संतांच्या जीवनात निष्क्रियतेला थारा नाही, पण कर्तेपणाच्या भावनेलाही तिथे कणमात्र जागा नाही. ‘अवध भूषण रामायणा’च्या प्रारंभी सद्गुरूंना वंदन करताना त्यांना ‘सततं कीर्तिरूद्योगी’ म्हटलं आहे. म्हणजे सतत उद्योगमग्न असतात अशी ज्यांची कीर्ती आहे! जिवांना परमात्मभावाने भरून टाकण्याचा उद्योग अखंड करीत असूनही कर्तेपणाचा भाव त्यांच्याजवळ फिरकण्याचं धाडसदेखील करीत नाही. ‘अनंत आठवणीतले अनंत निवास’ या ग्रंथात वसंत र. देसाई यांनी ‘आमचे आप्पा स्वामी स्वरूपानंद’ हा लेख लिहिला आहे. स्वामींनी ज्ञानेश्वरी अभंग छंदात सुगम मराठीत आणली. त्यांचं हे कार्य अतिशय व्यापक आणि विलक्षणही आहे. मात्र या कार्याबाबत स्वामींच्या मनात लेशमात्र कर्तेपणा कसा नव्हता, हे देसाई यांनी सांगितले आहे. ते लिहितात- ‘‘अभंग ज्ञानेश्वरी लिहिताना दररोज दहा ओव्यांवरील अभंगचरण लिहावयाचे असे त्यांनी ठरविले होते. दिवसभरात कधी सकाळी तर कधी दुपारी अगर रात्री ते लिहीत असत. त्यामध्ये त्यांच्या मातोश्री वैकुंठवासी झाल्या त्या दिवशी खंड पडला असता. परंतु त्या दिवशीदेखील त्यांनी सकाळीच लेखन केले असल्याने त्यात खंड पडला नाही. आजारपण आले तरी अव्याहतपणे हे कार्य सुरू राहिले. मध्यंतरी एक अतिशय विद्वान व ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक पावसला स्वामींच्या दर्शनाला आले होते. दर्शन घेतल्यानंतर स्वामींच्या जवळ बोलताना अभंग ज्ञानेश्वरीमध्ये काही ओव्या कमी आहेत व काही जास्तीच्या ओव्यांचा उल्लेख दिसत आहे तरी दुरुस्त करावयाचे का, असे त्यांनी विचारले. त्यावर स्वामींनी अतिशय नम्रपणे सांगितले की, ‘ज्या ओव्या राहिल्या व ज्या ओव्या जास्त झाल्या ही परमेश्वराचीच इच्छा’ व तो विषय तिथेच थांबविला’’ (पृ. ४६). तर, गेल्या चार ओव्यांत बोधाचा एकच अनुक्रम आहे. हा बोध असा की, पंचमहाभुतांनी घडलेल्या, पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं या आधारे या जगात वावरत असलेल्या हे जिवा तुझ्या वाटय़ाला जो एकमेव दुर्लभ असा मनुष्यजन्म आला आहे तो माझ्या सेवेसाठीच आहे, असं मान (तें विहित कर्म पांडवा। आपुला अनन्य वोलावा। आणि हे चि परम सेवा। मज सर्वात्मकाची।।). निष्काम भावानं कर्म साधली तर त्या कर्मकुसुमांनीच माझी पूजा साधेल. या पूजेनंच तू भवसागरातून पार होशील आणि मुक्तीचा अपार आनंद भोगशील (तया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्मकुसुमांची वीरा। पूजा केली होय अपारा। तोषालागी।।). भगवद्भावानं व्याप्त कर्मेच निष्काम होतील. म्हणून कर्माच्या सुरुवातीला, ती कर्मे होत असताना आणि ती झाल्यावर भगवद्भाव राख. त्या कर्मावर माझ्याच भावनेची मोहोर उमटवून ती मलाच अर्पण कर. (तें क्रियाजात आघवें। जें जैसें निपजेल स्वभावें। तें भावना करोनि करावें। माझिया मोहरा।।) तसेच ही कर्मे माझ्यामुळेच झाली, असा भाव मनात आणून अभिमानाला बळी पडू नकोस (आणि हें कर्म मी कर्ता। कां आचरेन या अर्था। ऐसा अभिमान झणें चित्ता। रिगों देसी।।). आता आसक्ती त्यागानंतर भोगाची पूर्ण मुभा देणाऱ्या पुढील विलक्षण ओवीकडे वळू.
१३८. अकर्ता
संतांच्या जीवनात निष्क्रियतेला थारा नाही, पण कर्तेपणाच्या भावनेलाही तिथे कणमात्र जागा नाही. ‘अवध भूषण रामायणा’च्या प्रारंभी सद्गुरूंना वंदन करताना त्यांना ‘सततं कीर्तिरूद्योगी’ म्हटलं आहे.
आणखी वाचा
First published on: 16-07-2014 at 12:35 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 138 distroyer