आई-वडील आणि मुलगा या एका नात्याच्या कंगोऱ्यातून आपण ‘जितकी ज्याची पायरी तितका व्यवहार पाळलाच पाहिजे’ या मुद्दय़ाचा विचार केला. खरं तर प्रत्येक नात्यागणिक व्यवहाराची पायरी ठरलेली आहे आणि त्यानुरूप म्हणजेच कर्तव्यानुरूप व्यवहार केला तर तो बाधकही होत नाही. त्या नात्यागणिक व्यवहाराची अर्थात कर्तव्याची पायरी म्हणजेच मर्यादा पाळली गेली नाही तर कर्तव्य आणि मोहजन्य कर्म यांच्यातलं अंतर संपतं. मग आवश्यकतेपेक्षा अधिक वा कमी व्यवहार आपल्याकडून होऊ लागतो. साधकाचा प्रपंचमोह उफाळून येतो. त्याच्यातली आसक्ती, दुराग्रह यांना काही मर्यादा राहात नाही. त्यातून नात्यानात्यांत अनावश्यक तणाव, दुरावा, कटुता उत्पन्न होते. एक गोष्ट लक्षात घ्या. उपासनेचा प्रामाणिक प्रयत्न करीत असलेल्याची उपासना कितीही मोडकीतोडकी का असेना, त्या तेवढय़ा उपासनेनेही त्याचे मन हळवे आणि संवेदनाक्षम बनत असते. अशा हळव्या मनावर नात्यांतील या तणावांचा मोठाच आघात होतो. या जगात कुणीच कुणाचा नाही, हे सत्य ऐकायला आणि सांगायला काही वाटत नाही, पण अनुभवणे जिवावर येते! असेल त्या परिस्थितीत आनंद मानता येणे, हे तयारीच्या साधकाचे लक्षण आपल्यालाही माहीत असते. पण आपला तो अनुभव नसतो. श्रीगोंदवलेकर महाराजांचंच वाक्य आहे पहा- ‘घडणारी गोष्ट आनंदमय आहे असे मानणे व ती तशी निश्चित आहे असे वाटणे यात फरक आहे!’ (बोधवचने, क्र. १७९). तेव्हा नात्यानात्यांतील तणावांमुळे आपल्या मनाची फरपट सुरू होते. हे तणाव तरी का निर्माण होतात? स्वार्थ आणि उभय बाजूंनी अपेक्षांमध्ये पडत असलेले अंतर हे त्यामागचे कारण आहे. मग श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात त्याप्रमाणे, ‘सध्या जगातील प्रेम तेवढे गेले, संबंध फक्त राहिला’(बोधवचने, क्र. ३६८) हा अनुभव आपल्याला कळू लागतो. नाती आहेत, पण त्यात पूर्वीचे ते प्रेम नाही. साधनेने हळव्या बनत असलेल्या मनावर नात्यांतील तणावांचा मोठाच आघात होतो. हा तणाव नष्ट करण्यासाठी मग तो अधिकच नेटाने प्रयत्न करू लागतो. मग दुसऱ्यासाठी नको इतकं करण्यापासून ते साम-दाम-दंड-भेद अशा सूक्ष्म स्वार्थकेंद्रित व्यवहारापर्यंत साधकाची घसरण सुरू होते. मग शरीराच्या साऱ्या क्षमता याच एका कामात जुंपल्या गेल्या, मनाच्या साऱ्या क्षमतांचा वापर याच कामात होऊ लागला आणि भावनिक आंदोलनं आणि मानसिक ओढाताण याच हट्टाग्रहातून होत राहिली तर साधना कुठून होणार? साधनेसाठी शरीराची उमेद, मनाचा उत्साह आणि ताजेपणा, भावनेचा ओलावा कुठून उरणार? मग देव अंतरणार, साधना अंतरणार यात काय संशय? एक रहस्य लक्षात घ्या. आपल्या जडशीळ मनात भगवंतासाठी प्रेम उत्पन्न होणे, हाच एक चमत्कार आहे. पण तो परमात्माच ते प्रेम, भावनेचा ओलावा या पाषाणहृदयात उत्पन्न करतो. पण त्यातून साधना वाढण्याऐवजी प्रपंचमोहातून त्या ओलाव्याचा चिखल आपणच उत्पन्न करतो! मग देवही अंतरतो आणि व्यवहार तुटतोचं!
६६. फरपट
आई-वडील आणि मुलगा या एका नात्याच्या कंगोऱ्यातून आपण ‘जितकी ज्याची पायरी तितका व्यवहार पाळलाच पाहिजे’ या मुद्दय़ाचा विचार केला. खरं तर प्रत्येक नात्यागणिक व्यवहाराची पायरी ठरलेली आहे आणि त्यानुरूप म्हणजेच कर्तव्यानुरूप व्यवहार केला तर तो बाधकही होत नाही.
First published on: 04-04-2013 at 12:39 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 66 drag