भारतातील आर्थिक उदारीकरणाची सर्वात मोठी देणगी काय, तर एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या नव्या पिढीच्या खासगी बँकांना वाढीसाठी मिळवून दिलेला अवकाश. एचडीएफसीचे आदित्य पुरी आणि त्यांचे डझनभर निष्णात – ‘डर्टी डझन’- सवंगडी  यांनी सुरू केलेल्या बँकेचा हा अलिप्तपणे घेतलेला वेध आहे. अवाजवी धाडस न करणारी, सनातनी, शिस्तप्रिय अशा बँकेच्या संथ-संयत वाटचालीची ही रसदार कथा  कौतुकास्पदच म्हणायला हवी.
आपल्या देशाला बँकिंगचा खूप मोठा इतिहास आहे, पण नाव घेण्याजोग्या बँका मात्र नाहीत. काही बँकांनी शतकी-दोन शतकी वाटचालीचा टप्पा जरूर गाठला आहे, पण आजही देशातील जवळपास ४० टक्के लोकसंख्येचे बँकेत साधे खातेही नाही. अशा स्थितीत अठरा वर्षांपूर्वी १९९५ साली एका बँकेची नव्याने स्थापना होते आणि आज ती भारतातीलच नव्हे, तर जगातील मोजक्या चार-पाच मौल्यवान बँकांच्या पंक्तीत जाऊन बसते. होय, खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने भारताच्या ८५ लाख कोटी रुपयांच्या बँकिंग उद्योगात अल्पावधीत उमटवलेला वेगळेपणाचा ठसा केवळ थक्क करणारा आहे. व्यवसायाने दुसऱ्या क्रमांकाची, पण शेअर बाजार मूल्यांकनात देशातील बँकिंग अग्रणी स्टेट बँकेलाही पिछाडीवर टाकणारी कामगिरी एचडीएफसी बँकेने अल्पावधीत केली आहे.
दोन दशकांच्या भारतातील आर्थिक उदारीकरणाची सर्वात मोठी देणगी काय, तर एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या नव्या पिढीच्या खासगी बँकांना वाढीसाठी मिळवून दिलेला अवकाश. ज्येष्ठ पत्रकार तमल बंदोपाध्याय यांनी ‘अ बँक फॉर दी बक’ या पुस्तकात भारताच्या बँकिंग व्यवस्थेतील ही यशोगाथा अनेक अज्ञात-अकथित किस्से-घटनाक्रम वस्तुनिष्ठ पण गोष्टरूपाने उलगडली आहे. भारतातील कोणत्याही बँकेचे सर्वाधिक काळ पुढारपण केलेले या बँकेचे मुख्याधिकारी व व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी आणि त्यांनी गोळा केलेले डझनभर निष्णात सवंगडी- ज्यांचा उल्लेख लेखक ‘डर्टी डझन’ असाच करतो- यांनी सुरू केलेल्या भारतातील नव्या बँक चळवळीचा हा अलिप्तपणे घेतलेला वेध आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने जवळपास दशकभरानंतर नव्या खासगी बँकांसाठी दार खुले केले असताना, येऊ घातलेल्या नव्या बँकांच्या शिलेदारांसाठी एचडीएफसी बँकेची ही कथा उद्बोधक ठरावी.
अगदी बेताच्या योजना आखून अत्यंत साध्यासुध्या गोष्टीच एचडीएफसी बँकेने इतक्या वर्षांत करू पाहिल्या, पण त्याचे परिणाम मात्र विलक्षण असाधारण दिसून आले. कसे तर, या गोष्टी साकारण्याची एचडीएफसी बँकेची पद्धत काही औरच होती आणि हेच या बँकेचे सर्वात ठसठशीत वेगळेपण असल्याचे तमल सांगतात. हे वेगळेपण बँकेचे पुढारपण करणारे आदित्य पुरी आणि आज वेगवेगळ्या ठिकाणी नेतृत्वस्थानी असलेले ‘डर्टी डझन’मधील त्यांच्या सहकाऱ्यांमुळेच शक्य झाले आहे. कथा-कादंबरीत शोभून दिसतील अशी उभी केलेली ही पात्रे, प्रारंभीचे एचडीएफसी बँकेचे मुख्यालय म्हणजे वरळीच्या सँडोझ हाऊसमधील या पात्रांच्या स्त्री-विहीन गमतीजमती, घटना व त्यांची नाटय़मय वर्णने यामुळे पुस्तकाला ओघवते रूप आले आहे. दुसरा गुणविशेष भाषेचा. आर्थिक पत्रकारितेत बँकिंग क्षेत्राचे वार्ताकन करणारे पत्रकार तमल यांच्या स्तंभलेखनाची पारायणे करतात असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.
अगदी छोटय़ा छोटय़ा जेमतेम ५००-६०० शब्दांच्या लक्षवेधी पोटमथळे असलेल्या परिच्छेदांमधून प्रसंग, घटना, कालानुक्रम यांची तमा न बाळगता ही कथा पुढे सरकत जाते. एका तरुण वळणावर हे बारा सवंगडी बहुतांश बँक ऑफ अमेरिका आणि सिटी बँक या अमेरिकेच्या बँकांतील मोठय़ा हुद्दय़ाची, गुबगुबीत पगार, विदेश वाऱ्यांसह आलिशान निवास आणि नाना प्रकारचे भत्ते आणि आमिषे सोडून एकत्र आली. दीपक अथवा आदित्य या सुहृदांकडून आलेला शब्द मोडणे त्यांना कठीण होतेच, पण भारतात येऊन काही तरी करू पाहण्याची ऊर्मीही होती. तत्कालीन नरसिंह राव-मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरण आणि खुलीकरणाचा अंगीकार करून निर्माण केलेल्या नव्या तरंगातून आलेले भारावलेपणही याला म्हणता येईल.
आपल्याच समूहाकडून सुरू होत असलेल्या बँकेचे पुढारपण करण्यासाठी दीपक पारेख यांनी सिटी बँकेतील जुन्या मित्राला हेरले. आदित्य यांना हे नव्या जबाबदारीचे आव्हान तेही तुलनेने कमी मोबदल्यात स्वीकारणे फारसे पटलेले नव्हते. दीपक यांनी एकीकडे आदित्यची मनधरणी, तर दुसरीकडे आदित्यचा होकार न आल्यास प्लॅन बीची तयारीही सुरू ठेवली होती. पडद्याआड राहून  दीपक पारेख यांनी बँकेला प्रारंभिक उभारी देणारा व्यवसाय मिळवून दिला. इतकेच नव्हे तर ‘डर्टी डझन’ सवंगडय़ांसाठी उपनगरात साजेसे घर मिळवून देण्याची, त्यांच्या सामनांची हलवाहलव, मुलांसाठी ओळखीच्या शाळेत प्रवेश वगैरे कामेही विनातक्रार केली.
एचडीएफसी बँक चालू होण्यापूर्वी बँकिंग होते, पण खासगी बँकांचा संचार नव्हता. राष्ट्रीयीकृत बँकांना अनेक अंगाने विशेषाधिकार प्राप्त होता. जसे प्राप्तिकर गोळा करण्याची मुभा २००३ पर्यंत मोजक्या राष्ट्रीयीकृत बँकांना होती. एचडीएफसी बँकेने गोळा केलेली रक्कम तीन दिवसांच्या आत सरकारी खजिन्यात जमा करण्याच्या हमीने ती मिळवली. सरकारी बँका यासाठी त्या वेळी १० दिवस घेत होत्या. लोकांकडून होणारा करभरणा २०१२ साली एचडीएफसी बँकेने तब्बल दीड लाख कोटींच्या घरात नेला असून, महाकाय स्टेट बँकेकडून गोळा रकमेपेक्षा किंचित कमी तो दुसऱ्या क्रमांकाचा आहे. सरकार तसेच आयुर्विमा महामंडळाच्या रोख हाताळणीचा हा व्यवसाय फार मोठे कमिशन मिळवून देणारा नसला तरी एक-दीड दिवसासाठी फार मोठा निधी विनामोबदला हाताळायला मिळतो तर तो घ्यावा, हा व्यावसायिक दृष्टिकोनातील फरकच एचडीएफसी बँकेची अन्य बँकांपासून ठळकपणे फारकत करणारा आहे. दैनंदिन बैठकांमधून बिस्किटांना फाटा, बँकेच्या प्रत्येक शाखेमध्ये प्लास्टिक ग्लासाऐवजी प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वत:चे कॉफी-मग घेऊन येण्याचा फतवा, अधिकाऱ्यांना ‘इकॉनॉमी क्लास’ने हवाईभ्रमणाची सक्ती अशी चिंगूस कार्यसंस्कृती जपणाऱ्या या बँकेने त्या काळी जगातील सर्वाधिक महागडे बँकिंग-तंत्रज्ञान बिनदिक्कत स्वीकारले. दलाल पेढय़ांना अर्थसाहाय्य हा वाणिज्य बँकांच्या दृष्टीने खूप जोखमीचा व्यवसाय, तर एचडीएफसी बँकेने आपल्या तंत्रज्ञानात्मक सामर्थ्यांच्या बळावर ही पोकळी सहज भरून काढून व्यावसायिक यश कमावले. २००० सालात भारतात मोबाइल बँकिंग सुरू करणारी ही पहिली बँक ठरली ती तंत्रज्ञानाच्याच जोरावर. रिटेल व्यवसायात उशिराने उतरूनही आज एचडीएफसी बँकेच्या एकूण व्यवसायातील रिटेलचा हिस्सा निम्म्याहून अधिक आणि अन्य कोणत्याही बँकेपेक्षा, अगदी आयसीआयसीआय बँकेपेक्षा सरस बनला आहे. आजच्या घडीला सर्वात मोठा क्रेडिट कार्ड व्यवसाय असणारी ही बँक आहे.
अवाजवी धाडस न करणारी, सनातनी, शिस्तप्रिय अशा बँकेच्या संथ-संयत वाटचालीची ही रसदार कथा  कौतुकास्पदच म्हणायला हवी.

Story img Loader