पैशाबाबत श्रीगोंदवलेकर महाराजांसह सर्वच संतसत्पुरुष आपल्याला सावध करतात याचं कारण पैशाचा आपल्या वृत्तीवर फार खोलवर प्रभाव पडत असतो. आपल्या वृत्तीला पैशामुळे आणि पैशानुसार वळण लागत असतं. पैशाची म्हणून एक सत्ता असते आणि सत्ता मग ती कोणतीही असो तिच्यातून अहंकार वाढल्यावाचून राहात नाही. तो अहंकार थोपविणेसुद्धा मोठय़ा बलवानाचे काम आहे, मग तो नष्ट होण्याची गोष्टच दूर. म्हणूनच श्रीमहाराज पैशाच्या या प्रभावापासून दूर राहायला सांगत आहेत. पैशापासून नव्हे. एके ठिकाणी तर श्रीमहाराजांनी असंही म्हटलं होतं की, ज्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत जास्तच पैसा देतो! तेव्हा पैशाचा असा वृत्तीवर परिणाम होतो आणि वृत्ती घडविणे हाच तर परमार्थ आहे! एकदा एकानं श्रीमहाराजांना विचारलं, महाराज मोटरगाडी घेऊ का? हे जे प्रश्न आहेत ना, ते कसे आहेत माहीत आहे? श्रीमहाराजच म्हणतात, ‘‘प्रत्येकजण थोडय़ा मर्यादेपर्यंत ऐकतो. तेसुद्धा बारीकसारीक गोष्टींत. कपडे कोणते करावे, भाजी कोणती आणावी, वगैरे गोष्टी विचारतो. पण नोकरी सोडून ये म्हणून सांगितले तर मात्र तयार होत नाही. खाण्यापिण्याच्या वगैरे सोयी आहेत तोपर्यंतच परमार्थाची मजल आहे. खरे म्हणजे सर्व सोडून परमार्थ करण्याची गुरूची आज्ञा आहे’’(बोधवचने, क्र. ९१३). आता या वाक्याचा नंतर कालौघात आपण स्वतंत्र विचार करूच. तोवर ‘खरे म्हणजे सर्व सोडून परमार्थ करण्याची गुरूची आज्ञा आहे,’ यानं बिचकू नका! तेव्हा यानं विचारलं, गाडी घेऊ का? महाराज म्हणाले, ‘घ्या पण पायी चालणाऱ्यापेक्षा स्वतला श्रेष्ठ समजू नका!’ पैसा मात्र श्रेष्ठत्वाचा गंड फुलवतो. पैसा आला की श्रीमंती आली आणि श्रीमंती आली की समाधान आलंच, असं आपलं साधंसोपं समीकरण असतं. पण श्रीमहाराज तर पैसा आणि समाधान यांचीच फारकत करतात! ते म्हणतात, ‘‘समाधान ही खरी श्रीमंती. पैसा ही श्रीमंती नाही..’’ आता पैशानंच श्रीमंती येते आणि श्रीमंतीनेच समाधान येते, या आपल्या समीकरणाला हा तडाच आहे. श्रीमहाराज सांगतात, ‘‘समाधान ही खरी श्रीमंती. पैसा ही श्रीमंती नाही. ज्याला हाव अधिक तो गरीब व ज्याला आहे त्यात समाधान असते तो श्रीमंत होय’’(बोधवचने, क्र. ११२). आपल्याला असंही वाटतं की, पैसा आला की देहसुखाची साधनंही सहज उपलब्ध होतात. एकदा देहाला सुख निर्वेधपणे मिळण्याची सोय झाली की मनही कायमचे सुखी, समाधानी होईल. आपल्या मनातल्या या विचारालाही तडा देत श्रीमहाराज सांगतात, ‘‘देहाला सुख देऊन मनाला सुख येणार नाही. समाधान मनाचा धर्म आहे. मन भगवंताशी चिकटले तर समाधान येईल’’ (बोधवचने, क्र. ११९). ही वाक्ये वाचून आपल्याला वाटेल, पैशाशिवाय समाधान कधी तरी शक्य आहे का? पैशाशिवाय प्रपंच साधणं शक्य आहे का? पैसा असला तर किती धीर येतो! आपल्या या मान्यतेलाही तडा देत, पैसा आणि धीर यांचीही फारकत करीत श्रीमहाराज सांगतात, ‘‘प्रपंचात पैशाच्या इतकीच धीराची गरज आहे’’ (बोधवचने, क्र. ४०१).
८६. फारकत
पैशाबाबत श्रीगोंदवलेकर महाराजांसह सर्वच संतसत्पुरुष आपल्याला सावध करतात याचं कारण पैशाचा आपल्या वृत्तीवर फार खोलवर प्रभाव पडत असतो. आपल्या वृत्तीला पैशामुळे आणि पैशानुसार वळण लागत असतं. पैशाची म्हणून एक सत्ता असते आणि सत्ता मग ती कोणतीही असो तिच्यातून अहंकार वाढल्यावाचून राहात नाही.
First published on: 02-05-2013 at 12:15 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 86 divorce