श्रीसद्गुरूंच्या सान्निध्यात, श्रीसद्गुरूंच्या कृपाछायेत अनिर्वाच्य असं समाधान लाभतं आणि मग सत्शिष्य हा निवांतपणे त्या चरणांजवळच विसावतो. चरणांजवळ विसावणं, म्हणजे काय? तर सद्गुरूचरण हे अढळ आहेत, स्थिर आहेत तसंच सर्वसंचारीही आहेत. थोडक्यात, अशा शिष्यानं देहानं जगभर कुठेही जावो, मनानं तो अढळ आणि स्थिरच असतो. पण म्हणून तो निष्क्रिय बनतो का? नव्हे.  काहीजणांना वाटेल सद्गुरूलाभ झाला, सद्गुरूंचा आधार लाभला, आता भौतिकातली सर्व हाव आणि धाव खुंटली. मग जगात काही करण्यासारखं उरलं नाही. काही करण्याची आणि काही मिळविण्याची इच्छा उरली नाही. जर इच्छाच नाही तर मग माणूस कर्म तरी कसा करील? तो निष्क्रियच बनेल. तसं होत नाही आणि होऊ नये, असं ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तली पुढील ओवी बजावते; इतकंच नव्हे तर कर्म तर अचूक कर, पण त्याच्या फळात अडकू नकोस, असं त्यापुढील दोन ओव्यांत बजावले आहे. त्या ओव्या, त्यांचे ज्ञानेश्वरीतील क्रमांक, त्यांचा प्रचलित अर्थ, मग विशेषार्थ व विवरण आता पाहू. या ओव्या अशा :
आम्ही समस्त ही विचारिलें। तंव ऐसें चि हें मना आलें। जे न सांडिजे तुवां आपुलें। विहित कर्म।।११।। (अध्याय २, ओवी २६५)
प्रचलितार्थ : आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पाहिला, तेव्हा हे असेच आमच्या मनास पटले की, तू आपले विहित कर्म सोडू नयेस.
परि कर्मफळीं आस न करावी। आणि कुकर्मी संगति न व्हावी। हे सत्क्रिया चि आचरावी। हेतूविण।।१२।। (अध्याय २, ओवी २६६).
प्रचलितार्थ : परंतु कर्मफलाच्या ठिकाणी आशा ठेवू नये आणि निषिद्ध कर्म करण्याविषयीही प्रवृत्ती होऊ देऊ नये, हा सदाचार निष्काम बुद्धीने करावा.
तूं योगयुक्त होउनि। फळाचा संग टाकुनि। मग अर्जुना चित्त देउनि। करीं कर्मे।।१३।। (अध्याय २, ओवी २६७).
प्रचलितार्थ : अर्जुना तू निष्काम कर्मयोगाने युक्त होऊन कर्मफळाचा अभिलाष टाकून मग मन लावून विहित कर्मे करावीस.
विवरण : या ओव्यांचा विशेषार्थ ‘कुकर्मी संगती न व्हावी’ याचा अपवादवगळता, वेगळा नसल्याने प्रचलित अर्थाच्या अनुषंगानेच त्यांचा विचार करू. भगवान सांगत आहेत की, मनुष्य जन्माला आलेल्यानं त्याच्या वाटय़ाला जे कर्म आलं आहे ते सोडू नये. ते कर्म त्यात गुंतून मात्र करू नये. त्या कर्माचं काय फळ मिळेल, याचा विचार न करता, त्यानं ते कर्म अधिकाधिक अचूकपणे करावे. आता ‘कर्मफळी आस न करावी’ म्हणजे काय, तर कर्म करा पण त्याच्या फळाकडे लक्ष ठेवू नका, असं असेल तर माणूस कर्म चांगल्या रीतीने करेल का? म्हणूनच पुढे बजावलं की, ‘कुकर्मी संगति न व्हावी’. आता कुकर्म या शब्दाचा एक अर्थ म्हणजे वाईट कर्म, निषिद्ध कर्म. दुसरा अर्थ म्हणजे वाईट पद्धतीने केलेलं कर्म. इथे दुसरा अर्थ अभिप्रेत आहे. फळाची आशा ठेवायची नसेल तर माणूस कर्म नीट करणार नाही. तो कसंतरी काम करून टाकेल. तर असं कुकर्म करू नकोस!

Story img Loader