पैशावर आघात करण्यासाठी पैशाचं खरं स्वरूप श्रीमहाराजांसह सर्वच संतांनी वेळोवेळी समजावून सांगितलं आहे. एक लक्षात घ्या, जगताना पैशाची असलेली गरज त्यांनी नाकारलेली नाही किंवा स्वकष्टानं पैसा कमवायला आणि वाचवायला विरोध केलेला नाही. त्या पैशाचा गर्व बाळगायला, त्या पैशालाच सर्वस्व मानायला, त्या पैशालाच आधार मानून मनानं त्याचं गुलाम व्हायला त्यांचा विरोध आहे. श्रीगोंदवलेकर महाराजांनी स्पष्ट बजावलं आहे, ‘‘पैसा हा काही आयुष्याचे सर्वस्व नव्हे, किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय नव्हे की म्हणून तो वाटेल त्या मार्गाने मिळवावा! तो नीतिधर्मानेच मिळवावा’’ (चरित्रातील पैसाविषयक बोधवचने, क्र. १). तेव्हा पैसा मिळवायला त्यांचा विरोध नाही; तो मिळवण्याचा मार्ग मात्र नीतिधर्माला अनुसरून असला पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष आहे. महाराजही सांगतातच की, ‘‘अगदी संन्यासी झाला तरी त्याला पैसा हा हवाच’’(चरित्रातील वचने- पैसा. क्र. ३०). तेव्हा पैशाचं व्यवहारातलं स्थान त्यांनाही माहीत आहे. आपल्याप्रमाणेच संन्याशालाही पैशाची गरज असते. मात्र दोघांचा पैशाकडे पाहाण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. पैशाचं खरं स्वरूप लक्षात घेऊनच संन्याशी व्यवहारापुरता पैसा बाळगतो. आपण मात्र पैशाचं खरं स्वरूप न जाणता, त्या पैशालाच सर्वस्व मानून तो मिळवत राहाण्यासाठी अहोरात्र धडपडत असतो. पैशाचं स्वरूप-पैशाचं स्वरूप, असं बरेचदा आपण ऐकलं. काय आहे हो हे स्वरूप? श्रीमहाराजांसह सर्वच संतांचं उत्तर आहे, पैसा दुखरूप आहे! हे उत्तर आपल्याला रुचणारं नाही, पटणारं नाही हे ते जाणतातच. ते उत्तर नाकारलं नाही किंवा पटलं तरी पैसा मिळवणंही आपण थांबवणार नाही, हेसुद्धा ते जाणतात. मग हा पैसा दुखरूप कसा? श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘पैसा असेल तर दुख देतो आणि तो नसेल तरी दुख देतो म्हणून तो मुळातच दुखरूप असला पाहिजे’’(चरित्रातील वचने- पैसा. क्र. २७). पैसा नसेल तर किती तळमळ होते, ते आपल्याला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे तो नसेल तर दुख देतो, हे पटेल. पण तो असेल तर दुख देतो, हे पटणार नाही. काहीजण तर प्रार्थनाही करतील की, महाराज पैसा असेल तर दुख देतो, हा अनुभव घेता यावा यासाठी आधी भरपूर पैसा द्या हो! जरा नीट पाहिलं तरी जाणवेल की, असलेला पैसा कसा दुख देतो, याची जिवंत उदाहरणं आजूबाजूला घडत असतात. कोटय़वधीच्या मालमत्तेसाठी खून पडतात. नातीगोतीही त्याला अपवाद ठरत नाहीत. माणसापेक्षा जेव्हा तो राहातो त्या जागेची किंमत मोठी होत जाते तेव्हा त्या माणसाला तिथून हुसकवायला आणि प्रसंगी मार्गातून येनकेनप्रकारेण दूर करायलाही मागेपुढे पाहिले जात नाही. पैशासाठी लहानग्यांचे अपहरण करायला आणि त्यांची हत्या करायला मागेपुढे पाहिले जात नाही. तेव्हा पैसा नसून दुख देतोच पण असूनही दुख देतो तेव्हा तो दुखरूपच आहे. आता दुखरूप असला तरी त्याचं व्यवहारातलं स्थान काही कमी होत नाही. मग साधकानं पैसा कमवताना आणि साठवताना काय दृष्टिकोन ठेवावा?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा