भूगोल इतिहास घडवतो आणि या इतिहासाचा भूगोल भागीदारही असतो. या सहयोगाने नसर्गिक व मानवनिर्मित वस्तूंची देवाणघेवाण, देशात आणि देशाबाहेर होऊ लागते. त्यातून नागरीकरणाला, संकराला आणि स्थलांतराला सुरुवात होते. भाषा, संस्कृती, साहित्य, कला यांचा उदय होतो. भारताचेही तसेच झाले. त्याचा हा संक्षिप्त भूगोल-इतिहास..
गंगेच युमुनेचव गोदावरी सरस्वती
नर्मदा, सिंधु, कावेरी जलेस्मिन् संनिधं कुरु
सकाळी अंघोळ करताना म्हणावयाचा हा पारंपरिक श्लोक! सात पवित्र नद्यांचे पाणी अंघोळीच्या पाण्याच्या घंगाळात-बादलीत सामावले आहे, अशी प्रार्थना करून अंघोळीला सुरुवात केली जाते. दिवसाची सुरुवातच अशी सप्तसिंधूच्या स्मरणाने होते, इतके त्यांचे महत्त्व आहे.
संजीव संन्याल यांनी लिहिलेले ‘लँड ऑफ द सेव्हन रिव्हर्स – अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ इंडियाज् जिओग्राफी’ हे पुस्तक सप्तसिंधूंविषयी असून काहीसे ‘हटके’ आहे. भारताविषयी आणि प्राचीन हिंदू धर्म-संस्कृतीविषयी आपले मत कधी न्यूनगंडाने तर कधी अहंगंडाने पछाडलेले असते, याची प्रचीती हे पुस्तक वाचताना येते. इतिहासलेखनाचे नियम आणि तत्त्वे सांभाळून हे लिखाण केले गेल्याने ‘टिपिकल’ प्रचारकी, सेक्युलर अथवा टोकाच्या अशा सनातन हिंदू-भारतीय लेखनाप्रमाणे ते नाही.
भूगोल इतिहास घडवतो आणि या इतिहासाचा भूगोल भागीदार असतो. या दोघांच्या सहयोगाने नसíगक व मानवनिर्मित वस्तूंची देवाणघेवाण, देशात आणि कालांतराने देशाबाहेर होऊ लागते. या आदानप्रदानातून, व्यापारातून सुरुवातीला नागरीकरणाला आणि नंतर संकर तसेच स्थलांतराला सुरुवात होते. भाषा, संस्कृती, साहित्य, कला यांचा उदय होतो. आपल्यावरील तुर्की, मुगल, ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच अशा परकीय-दीर्घ सत्तांमुळे, जसा आपला भूगोल व व्यापार बदलत गेला तसा इतिहासही घडत गेला, संस्कृती घडत गेली. पण इतिहासाचे लेखन होताना मात्र तो सत्ताधाऱ्यांच्या बाजूने लिहिला गेला. याची समोरून प्रतिक्रियाही तशीच टोकाची आणि अतिरंजित लेखनाची झाली.
या संदर्भात प्रस्तुत पुस्तकातले काही मुख्य मुद्दे.
– सरस्वती नदीकाठचे भरभराटीला आलेले नागरीकरण, जशी नदी आटत गेली तसे लयाला गेले. या लयाचा विचार, अभ्यास केल्याशिवाय भारताच्या इतिहासाचा प्रवाह समजून घेता येणार नाही.
– भारतीय लोक भूगोल, इतिहास, नागरीकरण यांविषयी पाश्चात्त्यांच्या तुलनेत मागासलेले होते, अशी समजूत आहे, ती खरे नाही.
– नवीन संशोधनानुसार भारतीय उपखंड आता जसा भौगोलिकदृष्टय़ा स्वतंत्र आहे, तसा पूर्वी नव्हता, तर आफ्रिका व मादागास्करशी जोडलेला होता.
– ख्रिस्तपूर्व १५००च्या दरम्यान आर्य (इंडो-युरोपियन) घोडे आणि पोलादी तलवारी घेऊन आशियावर आक्रमण करून आले. त्यांनी त्यानंतर भारताचे नागरीकरण केले अशी समजूत आहे. ती घट्ट करणे युरोपीय ब्रिटिशांच्या सोयीचे होते. परंतु नवीन संशोधनाकडे पाहिले असता सरस्वती काठचे ‘द्रविडी-हडाप्पा’ नागरीकरण हे त्याहून खूपच प्राचीन व प्रगत होते.
– हार्वर्ड मोडिकल स्कूलच्या डेव्हीड रीच या शास्त्रज्ञाने २००९मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनानुसार भारतातील लोक हे प्राचीन दक्षिण भारतीय (Ancestral South Indian) आणि प्राचीन उत्तर भारतीय (Ancestral North Indian) या दोन ढोबळ गटांत विभागले जातात. यातील दक्षिणेकडील प्रजा ही युरोप, पूर्व आशिया वा इतर कोणत्याही वंश-गटाशी संलग्न नाही. पण उत्तर भारतातील लोकांमध्ये काहीसा युरोपियन संकर आढळतो. उत्तरेतील R1a1 हे जैविक मिश्रण (Gene Mutation) हे उत्तर भारतीयांत आणि पूर्व युरोपीयन, चेकोस्लोवाकिया, पोलंड, लिथुआनिया, दक्षिण सबेरिया, कझाकिस्तान, उत्तर पूर्व इराण आणि कुर्दस्तिान यात सामायिक आढळते. जसा उत्तर भारतीय मानव हा कोणत्याही एका वंशाशी निगडित नाही, त्याचप्रमाणे दक्षिण भारतीय मानवही कोणत्याही एका वंशाशी निगडित नाही. त्यामुळे शुद्ध वंश असे काही भारतात अस्तित्वात नाही.
– प्राचीन भारतीय इतिहासात दोन स्रोत उपयोगाचे पडतात-१) पुरातत्त्व पुरावा आणि २) वैदिकपरंपरेतील साहित्य रचना. यांचा थेट संबंध हडप्पन, इंडस व्हॅली किंवा इंडस-सरस्वती नागरी प्रस्थापनेशी आहे. १९२०च्या दशकात राखाल दास बॅनर्जी, सर जॉन मार्शल या भारतीय पुरातत्त्व खात्यांतील संशोधकांनी आणि दयाराम सहानी या शास्त्रज्ञाने हडप्पन संस्कृतीचा शोध लावेपर्यंत, आर्य संस्कृतीचे अवडंबर कमी झाले नव्हते. मोहंजोदडो या एकाच शहरात ५०,०००पेक्षा जास्त लोक राहत होते आणि या शहरात ६०० ते ७०० विहिरी होत्या. याचा अर्थ तेथील मानवाचे वास्तव्य, नागरी जीवनाचे अस्तित्व बऱ्याच काळापर्यंत अस्तित्वात होते आणि ते आर्याच्या आगमनापूर्वी होते. हडप्पन भारतीय आणि आर्य यांतील विशेष फरक हा घोडय़ांच्या वापराचा आहे. हडप्पन संस्कृतीत घोडे नव्हते, आर्य घोडे घेऊन आले. ऋग्वेदातील आर्याचा उल्लेख हा खास करून घोडय़ांच्या संदर्भात येतो.
– हिंदूंच्या सर्वात जुन्या रचनांपकी ऋग्वेद ही रचना आहे आणि ती आजही पवित्र मानली जाते. ऋग्वेदात सरस्वतीचा उल्लेख ‘नदीस्तूतीसूक्त’ या रचनेत आला आहे. सरस्वतीचे भौगोलिक स्थान यमुना आणि सतलजमध्ये असल्याचे म्हटले आहे. गंगेचा उल्लेख मात्र नाममात्र असाच आहे. अलाहाबादमध्ये जिथे यमुना आणि गंगेचा संगम होतो, तिथेच जमिनीखाली सरस्वती वाहत असावी असे संन्याल यांचे मत आहे.
– सप्तसिंधू (या सात नद्या) हे ऋग्वेदाचे उगम स्थान होय. कदाचित सप्तसिंधू म्हणजे फक्त सरस्वती आणि वर्णघात होऊन सप्तसिंधूचे ‘हप्तिहदू’ असे नामकरण झाले आणि त्यातून हिंदू हे नाव उदयाला आले. (‘हिंदू’ या शब्दाच्या आणखी दोन व्याख्या सापडतात. १. हिंदेन – इजिप्शीयन भाषेत कापसाला िहदेन म्हणत असत. कापूस भारतातून इजिप्तला गेला या संदर्भात हिंदेनचे हिंदू झाले असावे. २. इंडस-सिंधू नदीच्या जवळ हिंदूकुश आदी ठिकाणी राहणारे लोक ते हिंदू असेही असावे.)
– ‘दहा राजांचे युद्ध’ असा जो एका महायुद्धाचा उल्लेख ऋग्वेदात येतो ते युद्ध पंजाबातील रावी नदीच्या किनारी झाले. दहा वेगवेगळ्या टोळ्यांनी एकत्र येऊन ‘भारत’ नावाच्या बलाढय़ टोळीवर हल्ला केला. ऋग्वेदामध्ये भारत या टोळीचा उल्लेख त्रुसू असाही येतो. भारत ही टोळी आज जिथे हरयाणा आहे तेथील. भारत या टोळीचे गुरू वसिष्ठ (आणि त्यांचे शत्रू विश्वामित्र) होत. या टोळीने इतर टोळ्यांचा दणदणीत पराभव केला. या टोळीच्या नावावरून आपल्या देशाला ‘भारत’ हे नाव पडले असावे.
– भारत या बलाढय़ टोळीने पराभूत केलेल्या टोळ्यांपकी दोन मोठय़ा टोळ्या म्हणजे द्रुया (Druhya) आणि पारसू (Parsu) या होय. त्यातील द्रुया या टोळीला पंजाबातून पूर्व अफगाणिस्तानात हाकलण्यात आले. ‘गंधर्व’ हा त्यांचा राजा. त्यावरूनच आजचे ‘कंदाहार’ हे नाव रूढ झाले. म्लेंच्छ (Mlechhas) या शब्दाचा अर्थ राक्षसी वृत्तीचे परकीय लोक असा होतो. द्रुया या टोळीचा उल्लेख ऋग्वेदात म्लेंच्छ (Mlechha) असा केलेला आढळतो.
– दुसरी टोळी पारसू. ही टोळी बरेच अंतर गाठत पाख्ता या टोळीबरोबर (आजचे पख्तून) पार पíशयाच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचली. तिथे गेल्यावरही त्यांनी आपला आर्य धर्म टिकवून ठेवला. पíशयात न आढळणारा सिंह हा परसूनी आपले प्रतीक म्हणून कसा वापरला? कारण त्यांना सिंह-आर्यावर्तामुळे माहिती होता. अगदी अलीकडे इराणच्या शहाचे प्रथम बिरुद हे ‘आर्य-मिहीर’ असेच होते. ऋग्वेद आणि झेंद अवेस्ता यांमध्ये आढळणारे साम्य सर्वश्रुत आहे. यातूनच सप्तसिंधू, हप्तिहदू हा वर्णबदल अभिप्रेत आहे. कालांतराने पर्शियातून यातीलच काही लोक इस्लामच्या हल्ल्यामुळे पारसी म्हणून भारतात परत आले.
– ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ ही महाकाव्ये, महायुद्धे दक्षिणापथ आणि उत्तरापथ या दोन महामार्गावर घडलेली दिसतात. सीता, द्रौपदीपेक्षा रेशीम, रत्ने, मसाले यांच्या व्यापारावर ताबा मिळवणे हे या युद्धांचे अर्थकारण असावे. (Helen of troy किंवा Cleopatra यांच्यामुळे झालेल्या युद्धांतसुद्धा, व्यापार हे मूळ कारण असल्याचे दिसते.)
प्राचीन भारतातील विजयनगर आणि आर्यावर्त हे दोन प्रांत वेगवेगळ्या काळी केंद्रिबदू होते. विजयनगरचे साम्राज्य आणि दौलताबादचा किल्ला यांची जशी महती पुस्तकात वर्णिली आहे, त्यापेक्षा अधिक महती ही आर्यावर्त, (म्हणजे आताचा हरयाणा) याविषयी आहे. आर्यावर्त हेच केंद्रस्थान धरून इतिहासाचे विश्लेषण संन्याल यांनी केले आहे. हरियाणाचे आजचे संदर्भ आर्यावर्ताशी कसे निगडित आहेत, तसेच आर्यावर्ताचे केंद्र म्हणजे आत्ताचे गुडगांव असे थोडेसे धाडसाचे विधान लेखक करतो.
अनेक शतकांच्या ‘गोंधळलेल्या आणि चिंचोळ्या’ आíथक सांस्कृतिक-इतिहासातून काही सूत्रे पकडण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखकाने केला आहे. वाचकाच्या मनातील अनेक सांस्कृतिक शंका आणि त्यापासून निर्माण होणारा गोंधळ काही प्रमाणात दूर करण्यात यशस्वीही झाला आहे. वर्तमानाचे भान ठेवून, साडेतीन-चार हजार वर्षांचा आढावा घेणे सोपे नाही. चीनपासून ते पíशयापर्यंत, व्हाया श्रीलंका एवढा प्रचंड भौगोलिक आवाका, चार सहस्रकांचा काळ आणि त्याचा आजच्या काळाशी असलेला संदर्भ असा प्रचंड कॅनव्हास हाताळताना कधी कधी लेखक वाहवत जातो, तर कधी कधी एकाच जागी थबकून राहतो, हे खरे! पण तीनशे पानांच्या पुस्तकात हे सगळे सामावणे ही तारेवरची कसरतच. सकस वाचणाऱ्यांसाठी हे पुस्तक चांगली मेजवानी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा