माणूस म्हणून माझ्या ज्या भावनिक, शारीरिक, मानसिक गरजा असतात त्यांच्या सहजपूर्तीसाठी लग्नसंस्था आहे. त्याचबरोबर माणूस म्हणून मला घडविण्यातही प्रपंच हातभार लावत असतो. हा प्रपंच परमार्थरूपी शेताचं कुंपण आहे, असं श्रीमहाराज सांगतात. थोडं आणखी खोलवर जाऊ. श्रीमहाराज इथे प्रपंच न म्हणता संसार हा शब्द वापरतात. परमार्थरूपी शेताचं कुंपण हा संसार आहे. परमार्थ अदृश्य ठेवायला महाराज सांगतात आणि दृश्याचं कुंपण त्याला घालायला सांगतात! म्हणजे काय? तर वरकरणी जगात राहा, जगाचे राहा, पण आतून जगाशी नव्हे तर शाश्वताशी जोडले जा. जगातला आपला वावर हा कुंपण आहे. मी जगापासून फटकून राहिलो, दूर राहिलो तरी माझा परमार्थ उघड होईल आणि फस्तही होईल. तेव्हा जगात इतरांसारखेच राहा, पण तो वावर अंतर्यात्रा सुरक्षित राखण्यासाठी ठेवा. या घडीला हा खोल अर्थ जरा बाजूला ठेवू आणि लग्नप्रपंच या अर्थानेच विचार करू. तर लग्नप्रपंचात राहून मला परमार्थाची शेती करायची आहे. रक्षण त्या शेताचं करायचं आहे. प्रपंचातल्या वासना त्या शेतात घुसल्या तर त्या मला तेथून हुसकायच्या आहेत. मुलगा आजारी आहे आणि जपाला बसलोय तर आतून प्रार्थना सुरू होते, त्याला बरं करा.. मग हे शेतात घुसणारं ढोर लगेच दिसतं. त्याला हुसकावता येतं. की अरे, मी नाम यासाठी घेत नाही. हे सोपं नाही, पण निदान त्या ढोराची जाणीव तरी होते. इथेच महाराज एक धोक्याचा इशारा देऊन ठेवतात; तो असा की कुंपणालाच शेत खाऊ देऊ नका! शेताला खत घालायचं सोडून कुंपणालाच खत घालत राहू नका. म्हणजे परमार्थ सोडून प्रपंचाचीच काळजी करीत राहू नका. याचा अर्थ प्रपंच वाऱ्यावर सोडू नका, आणि तसाही आपण प्रपंच वाऱ्यावर सोडत नाहीच. आपण समर्थाचा दाखला देतो की तेच म्हणतात, ‘प्रपंच करावा नेटका’. पण हे त्यांनी कुणाला सांगितलं? जे नेटाने प्रपंचच करीत आहेत त्यांना सांगितलं की बाबांनो, नेटानं नव्हे नेटका प्रपंच करा. श्रीमहाराजांनीच एके ठिकाणी म्हंटलं आहे की प्रपंचासाठी तीन-चार तासही पुरेसे आहेत, पण जो हौसेनं करायला जाईल त्याला चोवीस तासही पुरणार नाहीत! तेव्हा चोवीस तास कुंपणाचाच सांभाळ करण्यात घालवू नका. त्यापुढे कीड आणि टोळधाडीचं रूपक महाराज वापरतात. कीड ही सहजी दिसत नाही. ती अगदी जवळ जाऊन पिकाची बारकाईनं पाहणी करून जाणवते. तशी आपली वृत्ती कुठे गुंतून किडत तर नाही ना, हे बारकाईने पाहावे. कारण परमार्थ हा वृत्तीचाच आहे. ती वृत्तीच जर दुनियादारीत गुंतत असली तर तिला कीड लागून ती अवघं शेतही फस्त करणार. ती कीड लागू नये यासाठी राख, शेण, औषध आहे. राख म्हणजे वैराग्य. आता वैराग्य फार मोठी गोष्ट झाली. जगापासून विरक्त होणं हीच राख आहे. जगाच्या व्यवहाराचा मनावर परिणाम न होऊ देणं, मनावर नकारात्मक ठसा उमटू न देणं ही राख आहे. शेण म्हणजे परमार्थ सांभाळताना लोकनिंदेची पर्वा न करणे आणि औषध म्हणजे अर्थात पथ्य व नामच. नामाची अखंड फवारणी वृत्तीला किडीपासून सांभाळेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा