भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव नाही आणि त्यामुळे त्याचे आणि त्याच्या भक्तीचे मोलही उमगत नाही. भगवंत म्हणजे नेमके काय, हे ‘देव आहे’, असं मानणाऱ्या आपल्यालाही ठामपणे सांगता येत नाही. एवढं मोठं जग आहे तर ते चालवणारा कुणीतरी असलाच पाहिजे, कोणती तरी शक्ती असलीच पाहिजे, तोच परमात्मा, अशी काहीशी कल्पना असते. कुणी एखाद्या इष्ट देवतेचे रूप डोळ्यांसमोर ठेवतात आणि त्याच परमात्म्याची भक्ती करतात. या सर्व कल्पना आणि विचारांत गैर काहीच नाही. जो तो आपापल्या परीने परमेश्वराच्याच स्मरणाचा प्रयत्न करीत असतो आणि कोणताही प्रयत्न हा क्षुद्र किंवा हीन नसतो. साक्षात भगवंतानेदेखील प्रत्येकासाठी ही पूर्ण मोकळीक दिली आहे. गीतेत श्रीकृष्ण सांगतात, ‘येऽप्यन्य देवताभक्ता यजन्ते श्रद्धयान्विता:। तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्।।’ (अध्याय ९ श्लोक २३). जे कोणी अन्य देवतांचीही श्रद्धापूर्वक भक्ती करतात, हे अर्जुना त्यांची भक्ती मलाच प्राप्त होते! कोणत्याही धर्माचा, कोणत्याही विचारांचा, परमात्म्याला सगुणरूपात कल्पिणारा अथवा निर्गुणरूपात कल्पिणारा; असा कुणीही जी भक्ती करतो ती एकाच ईश्वरापर्यंत पोहोचते. तेव्हा परमात्मा आणि त्याची भक्ती याबाबत ठोस आकलन नसले तरीही आपण जी काही तोडकीमोडकी भक्ती करतो, तीदेखील त्या परमात्म्याचीच होते. आता आपण निव्वळ प्रपंच करीत असताना जी भक्ती करतो ती सकाम असते. काहीतरी हेतूने आपण भक्ती करीत असतो. जीवनातील कोणत्या तरी अडचणीवर उपाय म्हणून आपण ठरावीक व्रत करतो, ठरावीक स्तोत्रे वाचतो, ठरावीक उपासतापास करतो, ठरावीक वारी ठरावीक देवाच्या दर्शनाला जातो. अगदी काहीच कारण नसले तरी मनाला बरे वाटते म्हणूनही आपण जी भक्ती करतो, तिचा सुप्त हेतू भगवंताची कृपा आपल्यावर राहावी, हाच असतो. प्रपंचात अडीअडचणी न येणे किंवा आल्या तर त्या दूर होणे, ही आपल्या कृपेची मोजपट्टी असते. परमात्मा नेमका आहे कसा, हा विचार मनात येतोच असं नाही. त्याचा शोध घ्यावा, त्याचा साक्षात्कार करून घ्यावा, असं वाटतंच असंही नाही. आपण मानतो तोच देव आणि आपण करतो तीच भक्ती, असा आपला समज असतो. समर्थ रामदास सांगतात, ‘जया मानला देव तो पूजिताहे। परी देव शोधूनि कोण्ही न पाहे। जगीं पाहतां देव कोटय़ानुकोटी। जया मानली भक्ति जे तेचि मोठी।।’ (मनाचे श्लोक/ क्र. १७८). रामकृष्ण सांगायचे ना? आंब्याच्या बागेत आला तर बागेत किती झाडे आहेत, कोणत्या झाडाला किती किती फळे आहेत, हे मोजण्यातच वेळ गेला तर काय उपयोग? त्यापेक्षा बागेच्या मालकाची ओळख झाली असती तर किती लाभ झाला असता! अगदी तसंच जन्माला येऊन जगाचा विस्तार किती आहे, हे नुसतं शोधत राहाण्यापेक्षा हे जग ज्याचं आहे त्या परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतला तर किती लाभ होईल! हा विचार मनात येत नाही म्हणून ‘परी देव शोधूनि कोण्ही न पाहे!’
१३२. देवशोधन
भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव नाही आणि त्यामुळे त्याचे आणि त्याच्या भक्तीचे मोलही उमगत नाही. भगवंत म्हणजे नेमके काय, हे ‘देव आहे’, असं मानणाऱ्या आपल्यालाही ठामपणे सांगता येत नाही. एवढं मोठं जग आहे तर ते चालवणारा कुणीतरी असलाच पाहिजे, कोणती तरी शक्ती असलीच पाहिजे, तोच परमात्मा, अशी काहीशी कल्पना असते. कुणी एखाद्या इष्ट देवतेचे रूप डोळ्यांसमोर ठेवतात आणि त्याच परमात्म्याची भक्ती करतात. या सर्व कल्पना आणि विचारांत गैर काहीच नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-07-2013 at 12:04 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 132 quest for god