अंतरंगातून ज्याचं अवधान टिकलं आणि बाह्य़ व्यवहारही त्या अनुसंधानानुरूप झाला, त्या अवधानानुरूप झाला तर तो ‘सत्पुरुष’च होतो. सद्गुणांनी त्याच्यातील सत्प्रवृत्ती वाढू लागतात. अशा सत्पुरुषाच्या मार्गातला मोठा अडसर मग येतो तो ‘वैभव’ आणि ‘सत्कार’. या वैभवाने वित्तेषणा आणि सत्काराने लोकेषणा वाढू लागते. आता जो साधनपथावर अग्रेसर आहे त्याच्याकडे वैभव येणार ते कुठले? त्याच्याकडे ‘वित्त’ असणार ते कुठले? हे वित्त म्हणजे साधनेनं प्रकट होणाऱ्या काही सिद्धी, काही विशेष गुण, प्रतिभाशक्ती, वाक् शक्ती अशा काही शक्ती. आता या विशेष गुणांचा हेतू काय असतो? भगवद्शक्तीची जाणीव माझ्या अंतरंगात बिंबावी आणि त्यानं भगवंतावर प्रेम करण्याची शक्ती व वाव लाभावा, हा तो हेतू असतो. भगवंताला, त्याच्या कृपेला, भगवद्हेतूला जाणण्यासाठी आणि त्यानुरूप आचरण करण्यासाठी काहीबाही शक्ती येऊही शकतात. त्या आवश्यक असतातच, असे मात्र नाही. उलट जो काही नसतानाही केवळ प्रेम करू शकतो असा सुदामाच, अशी शबरीच भगवंताचे खरे निस्सीम भक्त ठरतात. असो. तर भगवंत शक्ती देतो त्यांचा हेतू त्यायोगे त्याच्याशी मला अधिक समरस होता यावं, हाच असतो. ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे शिधा बापच आणतो, स्वयंपाकही तोच रांधतो. ताटही तोच वाढतो आणि मुलाला तो भरवू लागतो. त्यावेळी ते मूल त्याच ताटातलं बापानंच शिजवलेलं अन्न त्याला भरवू लागतं तेव्हा बापाला कोण आनंद होतो! तेव्हा ज्या शक्ती भगवंत मला देतो त्यायोगे त्याचीच सेवा करता यावी, त्याच्याशीच समरस होता यावं, प्रेमरसाचा आनंद अनुभवता यावा, हा त्याचा हेतू असतो. वीर सावरकर यांनी ‘सागरांस’ कवितेत म्हटलं आहे- ‘‘गुणसुमने मी वेचियली या भावे। की तिने सुगंधा घ्यावे। जरि उद्धरणीं व्यय न तिच्या हो साचा। हा व्यर्थ भार विद्येचा।’’ मी जे जे ज्ञान कमावलं, गुण अंगी बाणवले त्याचा हेतू हा होता की माझ्या या गुणफुलांचा, ज्ञानफुलांचा सुगंध माझ्या मायभूमीला घेता यावा. पण माझ्या विद्येने तिची सेवा साधत नसेल तर ते ज्ञान म्हणजे नुसतं ओझंच आहे. अगदी त्याचप्रमाणे भगवंतानं जे गुण, जे ज्ञान, ज्या शक्ती-क्षमता मला दिल्या त्या जर पुन्हा त्याच्याकडे वळवून त्याची भक्ती वाढली नाही आणि त्या जगाकडे वळल्या तर त्या ‘वैभवा’चा काय उपयोग? त्या ज्ञान, विद्या, क्षमतांनी अहंकाराचं व्यर्थ ओझं मात्र वाढणार! ‘वै’ म्हणजे नाश करणे, निरास करणे. आसक्ती म्हणजे ‘रागा’चा निरास करतं ते ‘वैराग्य’. कुंठित बुद्धी जिथे नष्ट होते ते ‘वैकुंठ’. त्याचप्रमाणे ‘भव’ जिथे संपते ते खरं ‘वैभव’! पण हेच वैभव जर जगाकडे वळलं आणि जगाच्या मोहानं मला ग्रासू लागलं तर भवाचा पसारा अधिकच व्यापक होतो. मग ‘सत्कार’ अर्थात लोकस्तुतीची गोचीड चिकटते.
(बुधवारच्या अंकातील सदरातील दुसरे वाक्य ‘व्यवहार तपासून करणे म्हणजे प्रपंच अवधानाने करणे,’ असे वाचावे. अवधानाने या शब्दाच्या जागी अनवधानाने हा शब्द चुकून आला आहे.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा