गुराढोरांनी रोपटं फस्त करू नये, यासाठीच प्रथम कुंपणाची गरज असते. त्या रोपटय़ाचं वृक्षात रुपांतर झालं की कुंपणाची गरज उरत नाहीच. हे नियमांचं कुंपण आपल्यापुरतं असावं. त्याच्या जाहीर निविदा सूचना काढू नयेत! श्रीमहाराज सांगतात- ‘‘परमार्थ हा समजुतीचा आहे. उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही.. काही खेळ जसे एकटय़ाने खेळायचे असतात, तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे. तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे. खेळात काही बाह्य़ साधन तरी लागते, पण या अभ्यासात त्याचीही जरुरी नसते. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल, तितका आपल्याला फायदेशीर आहे.’’ तेव्हा नियमांचं कुंपण, नियमांची चौकट आपली आपल्यापुरती हवी. ती परमार्थ वाढविण्यासाठी आहे. जगाला दाखविण्यासाठी नाही. हे नियम कशासाठी करावे लागतात? स्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मिशन’च्या स्थापनेनंतर त्या मिशनच्या कार्यासाठी संन्याशांसाठी एक नियमावली तयार केली. ते नियम निश्चित करण्याआधी स्वामीजी म्हणाले, ‘‘हे नियम करण्याचं मूळ ध्येय काय आहे हे प्रथम आपण समजून घ्यायला हवं. आपलं मूळ उद्दिष्ट आहे सगळ्या नियमांच्या अतीत जाणं. म्हणजे नियम करण्याचा अर्थ काय, तर आपल्या स्वतमध्ये स्वभावतच अनेक कु-नियम आहेत, सु-नियमांच्या द्वारे ते कु-नियम दूर करायचे आणि शेवटी सगळ्या नियमांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. जसं काटय़ानं काटा काढला की शेवटी दोन्ही काटे फेकून द्यायचे असतात ना, तसं!’’ (स्वामीजींचे चरणाश्रित/ मूळ बंगालीवरुन अनुवाद शकुंतला पुंडे, पृ. ११) तेव्हा वृत्तीला वळण लावण्यासाठी नियम आवश्यक असतात. एकदा वृत्तीच ती झाली की नियमाची गरज उरत नाही. खोटेपणा दूर करण्यासाठी खरेपणाचा नियम करावा लागतो. एकदा वृत्तीतली खोट ओसरली की खरेपणा हा नियम रहात नाही. ती वृत्तीच होते. तेव्हा नियम हे परमार्थ जपण्यासाठी आहेत. एकदा परमार्थाचा कळस गाठला गेला की नियम कुठले? स्वामीजी ज्याला ‘शेवटी’ म्हणतात तिथेच श्रीमहाराजांचंही सूचन आहे की, ‘प्रेमाला नेमाची गरज लागत नाही’! भगवत्प्रेमाचा तो कळस गाठण्यासाठी सुरुवातीला नेम पाहिजे. तो नेम सांभाळण्यासाठी नियम पाहिजे. तो नियम प्रथम काही काळापुरता असतो, नियमाने वृत्तीच तशी घडावी, हा त्याचा हेतू असतो. तो हेतू विसरू नये. परमार्थात प्रत्येक पावलावर सावधानता लागते, असं सांगताना श्रीमहाराज त्याला शेतीची उपमा देतात. ते म्हणतात, ‘‘शेत वाढले तरी त्याचा नाश दोन कारणांनी होऊ शकतो. एक म्हणजे गुरेढोरे शेतात घुसून नाश करतील, किंवा दुसरे म्हणजे कीड पडून किंवा टोळधाडीसारखा काहीतरी उपद्रव होऊन शेत साफ नाहीसे होईल.’’ (२ मेच्या प्रवचनातून). आता ही गुरंढोरं आणि कीड व टोळधाड या उपमाही फार मार्मिक आहेत. गुराढोरांबद्दल आधीच आपण पाहिलं आहे पण या संदर्भात त्याची उजळणी करू.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा