गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे येथे २ जुलै २०१३ रोजी ‘दुष्काळ’ या विषयावर एक चर्चासत्र झाले. त्या वेळी माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मी सादर केलेल्या लेखातील पाण्याची उपलब्धता या विषयावरील परिच्छेद खाली उद्धृत केला आहे. ‘जायकवाडी ४० टीएमसीचेच’ या शंकरराव कोल्हे यांच्या गंभीर विधानासंदर्भात (लोकसत्ता, दि. १६ जुल २०१३) त्याचा विचार व्हावा असे वाटते.
‘ प्रकल्पांचे नियोजन करताना जे विज्ञान-तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यानुसार पाणी उपलब्धतेबाबत गृहितके केली जातात. आकलनाच्या मर्यादा असतात. प्रकल्प ‘फीजिबल’ करायचाच असे दडपण असते. शासकीय अनास्था व लाल फीतही काम करत असते. या सगळ्याच्या एकत्रित परिणामातून पाणी उपलब्धतेचे अंदाज ठरतात. ते शेवटी अंदाज असतात. ते काही त्रिकालाबाधित सत्य नसते. काळानुरूप त्यात बदल होतात. पण तोपर्यंत प्रकल्प होऊन गेलेला असतो. अमुक एवढे क्षेत्र भिजेल असे गृहीत धरून कामे पूर्ण झालेली असतात. अन आता तेवढे पाणीच खोऱ्यात वा प्रकल्पस्थळी उपलब्ध नाही असे लक्षात येते. सगळेच मुसळ केरात जाते. जायकवाडीचे उदाहरण बोलके आहे. गोदावरी खोऱ्यात पठणपर्यंत १९६ टीएमसीपाणी उपलब्ध आहे असे मानून १०० टी.एम.सी.चा जायकवाडी प्रकल्प उभा राहिला. पण २००४ सालच्या अभ्यासानुसार आता १५६ टीएमसीच पाणी उपलब्ध असे जाहीर झाले. ४० टीएमसी पाण्याची तूट एकटय़ा जायकवाडीवर दाखवली गेली. हे कमी होते की काय म्हणून २००४ सालापर्यंत जायकवाडीच्या वर मात्र अजून ३० टीएमसीची धरणे बांधण्यात आली. म्हणजे जायकवाडीचे पाणी ७० टक्क्यांनी कमी झाले. उरलेल्या ३० टक्क्यांत जायकवाडी कशी पास होणार? अशा रीतीने नापास केलेली जायकवाडी आता जल क्षेत्रातून ‘ड्रॉपआऊट’ होण्याच्या मार्गावर आहे. आपल्या जल नियोजनाची ही शोकांतिका जायकवाडीपुरती मर्यादित नाही. ती सार्वत्रिक आहे. मागास, दुष्काळी व नदीखोऱ्यातील शेपटाकडचे भाग त्याचे विशेष बळी आहेत. खोरे/उपखोरेनिहाय पाणी उपलब्धता फक्त नव्याने ठरवणेही पुरेसे नाही. प्रकल्पनिहाय परिस्थिती फार वेगळी असू शकते. जलाशयातील गाळाचे अतिक्रमण; बाष्पीभवन; गळती व पाझर; धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेली जल संधारणाची कामे व विविध कारणांसाठी तेथे होणारा पाण्याचा वापर याचा विचार करून प्रकल्पांचा वास्तववादी आढावा घेणे तितकेच आवश्यक आहे.
खोरे/उपखोरेनिहाय एकूण पाणी उपलब्धता आणि पूर्ण, अपूर्ण, बांधकामाधीन व भविष्यातील अशा सर्व पाणी योजनांतील प्रत्यक्ष पाणी उपलब्धतेचा लेखाजोखा म्हणूनच नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हायड्रॉलॉजी व आय.आय.टी.सारख्या तिऱ्हाईत (Third party) संस्थांकडून नव्याने तपासून घेणे महत्त्वाचे आहे. पाणी उपलब्धता हा मूलभूत मुद्दा आहे. त्यातच बदल झाला तर जलविकास व व्यवस्थापनाची सगळी गणिते चुकणार आहेत. किंबहुना, ती चुकली आहेत म्हणूनच आज जलसंघर्ष तीव्र झाला आहे.
– प्रदीप पुरंदरे,
सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद
‘जायकवाडी ४० टीएमसीचेच’; मग चुकले कसे नि कुठे?
गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे येथे २ जुलै २०१३ रोजी ‘दुष्काळ’ या विषयावर एक चर्चासत्र झाले. त्या वेळी माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मी सादर केलेल्या लेखातील पाण्याची उपलब्धता या विषयावरील परिच्छेद खाली उद्धृत केला आहे. ‘जायकवाडी ४० टीएमसीचेच’ या शंकरराव कोल्हे यांच्या गंभीर विधानासंदर्भात (लोकसत्ता, दि. १६ जुल २०१३) त्याचा विचार व्हावा असे वाटते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-07-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 tmc of jayakavadi how it wrong and where