हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या! प्रेमात मी मस्त झालो आहे, बुडून गेलो आहे आता मला होशियारी कुठली? जो प्रेमात आकंठ बुडाला आहे त्याला कसला होश असणार? जिथे प्रेम आहे तिथे होशियारी नाही. प्रेमाच्या जगातला हा पहिला, अखेरचा आणि एकमेव कायदा आहे. होशियारी म्हणजे चतुराई, भान, व्यावहारिक आडाख्यांनुसारचं आचरण, छक्केपंजे. आपलं प्रेम असं असतं का? गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ (अभंगानुवाद -ऋग्वेदी, प्रकाशक- व्ही. प्रभा आणि कंपनी, १९२८) मधील एका कवितेची पहिलीच ओळ आहे, ‘पूर्ण जे संसारी प्रेम दर्शवीति। ते मज बांधीति घोर पाशें।।’ या पूर्ण जगात प्रेम म्हणजे एकमेकांना घोर पाशात बांधून टाकणं एवढाच अर्थ आहे! याचं कारण आपण ‘प्रेम’ म्हणून जे काही करतो त्यात होशियारी असते! मोबदल्याकडे लक्ष ठेवूनच जगात प्रेमाचा बहुतांश व्यवहार चालतो. असं असूनही दुसऱ्याकडून मात्र माणसाला शुद्ध आणि निस्वार्थ प्रेमाचीच अपेक्षा असते. याचं एकमेव कारण असं की, माणूस हा प्रेमस्वरूप भगवंताचाच अंश आहे. त्या भगवंतापासून तो दुरावला आहे आणि त्यामुळे प्रेमासाठी तो तळमळत आहे. जगण्यातील प्रत्येक धडपडीत माणूस म्हणूनच प्रेम शोधण्याचा, प्रेम मिळवण्याचा आणि प्रेम टिकविण्याचाच प्रयत्न करतो. त्यासाठीच तो दुसऱ्यावर प्रेम ‘करतो’ आणि दुसऱ्याकडून प्रेमाची ‘परतफेड’ही अपेक्षितो! ‘मी इतरांसाठी आजवर इतकं केलं’, हा हिशेब बोलण्यात म्हणूनच डोकावतो. माणसाचं प्रेम स्थूल, स्वार्थप्रेरित असलं तरी ‘प्रेम’ हाच माणसाच्या जगण्याचा आधार असतो आणि प्रेमाच्या आशेवरच माणूस जगत असतो, यात शंका नाही. पू. बाबा बेलसरे एके ठिकाणी म्हणतात, ‘‘प्रेम करणे हा मानवी मनाचा सहजस्वभाव आहे. आईच्या पोटात असल्यापासून- म्हणजे जन्माला येण्याच्या आधीपासूनच माणसाचा जीव प्रेमावर पोसला जातो. शिवाय जन्मास आल्यानंतर तो प्रेमावरच जगतो. म्हणून प्रेम माणसाच्या हृदयापर्यंत खोल जाते. माणूस प्रेमाला भुलतो व प्रेमाने त्याचा जीव तृप्त होतो. त्या तृप्तीच्या ओढीने प्रत्येक माणूस कोणावर तरी प्रेम करतो आणि दुसऱ्याकडून प्रेमाची अपेक्षा करतो.  पण प्रत्यक्ष जीवनात असे आढळते की प्रत्येक माणूस कोणावर तरी आणि कशावर तरी प्रेम करतो. असे असून प्रेमापासून मिळणारे समाधान त्याच्या वाटय़ास येत नाही.’’ (भगवंताचे अनुसंधान, प्र. – त्रिदल, १९९३) हे समाधान माणसाला लाभत नाही याची अन्य कारणं बाबा देतात पण खरं प्रेमही माणूस करीत नाही, हेच खरं कारण आहे. स्वार्थप्रेरित हेतूने, व्यवहारी विचाराने दुसऱ्याशी प्रेमाच्या नावाखाली जो व्यवहार केला जातो त्यातून खरे टिकाऊ समाधान कसे लाभणार? प्रेमाचं खरं, व्यापक, शुद्ध, खोल स्वरूप आपण जाणत नाही. स्थूल, भौतिक दुनियेतही आपण खरं प्रेम करीत नाही मग भगवंतावरील प्रेमाची गोष्टच दूर!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा