या स्थूल आणि दृश्य भौतिक जगातला प्रेमाचा मार्गही सोपा नाही. मीर ‘अनीस’ यांचा शेर आहे, ‘अनीस’ आसां नहीं आबाद करना घर मोहब्बत का। ये उनका काम है जो ज़िन्दगी बर्बाद करते हैं।। स्वतची पर्वा न करणाराच प्रेम करू शकतो. होशियारी सोडणाराच प्रेम करू शकतो. जर साध्या मानवी पातळीवरील प्रेमातही इतकं समर्पण आवश्यक आहे तर पूर्ण समर्पणाशिवाय भगवंतावर प्रेम कसं साधावं? जो ‘मी’ आणि ‘माझे’ची होशियारी, चलाखी, चतुराई सोडतो तोच भगवंतावर खरं प्रेम करतो. मग जग असून नसल्यासारखं होतं. जगात तो वावरतो ते त्याच्याच प्रेमाच्या आधारावर. हे जग त्याचं आहे म्हणून त्यात तो वावरतो पण जगाशी त्याचं काही देणंघेणं असत नाही. कलावंत जसा नाटकात तन्मयतेनं भूमिका वठवत असतो पण त्या भूमिकेतील व्यक्तिरेखेची सुखदुखं त्याच्या चेहऱ्यावर असतात, हृदयात घुसलेली नसतात. तद्वत भगवंतमय जीवन जगणारा जगातल्या व्यवहारात प्रारब्धानुरूप वावरतो पण त्याच्या हृदयात जग नसतं. हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या। रहें आजाद या जग में, हमें दुनिया से यारी क्या ।। उलट या जगात वावरताना भगवंताचं प्रेम हाच त्याचा एकमेव आधार असतो. ते नसतं तर जगणं कठीणच झालं असतं, अशीच त्याची भावना असते. ‘मंज़्‍ार’ लखनवी यांचा शेर आहे, ‘वो तो कहिए आपकी उल्फ़त में दिल बहला रहा। वर्ना दुनिया चार दिन भी रहने के क़ाबिल न थी।।’ भगवंत आणि तो यांच्यात कधी दुरावाच नसतो. सुखाचं निधान असलेला परमात्मा सोडून जे नश्वर गोष्टींत सुख शोधण्याची आणि टिकविण्याची धडपड करीत राहातात त्यांना त्या नश्वर गोष्टी दुरावताच वियोगाचं दुखं आणि नव्या गोष्टींचा शोध अशी अखंड धडपड करीत राहावे लागते. शाश्वत परमात्मा आणि त्याचं शाश्वत प्रेम लाभलं असताना भटकंती कसली आणि वाट पाहाणं कुठलं? जो बिछुडम्े हैं पियारे से, भटकते दर-बदर फिरते। हमारा यार है हम में, हमन को इन्तजारी क्या।। प्रेम आणि सुख नश्वर गोष्टींत शोधण्याची आपली धडपड असते आणि हा सारा शोध स्वार्थप्रेरितच असतो. ‘मी’ आणि ‘माझे’पणाने बरबटलेला असतो. त्यातूनच माणूस स्वतचं नाव मोठं करण्याच्या फंदात पडतो. खलक सब नाम अपने को, बहुत कर सिर पटकता है। अवघ्या साठ-सत्तर वर्षांसाठी जे नाव या नश्वर देहाला लाभलं त्याचा उदोउदो व्हावा म्हणून आपण किती कष्ट घेतो? आपल्याला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, आपल्याला मान द्यावा, आपलंच म्हणणं ऐकावं, आपलीच सरशी व्हावी, आपल्यालाच यश मिळावं, आपला शब्द कधी खाली पडू दिला जाऊ नये.. अखंड आटापिटा. पण ज्याला सद्गुरूकृपेनं खरं शाश्वत नाम लाभलं आहे, शाश्वत ज्ञान लाभलं आहे त्याला दुनियेच्या नामदारीची, दुनियेच्या प्रसिद्धीची काय किंमत? हमन गुरु ज्ञान आलिम हैं, हमन को नामदारी क्या।। तो शाश्वताचंच नाव टिकावं एवढंच एकमेव कार्य जीवनभर करतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा