नव्हे. श्रीमहाराज सांगतात- ‘देव आहे’ असे खऱ्या अर्थाने समजून वागणारे जगामध्ये थोडे! (चरित्रातील बोधवचने/ पृ. ४५७) आपण ‘देव आहे’ असं तोंडानं म्हणतो मात्र तो आहे या भावनेनं वावरत नाही. देवाच्या तसबिरींसमोरही भ्रष्टाचार, अनाचार चालतोच कारण त्या तसबिरी मांडणाऱ्यांचा देव तसबिरीपुरताच असतो. तसबिरीबाहेर पडणारा देव कुणाला झेपेल? जो साधनपथावर पाऊल ठेवू इच्छितो, जो थोडाफार अंतर्मुख होऊन विचार करू लागतो त्यालाही ही बाब डाचतेच. मग ज्याच्या अस्तित्वाची आपल्याला पक्की खात्री नाही, ज्याच्या अस्तित्वाचा आपल्याला ठोस अनुभव नाही त्याचा आधार तरी कसा घ्यावा? त्या आधाराचा उपाय सांगताना श्रीमहाराजांनी आपल्यासारख्यांना म्हणूनच भस्मासुराची उपमा दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा