श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या ज्या बोधवचनाचा आपण सध्या मागोवा घेत आहोत ते पुन्हा वाचू. श्रीमहाराज सांगतात, ‘‘जितकी ज्याची पायरी तितका व्यवहार पाळलाच पाहिजे. नाहीतर देव अंतरतो आणि व्यवहार तुटतो.’’ देव कसा अंतरतो, इथपर्यंत आपण पाहिलं. आता व्यवहार तुटतो म्हणजे काय, याचा विचार करण्याआधी ‘पायरी’चीही आणखी एक सूक्ष्म छटा पाहू. श्रीमहाराज जेव्हा सांगतात की, ‘जितकी ज्याची पायरी तितका व्यवहार पाळलाच पाहिजे’ तेव्हा त्याचा आणखी एक अर्थ असा की, ज्याच्याशी आपण व्यवहार करीत आहोत तो कोणत्या पायरीवर उभा आहे, याचीही जाणीव असली पाहिजे. इथे ‘पायरी’ या शब्दातून सामाजिक उच्चनीचतेचा संकेत दुरान्वयानेही अभिप्रेत नाही. उलट तो सहृदयतेबाबत सजग करणारा आहे. आपल्यापेक्षा सामाजिक, आर्थिक, बौद्धिक बाबतीत जो श्रेष्ठ आहे त्याच्याशी कुणीही चांगलाच व्यवहार करील. पण जो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीपायी या बाबतीत आपल्यापेक्षा उणा आहे त्याच्याशी आपण कसा व्यवहार करतो, असा अंतर्मुख करणारा प्रश्न यातून भिडतो. आपल्यापेक्षा जो आर्थिकदृष्टय़ा, भौतिकदृष्टय़ा खालच्या पायरीवर आहे त्याच्याशी व्यवहार करताना, अर्थात वागताना आपण अधिक सहृदय राहू शकत नाही का? आपण त्याची परिस्थिती पालटू शकणार नाही, पण त्याच्याशी सहृदयतेनं वागण्यात काय अडचण आहे? साहेबानं आपल्याशी चांगलं वागावं, असं आपल्याला वाटतं. पण आपण हाताखालच्या लोकांशी चांगलं वागतो का, असा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. एकानं महाराजांना विचारलं, महाराज भिकाऱ्याला भीक घालावी की नाही? महाराज म्हणाले, ‘‘भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे? तेव्हा भिकाऱ्याला पैसे देताना उगाच वाद घालू नये.’’ भिकाऱ्याबद्दल आपल्या मनात अढी असते ती का? तर ते धडधाकट असूनही भीक मागतात. लोकांच्या पैशावर स्वतला पोसतात म्हणून. भिकेला आपण दानच समजतो आणि दान हे सत्पात्रीच असलं पाहिजे, असं मानतो. परमार्थाचं सोडा, भौतिकातलं हवं ते मिळवण्यासाठी आपण धडधाकट शरीर लाभूनही स्वकष्टांवर कुठे विसंबतो? देवानं आपली इच्छा पूर्ण करावी म्हणून आपण एका अर्थी भीकच मागत नाही का? जे मागतो ते मिळण्यासाठी आपण तरी सत्पात्री कुठे असतो? तेव्हा पायरी इतकी व्यापक आहे. आता याचा अर्थ निस्वार्थीपणाचं सोंग आणून दुसऱ्यासाठी प्रमाणाबाहेर धावावं, असं नाही पण स्वसुखाची ओढ असेल तर परदुखाचंही भान आलं पाहिजे. ज्याच्यात सहृदयता नाही तो साधकच नव्हे. परदुखनिवारणाची आपली ताकद नसेलही पण परदुख जाणण्याची मनाची क्षमता का असू नये? निव्वळ प्रारब्धयोगे जो आपल्यापेक्षा उणा आहे त्याच्याशी आपण जर अहंकाराने, गुर्मीने, ताठय़ाने वागत असू तर याचा अर्थ आपण चुकीच्या पायरीवर उभे आहोत, हाच आहे. अशा चुकीच्या पायरीवर उभ्या असलेल्या अहंकेंद्रित व्यक्तीपासून देव अंतरेल, यात काय शंका!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा