संसाराचा परीघ जरी द्वैतानं आणि द्वंद्वानं व्यापला असला तरी त्याचा केंद्रबिंदू केवळ सद्गुरूबोध असल्यानं चित्तात संसारदु:खच प्रवेश करीत नाही इतकी प्रसन्नता भक्तामध्ये असते. याचं कारण सद्गुरूमयतेचा योग त्यानं साधला असतो. इथे पुन्हा ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ३९व्या ओवीपासून आपण नव्यानं सुरुवात करू. पाण्यात सूर मारून बाहेर पडल्यावर त्याच पाण्यात पुन्हा सूर मारला तरी त्याचा अनुभव जसा वेगळाच असतो, तसं हे आहे! ही ओवी काय होती? तर, अर्जुना समत्व चित्ताचें। तें चि सार जाण योगाचें। जेथ मन आणि बुद्धीचें। ऐक्य आथी।।  चित्ताचं समत्व हेच योगाचं सार आहे आणि हा योग साधल्यावर कशी स्थिती होते ते पुढील तीन ओव्यांत मांडलं आहे. आता योग म्हणजे काय? पतंजलि मुनींनी योगसूत्रे लिहिली आणि दुसऱ्याच सूत्रात ‘योगा’ची व्याख्या केली की, ‘योगश्चित्तवृत्तिनिरोध:।’ चित्तात क्षणोक्षणी उठणाऱ्या वृत्तींचा निरोध, त्या वृत्तींची गती रोधित करणं, त्या वृत्तीचं शमन करणं म्हणजे योग. आता या वृत्ती कुठे उत्पन्न होतात? त्या अंत:करणात उत्पन्न होतात. या वृत्ती कशा उत्पन्न होतात? तर बाह्य़ जगाचा जो काही ठसा अंतरंगात उमटतो त्याला माझी जी प्रतिक्रिया असते तीच वृत्तीनुरूप असते. आता बाह्य़ जगाचा ठसा अंतरंगापर्यंत कसा पोहोचतो? तर माझी स्थूल इंद्रियं प्रथम ते काम करतात. डोळ्यांद्वारे जे ‘पाहिलं’ जातं, कानांद्वारे जे ‘ऐकलं’ जातं, त्वचेद्वारे जे ‘स्पर्शिलं’ जातं, याप्रमाणे प्रत्येक स्थूल, बाह्य़ इंद्रियांद्वारे ज्याचा ज्याचा ‘अनुभव’ घेतला जातो तो अनुभव घेतं ते मनच. बुद्धी त्या अनुभवाला कसा प्रतिसाद द्यायचा याचा निर्णय घेते आणि अहं त्यासाठीची शक्ती पुरवतो. स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे या प्रक्रियेत मनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बाह्य़ इंद्रियांद्वारे पाहणं, ऐकणं, बोलणं, स्पर्शिणं या क्रियांशी मन संलग्न असलं तरच ‘अनुभव’ घेतला जातो. समजा एखाद्यानं तुम्हाला अपशब्द वापरले, पण त्यावेळी तुमचं मन दुसऱ्याच विचारात गुंग होतं आणि कानांद्वारे ते शब्द ऐकण्याच्या क्रियेशी संलग्न नव्हतं, तर तुमच्या आतपर्यंत ते अपशब्द पोहोचतच नाहीत आणि अपमानाच्या भावनेनं मन प्रतिक्रिया देण्यासाठी सरसावतच नाही. तेव्हा मन कुठे संलग्न आहे, यावर अनुभवांना प्रतिक्रिया अवलंबून आहे. स्वामीजी सांगतात, ‘‘मन हे बाह्य़ वस्तूंचा ठसा किंवा संवेदना आत घेऊन जाऊन निश्चयात्मिका बुद्धीपर्यंत पोहोचविते. मग त्यावर बुद्धीची प्रतिक्रिया घडून येते. या प्रतिक्रियेबरोबरच ‘अहं’भाव अभिव्यक्त होतो आणि नंतर या क्रिया-प्रतिक्रियांचे संमिश्रण अंत:स्थ ‘पुरुषा’ला म्हणजेच खऱ्या आत्म्याला सादर केले जाते.. इंद्रिये (इंद्रियांतर्गत शक्ती), मन, निश्चयात्मिका बुद्धी व अहंकार या सर्वाना मिळून ‘अंत:करण’ म्हणतात. या सगळ्या म्हणजे चित्तात चालणाऱ्या निरनिराळ्या प्रक्रिया होत. चित्तात (या अनुभवांनुरूप) उठणाऱ्या विचार तरंगांनाच ‘वृत्ती’ (भोवरे) म्हणतात.’’(राजयोग, रामकृष्ण मठ प्रकाशन, १९८४/ पृ. १०८). चित्ताचं समत्व हेच योगाचं सार आहे, या अर्थाची उकल करण्यासाठी आपण हे सारं जाणून घेत आहोत!