जितकी ज्याची पायरी तितका व्यवहार पाळलाच पाहिजे. नाहीतर देव अंतरतो आणि व्यवहार तुटतो! श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या या वाक्यातील देव अंतरतो, इथपर्यंतचं विवरण आपण पाहिलं. आता जितकी ज्याची पायरी तितका व्यवहार पाळला नाही तर व्यवहार तुटतो, म्हणजे काय, याचा थोडा विचार करू. आपला जो व्यवहार आहे, आपल्या वाटय़ाला जे अटळ कर्तव्य आलं आहे ते प्रारब्धामुळे आलं आहे. जीवनात जे काही घडते आणि मी जे काही भोगतो; मग ते सुख असेल किंवा दुख असेल, त्यामागे प्रारब्धच असतं. कोणत्या कर्मामुळे मी हे सुखद किंवा दुखद फळ भोगत आहे, हे मला समजत नसलं तरी समर्थ रामदासांच्या शब्दांत सांगायचं तर, ‘घडे भोगणे सर्वही कर्मयोगे’ मीच केलेल्या कर्माच्या योगानं माझ्या जीवनात सुखाच्या किंवा दुखाच्या गोष्टी घडतात व मला त्यातलं सुख किंवा दुख भोगावं लागतं. माझ्याच पूर्वकर्मामुळे माझ्या वाटय़ाला काही देणीघेणी आली असतात. देणंघेणं नुसतं आर्थिकच नसतं. एखादी व्यक्ती तुमच्या अडचणीत धावून आली, तर तिच्याही अडचणीत तुम्ही धावून जाताच. तेव्हा हे देणंघेणं कृतीचंही असतं. अनंत जन्मांतील असे शेष राहिलेले, अपूर्ण राहिलेले देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्याची कृती या जन्मीही पुढे सुरू राहते. असे आपले ‘देणेकरी’ आणि ‘घेणेकरी’ वेगवेगळ्या नात्यांच्या व ओळखीच्या निमित्ताने आपल्या आयुष्यात येतात. त्यांच्याबरोबर आपलं जे कर्तव्य आहे ते पूर्ण झालं की व्यवहार पूर्णत्वास जातो. आता नात्यांची वा संबंधांची पायरी आपण चुकलो तर एकतर कर्म अती तरी होतं किंवा किमान कर्तव्यपूर्तीइतपतही होत नाही. माझ्या आसक्त स्वभावानंच हे घडतं. त्यानं व्यवहार तुटतो. लक्षात घ्या, इथे महाराज ‘तुटतो’ असा शब्द वापरतात, ‘संपतो’ हा शब्द वापरत नाहीत. याचाच अर्थ तुटल्यामुळे अपूर्ण राहिलेला तो व्यवहार पूर्ण केल्याशिवाय ते प्रारब्धही पूर्ण होत नाही. उलट त्यात अधिक वेळ जातो. हा व्यवहार पूर्ण करण्यासाठीची परिस्थिती उत्पन्न होईपर्यंत पुन्हा पुन्हा यावंच लागतं. तर थोडक्यात, प्रापंचिक साधकाला कर्तव्यकर्माची पायरी चुकणार नाही, याची खबरदारी घ्यायला श्रीमहाराज सांगत आहेत. जे कर्तव्य आहे ते अनासक्त होऊन करा, यावर त्यांचा भर आहे. आसक्तीमुळे त्या कर्मात मोह आणि भ्रमाचा शिरकाव होतो आणि मग कर्तव्य पूर्ण होत नाही. उलट नवं प्रारब्धही तयार होतं. त्यामुळे अनासक्तीवर श्रीमहाराजांचा भर आहे.
७०. अनासक्त व्यवहार
जितकी ज्याची पायरी तितका व्यवहार पाळलाच पाहिजे. नाहीतर देव अंतरतो आणि व्यवहार तुटतो! श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या या वाक्यातील देव अंतरतो, इथपर्यंतचं विवरण आपण पाहिलं. आता जितकी ज्याची पायरी तितका व्यवहार पाळला नाही तर व्यवहार तुटतो, म्हणजे काय, याचा थोडा विचार करू.
आणखी वाचा
First published on: 10-04-2013 at 12:20 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 70 apathetic transaction