श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘‘परमार्थ सोपा कारण त्यात गमवायचे असते. प्रपंच कठीण कारण त्यात मिळवायचे असते. मी कोणाचाच नाही, हे गमावणे. मी पुष्कळांचा आहे, हे मिळविणे’’ (बोधवचने, क्र. ३२६). परमार्थ साधनेचं एक रहस्यच श्रीमहाराज या वाक्यातून प्रकट करतात. परमार्थ सोपा कसा आणि कशानं होईल, हे श्रीमहाराज या वाक्यातून उघड करतात. पण काहीही गमावण्याची आपल्याला इतकी भीती वाटते की त्यामुळेच परमार्थ आपल्याला कठीण वाटतो. मुळात हे ‘गमावणे’ काय आहे, हे जाणून घेण्याआधी थोडा प्रपंचाचा विचार करू. प्रपंच कठीण आहेच. अगदी वर्षांनुर्वष जो प्रपंचात आहे, त्यालाही विचारा. तोसुद्धा सांगेल की, प्रपंच सोपा नाही. श्रीमहाराजही सांगतात, प्रपंच कठीण आहे. का? कारण त्यात मिळवायचं आहे. काय मिळवायचं आहे? तर ‘मी पुष्कळांचा आहे’ हे! आता ‘मी पुष्कळांचा आहे’ हे मिळवायचं म्हणजे काय? तर प्रपंचात आपण अनेकांचे असतो. अनेकांना आपल्याला धरून राहावे लागते आणि त्यामुळे अनेकांच्या कलाने आपल्याला जगावेही लागते. आता माणसाला आधाराची गरज आहे आणि मुख्य आधार किंवा खरा आधार मानसिकच आहे, हे श्रीमहाराजही सांगतातच. एकाकीपणाची आपल्याला भीती वाटते. सोबतीची, कुणीतरी असण्याची माणसाला जन्मजात सवय आहे. त्यामुळे माणसांना धरून राहण्यात अस्वाभाविक असं काही नाही. दुसऱ्यांना धरून राहायला श्रीमहाराजांचाही विरोध नाही. फक्त आपलं दुसऱ्यांना धरून राहणं जे आहे ते केवळ स्वतसाठीच आहे. श्रीमहाराज एके ठिकाणी विचारतात, ‘‘पाचजण मिळून प्रपंच बनतो. मग सर्व सुख एकटय़ाला मिळणे कसे शक्य आहे?’’ (चरित्रातील प्रपंचविषयक बोधवचने, क्र. ३८). आपला मात्र तोच हेतू असतो. सर्व सुख आपल्याला मिळावं, हाच आपला हट्ट असतो. या प्रपंचात किती मिळालं म्हणजे पुरे हे ठरलेलं नाही त्यामुळे कितीही मिळालं तरी पुरेसं वाटत नाही. प्रापंचिक सुखावर अपूर्णतेचं सावट सदोदित आहे. ‘मी पुष्कळांचा आहे’ या धारणेमागे जगानं आपल्या मनाजोगतं राहावं, हा हेतूच आहे. सगळ्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं, आपलं कौतुक करावं, आपण त्यांच्यासाठी जे काही करतो त्याची जाण ठेवावी, ही सूक्ष्म इच्छा या ‘मिळकती’ला चिकटलेली असते. त्यातून या प्रपंचात कितीतरी माणसांचं आपण करत राहतो. किती जबाबदाऱ्या असतात आणि त्या संपता संपतदेखील नाहीत. कितीही वर्षे लोटू द्या, प्रपंच पूर्ण कधीच होत नाही. या प्रपंचात अनिश्चितता तर पदोपदी आहे. कोणता प्रसंग कधी उद्भवेल, हे काही सांगता येत नाही. आपण जेव्हा एखाद्याला ‘आपलं’ मानतो तेव्हा ते मानणं एकतर्फी किंवा निरपेक्ष कधीच नसतं. आपण ज्याला आपलं मानतो त्यानंही आपल्याला तेवढंच ‘आपलं’ मानावं, अशी आपली इच्छा असते. ‘मी पुष्कळांचा आहे’, या भावनेला ‘पुष्कळांनीही केवळ माझंच असावं’, या भावनेचं घट्ट अस्तर असतं. त्यातूनच भीती, अस्थिरता, असुरक्षितता यांचं ओझं आपण पेलत असतो.
७३. मिळवणे
श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘‘परमार्थ सोपा कारण त्यात गमवायचे असते. प्रपंच कठीण कारण त्यात मिळवायचे असते. मी कोणाचाच नाही, हे गमावणे. मी पुष्कळांचा आहे, हे मिळविणे’’ (बोधवचने, क्र. ३२६). परमार्थ साधनेचं एक रहस्यच श्रीमहाराज या वाक्यातून प्रकट करतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-04-2013 at 12:25 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 73 obtain