जीवनातील गोंधळ संपायला हवा असेल, अतृप्ती संपायला हवी असेल तर बुद्धी, क्रियाशक्ती आणि अंतर्मुख होऊन आत्मनिरीक्षण करण्याची शक्ती या तिन्ही शक्तींचा संयोग होऊन जीवन प्रवाहित झालं पाहिजे. नुसत्या बुद्धी आणि क्रियाशक्तीच्या बळावर ते होणार नाही. त्यासाठी अंतर्मुख होऊन आत्मनिरीक्षण साधलं पाहिजे. त्यासाठी आंतरिक सूक्ष्म सद्बुद्धीचाच आधार घेतला पाहिजे. तो कसा घ्यायचा, हे संतसद्गुरूंकडूनच शिकता येते, असं माउली सांगतात. माउलींची एक ओवी आहे- ‘‘जैसी दीपकळिका धाकुटी। परी बहु तेजातें प्रगटी। तैसी सद्बुद्धि हे थेकुटी। म्हणों नये।।’’(अध्याय २, ओवी २३८). म्हणजे दिव्याची ज्योत असते अगदी लहानशी पण ती पूर्ण खोली उजळून टाकते. अगदी त्याचप्रमाणे सद्बुद्धी सूक्ष्म आहे म्हणून तिला हीन लेखू नका! ती अवघं जीवन उजळून टाकू शकते. ओशोंनी एका प्रवचनात सांगितलेली एक गोष्ट इथे आठवते. एक माणूस वाट तुडवत होता. अंधार पडला. त्याच्या हातात एक दिवा होता. त्यानं लांबवर पाहिलं. रस्ता केवढा दूपर्यंत गेला होता. सगळीकडे गर्द अंधार, रस्ता इतका मोठा आणि हातात एवढासा दिवा. एवढय़ाशा दिव्याच्या प्रकाशात हा दीर्घ रस्ता नाही चालून जाता येणार. या विचारानं निराश होऊन तो बसून राहिला. थोडय़ाच वेळात एक म्हातारा चालत येताना दिसला. त्याच्या हातात एक लहानशी चिमणी होती. तिचा प्रकाश जेमतेम पाऊलभर अंतरावर पडत होता. हा तरुण का बसून राहिला आहे, याचं कारण म्हाताऱ्याला कळलं आणि त्याला हसूच आलं. तो म्हणाला, ‘‘बाबा रे चल माझ्याबरोबर.’’ तो तरुण म्हणाला, ‘‘तुमच्या हातातल्या चिमणीचा जेमतेम पाऊलभर अंतरावर प्रकाश पडत आहे. तिच्या आधारावर तुम्हीसुद्धा जाऊ नका.’’ म्हातारा म्हणाला, ‘‘बाबा रे, आजवर एका पावलात पाऊलभर अंतरापेक्षा अधिक कोणी चाललं आहे का? आणि मी एक पाऊल पुढे टाकीन तेव्हा प्रकाशही पाऊलभर पुढे जाईलच ना? पावलोपावली हा रस्ता केव्हाच सरेल.’’ अगदी त्याचप्रमाणे सद्बुद्धीच्या प्रकाशात भविष्यातल्या स्वप्नांचे इमले कदाचित प्रकाशमान होणार नाहीत, पण आज कसं वागावं, याचा निर्णय घेणं साधेल. वागण्यातली विसंगती कमी होऊ लागेल. जगणं सुसंगत होईल. पण या सद्बुद्धीची जाण सद्गुरूंशिवाय येऊ शकत नाही आणि टिकूही शकत नाही. आयुष्य कसं जगाल, हे सांगणारी हजारो पुस्तकं बाजारात आहेत. ती  वाचून काही जगणं सुधारता येत नाही. क्षणोक्षणी त्यासाठी प्रेरणा देणारा, शिकवण देणारा, कृती करून घेणारा सद्गुरू अनिवार्यच असतो. त्यांच्या आधाराशिवाय उचित काय आणि अनुचित काय, हे समजू शकत नाही. या दोहोंतला खरा भेद उघड होत नाही. अनेकदा जे अनुचित आहे तेच आपल्याला उचित वाटतं आणि जे उचित आहे तेच अनुचित वाटतं! तेव्हा सद्गुरू बोधाच्या आधारावर जे उचित कर्म आहे त्याकडेच मनाला वळवत राहण्याचा अभ्यास केला पाहिजे. अनुचित कर्म प्रारब्धवशात जरी वाटय़ाला आलं असलं तरी ते टाळण्याचं स्वातंत्र्य माणसाला आहे. ते कसं हे आता जाणून घेऊ.