हे पुस्तक म्हणजे बदलत्या काळानुसार रुचेल, पचेल आणि झेपेल इतपत बदल स्वत:मध्ये करत आलेल्या सात पिढय़ांच्या दुर्दम्य प्रयत्नांचा संक्षिप्त इतिहास आहे.
एखाद्या वंशाच्या साखळीमधून माणसाने जपलेले आणि पुढच्या पिढय़ांकडे संक्रमित केलेले सांस्कृतिक संचित हीच माणसाची खरी मिळकत असते, तरीही काळानुसार बदल तर स्वीकारायला हवेत. किंबहुना पारंपरिक जगणे आणि आधुनिकतेचे संस्कार यांची सांगड तुम्हाला किती चतुराईने घालता येतेय यावरच तुमचे यशापयश अवलंबून असते ही आर. गोपालकृष्णन यांचे पुस्तक ‘अ कॉमा इन अ सेन्टेन्स’ या पुस्तकाची बॉटमलाइन आहे. गोपालकृष्णन हे भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रातील बुजुर्ग नाव. त्यांची याआधीची पुस्तकेही मार्केटिंग, व्यवस्थापन अशा विषयांशी संबंधित आहेत. या नव्या पुस्तकाचे स्वरूप मात्र खासगी असून, त्यात त्यांनी आपल्या सहा पिढय़ांचा कुलवृत्तांत काही ऐकलेल्या गोष्टी, काही इतिहासाचे संदर्भ, काही आठवणी, या स्वरूपात मांडला आहे. भारतीय समाजामध्ये पिढय़ान्पिढय़ांचे ज्ञान आणि शिक्षणाचा वारसा लाभलेल्या वर्गाने ही शिदोरी वापरून बदलत्या काळाशी हातमिळवणी केली. हे बदल प्रत्यक्ष अनुभवलेल्यांना हे छोटेखानी पुस्तक म्हणजे आपलीच कथा वाटू शकेल.
कावेरीच्या पाण्याने सुजलाम, भातशेतीने समृद्ध आणि मराठय़ांच्या विविध कलांना प्रोत्साहन आणि आश्रय देणाऱ्या राजवटीमुळे सांस्कृतिकदृष्टय़ा संपन्न झालेल्या तंजावरमधील वलल्लुडी नावाच्या छोटय़ाशा गावातील अग्रहारम म्हणजे ब्राह्मणांच्या वस्तीमध्ये राहणाऱ्या रंगनाथन आणि रंगनायिका या तामिळ अय्यंगार जोडप्यापासून गोपालकृष्णन यांच्या कुलवृत्तांताची सुरुवात होते. हा काळ आहे १८५७ चा. माहितीच्या दळणवळणाची कोणतीही साधने नसूनही शिपायांच्या बंडाच्या कहाण्या तंजावरमधील बाजाराच्या गावांमध्ये पोहोचत होत्या. आपल्या भातशेतीचा माल घेऊन या ठिकाणी जात असल्याने या गोष्टींची माहिती रंगनाथनला आहे. आपले जग खूप लहान असल्याची जाणीव या बातम्यांमुळे रंगनाथला होत असूनही गावातील देवळाचा मुख्य पुजारी म्हणून असलेला मान, आíथक, कौटुंबिक स्थर्य यांमुळे तो या छोटय़ा जगातही समाधानी असल्याचे दिसते. रंगनाथचा वीर राघवन व त्याची मुले या दोन पिढय़ांनी पाहिलेले बदल भारताची सुस्त सामाजिक चौकट ढवळून टाकणारे असले तरी त्याचा थेट परिणाम त्यांच्यावर झालेला दिसत नाही. उलट ब्रिटिशांनी आणलेली रेल्वे, टपालसेवा, वृत्तपत्रे अशा गोष्टी सामाजिक आणि आíथकदृष्टय़ा पुढारलेल्या या वर्गाला अधिक संपन्न करून गेल्याचे गोपालकृष्णन  सांगतात. त्याच वेळी या वर्गाविरोधात आणि संस्कृतच्या मुजोरीविरोधात दक्षिणेत उभ्या राहिलेल्या आत्मसन्मान चळवळीचे संदर्भही येतात.
एकूणच प्रत्येक पिढीने अनुभवलेले बदल आणि त्यानुसार बदललेली आपली जीवनपद्धती यांचा अनुक्रम लेखकाने पुस्तकात मांडला आहे. एका काळापुढे कपाळावरचा नाम कोणत्या प्रकारे काढायचा आणि धार्मिक विधींसाठी संस्कृत वापरायचे की तामिळ हा वादाचा मुद्दा आहे, तर पुढच्या काळामध्ये भारतीय भाषांसमोर थेट इंग्रजीचेच आव्हान उभे ठाकले आहे. त्यापुढील पिढी गावातील आपले छोटे जग सोडून मोठय़ा शहरांत स्थलांतरित झालेली दिसते. तेथील आधुनिक प्रकारच्या रोजगारामध्ये रुळण्यासाठी शेंडीला सोडचिठ्ठी देण्याचा पेच गोपालकृष्णन यांचे वडील राजम यांच्या पिढीसमोर आहे. या बदलांना सामोरे जाण्यामध्ये संघर्ष जरूर आहे, पण त्याचबरोबर पुढे जाण्यासाठी कर्मठपणाला थोडी मुरड घालण्याची तयारीही आहेच. समाजातील आपल्या स्थानाची निश्चित जाणीव आणि शिक्षणाची शिदोरी, इंग्रजीचे जुजबी ज्ञान यामुळे हा संघर्ष जीवघेणा न होता उलट तो प्रगतीसाठी पोषकच कसा बनला, हे या प्रकरणांतून स्पष्ट होते. खुद्द गोपालकृष्णन यांच्या पिढीपर्यंत हा झगडा जवळजवळ संदर्भहीन बनलेला दिसतो. या टप्प्याशी पोहोचल्यावर िहदुस्तान लिव्हर आणि टाटा सन्सच्या कार्यकालातील आठवणी ते प्रामुख्याने मांडतात. यात बदलत्या काळाचा संदर्भ आहे, पण तो परमिट राज ते जागतिकीकरण अशा प्रवासाचा आहे. आधुनिक शिक्षण, ग्लोबल समाजाशी परिचय, सधनता यांच्यामुळे धर्मपालन ही खासगी श्रद्धेची आणि प्राधान्यक्रमाची बाब उरलेली दिसते.
शेवटच्या प्रकरणात बराचसा आत्मसंवाद आहे. मागे वळून पाहताना, एके काळी अग्रहरममध्ये राहणाऱ्या आपल्या पूर्वजांशी तुलना आजही समाजाच्या उच्चभ्रू वर्तुळात वावरणाऱ्या स्वत:शी लेखक करतात आणि विशिष्ट कामांसाठी विशिष्ट वर्गाची नेमणूक करणारी वर्णव्यवस्था आजही वेगळ्या प्रकारे अस्तित्व टिकवून असल्याचे सांगतात. मात्र या नव्या रचनेमध्ये पूर्वीचा कर्मठपणा नसून कुणीही कोणत्याही वर्गामध्ये जाण्यास मोकळे असल्याचा युक्तिवाद करतात. पुढील पिढीनेही नवे बदल स्वीकारताना आपल्या पूर्वजांच्या संस्कारांचे संचित पुढे न्यावे, असे आवाहन ते पुस्तकाच्या शेवटी करतात. त्यातले नेमके तितकेच उचलणाऱ्या चाणाक्ष नव्या पिढीला ते वेगळे समजवायला नकोच.
अ कॉमा इन अ सेन्टेन्स :
आर. गोपालकृष्णन
रेनलाइट रूपा, नवी दिल्ली,
पाने : १६४, किंमत : २९५ रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा