इंग्रजीतील सुप्रसिद्ध कवी रॉबर्ट ब्राउनिंग यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षांची नुकतीच सांगता झाली. पण त्याची फारशी कुणी दखल घेतली नाही. रॉबर्टचा जन्म झाला तेव्हा सॅम्युअल कोलरिज, विल्यम वर्ड्सवर्थ हे इंग्लिश कवी चाळिशीत होते, पुढे इंग्लंडचा पोएट लॉरिएट (राजकवी) झालेला अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन तीन वर्षांचा होता; तर अभिजात कादंबरीकार मानला जाणारा चार्ल्स डिकन्स अवघा तीन महिन्यांचा होता.
थेम्स नदीच्या दक्षिणेला असलेल्या कॅम्बरवेल या गावी रॉबर्टचा ७ मे १८१२ रोजी जन्म झाला. त्याचे आई-वडील हे प्रॉटेस्टंटपंथीय डिसेंटर्स (नॉन कन्फर्मिस्ट) म्हणजेच पुराणमतवादी चर्चची धर्मावरील लुडबुड न मानणारे होते. डिसेंटर्स हे अल्पसंख्य असूनही त्यांच्यावर अनेक र्निबध लादले गेले होते. केंब्रिज व ऑक्सफर्ड या इंग्लंडच्या प्रख्यात विद्यापीठांमध्ये त्यांना प्रवेश मिळत नसे. विद्वत्तेची आवश्यकता असलेले व्यवसाय आणि आकर्षक पगाराच्या नोकऱ्यांपासून त्यांना वंचित राहावे लागे. परंतु त्यामुळेच त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे कायम राहिले, ते वैशिष्टय़पूर्ण झाले.
ब्राउनिंग कुटुंब मध्यमवर्गीय, परंतु समाधानी होते. त्यामुळे ब्राउनिंगचे बहुतेक शिक्षण घरीच झाले. रॉबर्टला अनवट पण दर्जेदार शिक्षण मिळाले. त्याला चित्रकला व संगीत या विषयांमध्येही रस होता. या दोन्ही कलांचे त्याने काही काळ रीतसर शिक्षणही घेतले होते. ‘ज्या वेळेस माझी समवयस्क मुले पाढे घोकत होती, त्या वेळेस मी संगीतशास्त्र आत्मसात करत होतो’, असे तो अभिमानाने म्हणे. चित्रकला व संगीत या दोन्ही विषयांचे प्रतिबिंब त्याच्या कवितेत पडले आहे.
रॉबर्टची अशी ठाम समजूत होती की, आपण अत्युच्च प्रतिभा असलेले कवी आहोत. पण त्याच्या सुरुवातीच्या काही कविता सर्वसामान्य रसिकांच्या डोक्यावरून जात. त्यामुळे त्याच्या काळात त्याचे फारच थोडय़ा जणांनी कौतुक केले. म्हणून उतारवयात रॉबर्ट म्हणत असे, ‘‘जेव्हा कविता लिहिली जाते, तेव्हा ती फक्त दोघांनाच कळू शकते; पहिला देव आणि दुसरा रॉबर्ट ब्राउनिंग.. आता मात्र एकटय़ा देवालाच ती कळू शकते.’’ त्याच्या ‘सॉर्डेलो’ या कवितेबद्दल टेनिसन म्हणाला होता की, ‘या कवितेची मला फक्त पहिली आणि शेवटची ओळ कळली.’ मात्र असे असले तरी या कवितेमुळे ‘ब्राउनिंग्ज’ ही स्वतंत्र शैली उदयाला आली.
‘पाऊलाइन – अ फ्रॅगमेंट ऑफ अ कन्फेशन’, ‘सोर्डेलो’, ‘बेल्स अँड पोमेग्रॅनाटस’, ‘मेन अँड वुमेन’, ‘द इन अल्बम’ असे तेवीस कवितासंग्रह रॉबर्टच्या नावावर आहेत. त्याच्या कविता हा जोशपूर्ण प्रतिमा आणि सृजनशीलतेचा आविष्कार आहे. विशेषत: त्याच्या ड्रॅमॅटिक मोनोलॉग्जनी (नाटय़मय स्वगत) इंग्रजी साहित्यात स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
रॉबर्टने ‘स्ट्रॅफोर्ड’ ही पाचअंकी शोकांतिका आणि इतर काही नाटकेही लिहिली आहेत, पण त्याला नाटककार म्हणून फारसं कुणी ओळखत नाही. पण नाटय़सदृश काव्य आणि स्वगत हे रॉबर्टच्या कवितेचे मूलाधार आहेत.
रॉबर्टचे इटलीवर उत्कट प्रेम होते. ‘इटली, माय इटली’ या त्याच्या कवितेतून त्याचे प्रत्यंतर येते. एलिझाबेथ बॅरेट या कवयित्रीवरही त्याने असेच उत्कट प्रेम केले. वयाच्या २७व्या वर्षी बॅरेटच्या कविता वाचून त्याने तिला पत्र लिहिले की, ‘आय लव्ह व्हर्सेस विथ ऑल माय हार्ट, डिअर मिस बॅरेट अँड आय लव्ह यू टू’. पण बॅरेट असाध्य रोगाने आजारी होती. त्यामुळे तिचे वडील तिला कुणालाही भेटू देत नसत. त्यामुळे रॉबर्ट-बॅरेट पत्रांद्वारे एकमेकांना भेटत. त्यातून त्यांचे प्रेम दृढ होत गेले. सरतेशेवटी सर्व अडथळ्यांवर मात करून, पळून जाऊन त्यांनी लग्न केले. आपल्या आवडत्या इटलीत हे कविदाम्पत्य स्थायिक झाले. या विवाहाची बातमी वर्ड्सवर्थला समजल्यावर तो म्हणाला, ‘वेल, आय होप दे मे अण्डरस्टँड इच अदर, नोबडी एल्स कुड!’ विवाहानंतर एलिझाबेथला नवी शक्ती मिळाल्यासारखे वाटले. त्यांना एक मुलगाही झाला. परंतु सुखाचे हे दिवस फार काळ टिकले नाहीत. एलिझाबेथचा आजार पुन्हा बळावला आणि त्यातच तिचे निधन झाले. एका अनोख्या प्रेमकथेचा अकाली अंत झाला.
पत्नीच्या निधनानंतर रॉबर्ट इंग्लंडला परत आला. त्यानंतर त्याने त्याची ‘द रिंग अँड द बुक’ ही प्रसिद्ध शोकात्म प्रेमकविता लिहिली. ही कविता १९६८ साली चार खंडांत प्रकाशित झाली. तीत दहा दीर्घ स्वगतं आहेत. त्यातलं मनोविश्लेषण अफलातून आहे.
रॉबर्टच्या ड्रॅमॅटिक मोनोलॉग्जनी आपल्या नाटय़छटाकार दिवाकरांना प्रेरणा दिली. त्यातून त्यांनी उत्कृष्ट नाटय़छटा लिहिल्या. मराठीमध्ये नाटय़छटा हा वाङ्मयप्रकार समर्थपणे हाताळला तो एकटय़ा दिवाकरांनीच. त्यानंतर कुणालाही लक्षणीय नाटय़छटा लिहिता आलेल्या नाहीत. रॉबर्टच्या ड्रॅमॅटिक मोनोलॉग्जचेही तसेच आहे. त्याच्यासारख्या कविता इंग्लंड आणि इंग्रजीत इतर कुणालाही लिहिता आल्या नाहीत. पण असे असले तरी रॉबर्टबाबत समीक्षकांची मते फारशी चांगली नव्हती. ‘रॉबर्ट हा कवी कुठे आहे?’ असा प्रश्न समीक्षकांकडून उपस्थित केला जाई. त्यावर रॉबर्ट शांतपणे म्हणे की, ‘मी? जर कवी नसेल तर, कविता इतरत्र कुठे सापडेल?’