भगवंत कायम बरोबर असणे, म्हणजे भगवंताच्या आधारावर मनानं पूर्ण विसंबून जीवन जगणे. आता ज्या अर्थी इथे जीवन जगणे म्हंटलं आहे त्याअर्थी त्या जगण्यात जीवनाचा गुण असलाच पाहिजे तो आहे जिवंतपणा, चैतन्य! भगवंतावर विसंबणे म्हणजे आळशासारखा काळ कंठणे नव्हे. श्रीगोंदवलेकर महाराजही सांगत की, ‘भगवंत आळसाला मदत करीत नाही, प्रयत्नांना करतो.’ तेव्हा जगण्यात ताजेपणा, उमेद आणि प्रयत्न असलेच पाहिजेत. आसक्ती आणि अज्ञान असते तिथेच मोह आणि भ्रम असतो. यासह जीवन जगणे म्हणजे पदोपदी अनिश्चितता, अस्थिरता यांचीच सोबत आहे. ज्याच्याबरोबर कायम भगवंत आहे त्याच्याच अंतरंगात खरी निश्चिंती, खरी निर्भयता, खरं शुद्ध ज्ञान, खरी शुद्ध कळकळ असेल. भगवंत आज सदोदित आपल्याबरोबर नाही म्हणूनच चिंता, भय, अज्ञान आणि मळमळ यानं आपलं अंतरंग सदोदित व्यापून आहे. परमार्थाप्रमाणेच प्रपंचातही भगवंत साक्षी आहे, या भावनेनं प्रत्येक कृती करणं म्हणजे भगवंताचा संग सदोदित लाभणं. भगवंत कसा आहे? तो त्रिगुणातीत, निर्गुण, निराकार, सर्वव्यापी आणि सर्वसाक्षी आहे. जीव म्हणजे आपण कसे आहोत? आपण सगुण आहोत, सत-रज-तम या तीन गुणांनी बद्ध आहोत. आपली प्रत्येक कृती ही यापैकी एका गुणाने प्रेरित असतेच असते. आपण साकार आहोत म्हणजे देहाकारात आहोत. हा देह अनेक क्षमतांचा जसा आहे तसाच अनेक मर्यादांमध्येही बद्ध आहे. आपण सर्वव्यापी व सर्वसाक्षीही नाही. आपण काळ, परिस्थिती, परिसर यात बद्ध आहोत. त्यातही वास्तव असे की, आपण वर्तमानात जगत असलो तरी वर्तमानाचं भान आपल्याला कमीच असतं. होऊन गेलेल्या गोष्टी अर्थात भूतकाळ आणि होऊ घातलेल्या गोष्टी अर्थात भविष्यकाळ याविषयीच्याच विचार, कल्पना, भीती, आनंदविभ्रम यांनी आपलं मन व्याप्त असतं. वर्तमानाकडे आपलं सजग लक्ष नसतं. वर्तमानाचा क्षण भूतकाळात जमा होतो तेव्हा आपलं त्याकडे खरं लक्ष जातं. मग असं व्हायला नको होतं, असं आपण वागायला नको होतं, असं अमक्यानं बोलायला नको होतं, याऐवजी असं करायला हवं होतं.. आदी विचार आपल्या मनात घोंगावू लागतात. आपण सर्वसाक्षी सोडाच, आपलं जगणंही साक्षीभावानं पाहायला आपल्याला साधत नाही. आपल्या मनातील विचारांकडे, आपल्या कृतीकडे, दुसऱ्याकडून आपल्याशी होत असलेल्या व्यवहाराकडे आपण साक्षीभावानं अर्थात तटस्थपणे पाहू शकत नाही. तेव्हा असे अनेकानेक मर्यादांनी बद्ध असलेला, त्रिगुणबद्ध, साकार, देहाकारात बद्ध, एकदेशी आणि असाक्षी असा मी त्रिगुणातीत, निर्गुण, निराकार, सर्वव्यापी, सर्वसाक्षी भगवंताचा संग साधणार तरी कसा? तो संग मला लाभावा यासाठी त्या परमात्म्यानंच सोय केली आहे. जे त्रिगुणाने व्याप्त अशा जगात वावरत आहेत, जे स्वत: देहधारी अर्थात साकार आहेत आणि जे सदोदित भगवद्भावानं, भगवद्रसानं व्याप्त आहेत, असे श्रीसद्गुरू त्याकरिताच अवतीर्ण झाले आहेत. त्यांचा संग हा भगवंताचा संगच आहे.

Story img Loader