अपूर्ण वासनेच्या पूर्तीच्या लालसेमुळे जिवाला जन्म-मृत्यूच्या चक्राची गाठ पडली आहे. ती गाठ सोडविण्याची प्रक्रिया म्हणजे परमार्थ आहे. ही गाठ फार पक्की आहे. श्रीब्रह्मानंद महाराजांच्या शब्दांत सांगायचं तर, ‘बहु बळकट चिज्जडग्रंथी’ अशी ही गाठ आहे. ती सोडविण्यासाठी कोणती दोरी ओढायची हे माहीत पाहिजे. नाहीतर चुकीच्या पद्धतीने दोरा ओढला जातो व गाठ अधिकच पक्की होते. जास्तच गुंतागुंत होते. म्हणजेच परमार्थाची प्रक्रिया जर योग्य दिशेनं झाली नाही तर गुंता वाढतो. परमार्थ हा ‘मी’चा निरास करण्यासाठी आहे, हे भान सुटलं तर परमार्थाची दिशा चुकते. मग ‘मी’ची गाठ सुटण्याऐवजी पारमार्थिक ‘मी’ची गाठ अधिकच पक्की होते. त्यासाठी प्रपंचाप्रमाणेच परमार्थातही अवधान पाहिजे. परमार्थ कशासाठी करायचा आहे, याबाबतचा विचार स्पष्ट पाहिजे. श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात त्याप्रमाणे, ‘परमार्थ हा वेषांतरात नसून वृत्त्यंतरात आहे’ (बोधवचने, क्र. ९०१). आपल्याला कृती करण्याची सवय आहे, वृत्ती बनवायची नाही, असंही श्रीमहाराज सांगतात. (बोधवचने, क्र. ३३६). त्यामुळे बाहेरून पारमार्थिक कृती, बाहेरून पारमार्थिक वेषभूषा, बाहेरून पारमार्थिक वावर आपल्याला पटकन जमतो पण वृत्ती तशी नसते! तोंडी उच्च ज्ञान आहे पण कृती विपरीत, यामुळे त्या परमार्थाबद्दलच लोकांना शंका येते. हे सर्व खरं आहे का, याला काही अर्थ आहे का, असंही वाटतं. पारमार्थिक मुखवटा घातलेल्या मला अहंकाराबद्दल तिटकारा असतो, पण तो दुसऱ्याच्या! मलाही आसक्ती आवडत नाही, पण ती दुसऱ्याला असलेली. तेव्हा मी अहंकारी, आसक्त असताना सर्व जग राममय आहे, असं नुसतं बोलत असेन तर काय उपयोग? वृत्त्यंतराऐवजी नुसते वेषांतर झाल्याने परमार्थाच्या सत्यत्वाबद्दलच प्रश्नचिन्ह कसे लागले आहे, हे सांगताना श्रीमहाराज स्पष्टपणे नमूद करतात की, ‘‘हा प्रश्न उत्पन्न होण्याचे कारणच असे की परमार्थ करणारे जे लोक दिसतात किंवा परमार्थाच्या नावाखाली जे व्यवहार होत असतात त्यांच्याकडे पाहिले असता खऱ्या परमार्थाच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. कोणी म्हणतो आमच्या देवळात श्रावण महिना चालू आहे. काही ठिकाणी चातुर्मासाचा कार्यक्रम चालू असतो. परंतु जेथे बाराही महिने कार्यक्रम चालू आहे तेथेसुद्धा श्रोते आणि वक्ता यांच्यामध्ये काहीच फरक दिसत नाही. दोघेही होते तेथेच सापडतात. श्रोते, वक्ते व (परमार्थाचे) काही न करणारे लोक एकाच पातळीवरचे दिसतात. हरिदास, पुराणिक, प्रवचनकार यांचा आजच्याही काळात सुळसुळाट झाला आहे. पण परमार्थाचे रहस्य कोणाच्यातच दिसत नाही. कारण परमार्थ फक्त भाषेतच शिल्लक राहिला आहे. तो आचरणात आणण्याचे कोणालाच भान नाही’’ (बोधवचने, क्र. ९२४). परमार्थाचे रहस्य! काय आहे हे रहस्य? श्रीमहाराजच ते उघड करताना म्हणतात की, ‘‘भगवंत कायम बरोबर असणे हे सत्पुरुषाचे रहस्य आहे’’ (बोधवचने, क्र. २८९). हे रहस्य अर्थात भगवंताचा अखंड संग असल्याचे लक्षण कोणाच्याच वावरण्यातून जाणवत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा