अनासक्त होऊन कर्म करायचं तर देह प्रपंचात आणि मन परमार्थाकडे, अशी विभागणी असली पाहिजे. देहानं तर कर्तव्य करायचं पण मन परमात्म्याकडे ठेवायचं. इथे दोन गोष्टी मनात येतील. पहिली ही की ही गोष्ट सोपी आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनाचंच जर लक्ष कर्माकडे नसेल तर कर्म, व्यवहार व्यवस्थित होईल तरी का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं उलट क्रमानं पाहू. देहानं कर्म करा, मनानं नको, हे सांगण्याचा आशय असा की मनाच्या ओढीनं कर्म करू नका. मोह, भ्रम, आसक्ती या सर्व गोष्टी मनाच्या ओढीमुळे येतात आणि त्या कर्तव्याचा विचकाच करतात. दुसरी गोष्ट अशी की दिवसभरातील आपली कितीतरी कर्तव्यर्कम अशी असतात जी नित्य सवयीची झाली असतात. कित्येकदा दुसऱ्याच गोष्टीचा विचार करीत करीत आपण ते कर्म करीत असतो. याचाच अर्थ मनाचं पूर्ण अवधान त्या कर्माकडे नसतानाही ते कर्म होतच असतं. फार थोडी र्कम अशी असतात ज्यात मनाचं आणि बुद्धीचं पूर्ण अवधान आवश्यक असतं. तेव्हा जे मन एक कर्म करीत असतानाही त्या कर्मात न राहाता दुसऱ्या कसल्या तरी विचारात मग्न होऊ शकतं ते परमात्म्याकडे वळवणं अशक्य नाही. आता पहिला प्रश्न, देह प्रपंचात आणि मन परमात्म्याकडे वळवणं सोपं आहे का? श्रीगोंदवलेकर महाराजांनी एके ठिकाणी म्हटलं आहे की, एका खिशातली वस्तू आपण जशी दुसऱ्या खिशात ठेवतो तसं प्रपंचातलं मन काढून ते भगवंताकडे ठेवावं. आता हे इतकं सोपं नाही, कारण आपलं मन प्रपंचातसुद्धा एकाच जागी नाही. ते अनेक ठिकाणी विखुरलं आणि विभागलं आहे. ते तिथून गोळा करून परमात्म्याकडे वळवायचं आहे. समस्त उपासनांचा प्रारंभिक हेतू तोच आहे. तेव्हा प्रपंचात राहून प्रपंचातच अडकलेलं मन परमार्थाकडे वळवायचं आणि देहानं प्रपंचातील कर्तव्यं करायची, ही गोष्ट सोपी नसली तरी कठीणही नाही, असा श्रीमहाराजांचा सांगावा आहे. आपण परमात्मप्राप्तीकरताच जन्मलो आहोत. श्रीमहाराज सांगतात, ‘‘प्रत्येक माणूस भगवत्प्राप्तिचा अधिकार घेऊनच जन्मास आलेला असतो’’ (बोधवचने ८८२). परमात्मप्राप्ती हा जर ‘सकळांसि आहे येथे अधिकार’ आहे तर मग ती साधणे कठीण कसे असेल? श्रीमहाराज सांगतात, ‘‘ज्याच्याकरता मनुष्य येतो ते काम सुलभ असते’’ (बोधवचने ३४९). मग परमात्मप्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे. ते ध्येय ठरले तर त्याच्या पूर्तीसाठी आवश्यक त्या साऱ्या गोष्टी आपोआप होत जातील. श्रीमहाराज सांगतात, ‘‘ज्याचे ध्येय ठरले तोच खरा विद्वान. ध्येय ठरलेच नाही तर शक्ति येत नाही. जेवढे कार्य तेवढेच अवसान असते’’ (बोधवचने ६९९). श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणत, ‘इच्छा वाईट नाही, तिचा संकुचितपणा वाईट आहे! तुमची इच्छा एवढी व्यापक करा की तिच्या पूर्तीसाठी तुम्हालाही व्यापक व्हावं लागेल.’ परमात्मप्राप्ती ही ती व्यापक इच्छा आहे! ती मलाही व्यापक करील. पण हे सोपं आहे का? श्रीमहाराज सांगतात, ‘‘कोणतीही गोष्ट करताना तिची कठीणता मनात आणू नये. तिचा सोपेपणा पाहावा’’ (बोधवचने ५१५).

Story img Loader