महानगरातील घराजवळचे काही टॅक्सीचालक परिचयाचे झाले होते. उत्तर प्रदेश आणि अध्यात्माची आवड या दोन समान धाग्यांमुळे गप्पा रंगत. इंदूरच्या एका संस्थेने फार परिश्रमपूर्वक श्रीमहाराजांचे चरित्र हिंदीत छापले आहे. तेही त्यांच्या वाचनात होते. त्यामुळे महाराजांची त्यांना बरीच माहिती होती. त्यातील एक भक्तिमान चालक गाडीच्या दुरुस्तीसाठी गेले होते. एका बकालशा वस्तीत वाहनदुरुस्तीची दुकाने होती. तिथे गाडी दुरुस्त होत असताना बराच वेळ गेला. चहा प्यावा म्हणून ते तिथल्याच एका टपरीत शिरले. टपरीही तशीच त्या वस्तीला साजेशी कळकट. टेबलंखुच्र्या, मालकाच्या गल्ल्याचं टेबल हे सारं रया गेलेलं. चहा पिताना या चालकाचं लक्ष सहज त्या दाक्षिणात्य भासणाऱ्या मालकाकडे गेलं. काळासावळा पण तरतरीत असा मालक जेमतेम तिशीतला असावा. त्यानंतर आपसूक लक्ष गेलं ते त्याच्या पाठी भिंतीवर टांगलेल्या लहानशा देव्हाऱ्याकडे. त्या देव्हाऱ्यात देवाचा पत्ता नव्हता. फक्त एक मध्यमशी तसबीर होती.. गोंदवलेकर महाराजांची! त्या चालकाला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यानं मालकाला विचारलं, ‘अरे हे कोण आहेत तुला माहीत आहे का?’ तो म्हणाला, ‘नाही!’ त्याच्या या उत्तरानं तर चालक अधिकच चक्रावला. त्यानं त्याच आश्चर्यानं भारलेल्या स्वरात विचारलं, ‘मग ही तसबीर इथे कशी?’ त्याच्या उत्तरात त्याची कहाणीच उलगडली. तो म्हणाला, ‘कळू लागलं तेव्हापासून मी या शहराच्या रस्त्यावरच लहानाचा मोठा होत होतो. अनाथ आणि भणंग. त्यामुळे तारुण्यात सर्व व्यसनं लागली. चोऱ्यामाऱ्या करून पोट भरू लागलो. एके रात्री दारू पिऊन रस्त्याच्या कडेला पडलो होतो. सकाळी जाग आली आणि झाडाच्या बुंध्याकडे लक्ष गेलं. तिथे कुणीतरी ही तसबीर ठेवली होती. मी ती हातात घेतली. तसबिरीतील या महाराजांनी माझ्याकडे इतक्या दयाद्र्र दृष्टीने पाहिलं की अवघ्या आयुष्यात माझ्याकडं तसं प्रेमानं आणि आपुलकीनं कुणीही पाहिलं नव्हतं. या जगात कुणीतरी माझं आहे, या जाणिवेनं मला खूप रडू येऊ लागलं. तेव्हापासून ही तसबीर माझ्याजवळ आहे. त्या नजरेनंच माझी सर्व व्यसनं सुटली. वाईट मार्ग सुटले. लहानसहान कामं करत या टपरीपर्यंतचा प्रवास झाला. मला यांचं नाव-गाव माहीत नाही. पण ते माझे आहेत, एवढंच माहीत आहे.’ भारावून टॅक्सीचालक म्हणाला, ‘अरे पण त्यांना या कळकट जागी ठेवणं बरं नाही.’ तो हसून म्हणाला, ‘जिथे मी असेन तिथेच तर तेसुद्धा असणार ना? त्यांच्याशिवाय मी राहू शकत नाही, एवढंच मला माहीत आहे.’ प्रेमाला नेमाची गरज लागत नाही, वियोग सहन होत नाही ते प्रेम, याचा अर्थ मला त्या टपरीत कळला! त्या टपरीत जाऊन श्रीमहाराजांकडे मी डोळे भरून पाहिलं तेव्हा गोंदवल्यात गेल्याचं पुण्य लाभलं. आपल्याला महाराजांचं चरित्रच्या चरित्र पाठ आहे, त्यांचं दिव्यत्वही आपण तपशीलवार जाणतो, पण यातलं काहीही माहीत नसलेल्याचं त्यांच्यावर जे प्रेम आहे त्यातलं कणभर जरी आपल्याला साधलं तरी जीवन धन्य होईल, या जाणिवेनं त्या भक्ताला हात जोडले गेले..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा