विजया जांगळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्वी अवाढव्य वाटणारे जग एका टप्प्यावर ‘ग्लोबल व्हिलेज’ झाले. त्यामुळे या खेड्याच्या कोणत्याही कोपऱ्यातील प्रगतीचे लाभ जसे सर्व ग्रामस्थांना मिळू लागले, तसेच कोणत्याही कोपऱ्यातील समस्यांचे फटकेही संपूर्ण ‘खेड्या’ला बसू लागले. चीनमधून सुरू झालेल्या कोविडच्या साथीने याची प्रचीती दिली. त्यातून बाहेर पडतो न पडतो, तोच आज ‘आफ्रिकेतला आजार’ म्हणून ओळखला जाणारा मंकीपॉक्स युरोप खंडासह अनेक देशांत पसरला आहे आणि खेडे पुन्हा आरोग्य संकटाच्या वेशीवर राहिले उभे आहे.
मलेरिया, डेंग्यू, बर्ड फ्लू, चिकुनगुनिया, झिका, इबोला, एचआयव्ही, कावीळ, कोविड, मंकीपॉक्स… आपले हे खेडे सतत कोणत्या ना कोणत्या साथींनी ग्रासलेलेच असते. या खेड्याच्या नेमक्या कोणकोणत्या गल्ली-बोळांतून या साथी सुरू झाल्या हे पाहू या..

मलेरिया- अल्जेरिया (उत्तर आफ्रिका)
डेंग्यू- फिलिपाइन्स (आशिया)

बर्ड फ्लू- चीन (आशिया)
चिकुनगुनिया- टांझानिया (पूर्व आफ्रिका)

झिका- युगांडा (पूर्व आफ्रिका)
इबोला- रिपब्लिक ऑफ काँगो आणि दक्षिस सुदान (मध्य आफ्रिका)

एचआयव्ही- बेल्जियन काँगो- (मध्य आफ्रिका)
कावीळ हेपॅटायटीस बी- (उत्तर आफ्रिका)

कोविड १९- चीन (आशिया)
मंकीपॉक्स- डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (मध्य आफ्रिका)

अर्थात ही या साथरोगांच्या उगमांची ज्ञात ठिकाणे. यातील कित्येक विषाणू कित्येक शतकांपूर्वीपासून जगाच्या पाठीवरील कुठल्या ना कुठल्या जंगलांत उपस्थित असतील. कोणत्या ना कोणत्या वन्यजीवांच्या शरीरांवर पोसले असतील, कदाचित त्यांनी त्या काळातही मानवाला भेडसावले असेल. असे असले तरी वरील यादी पाहता आज मानवाला भेडसावणाऱ्या अनेक साथरोगांपैकी बहुतेक रोगांचा उद्रेक हा आफ्रिका खंडातून झाल्याचेच दिसते. आशिया आणि युरोपातूनही काही साथींचा उद्रेक झाला, मात्र आफ्रिका हा नेहमीच ‘संसर्गजन्य खंड’ म्हणून गणला गेला. त्या मागची कारणे पाहता, ती तेथील भौगोलिक स्थिती, हवामान आणि पर्यावरणाप्रमाणेच तेथील सामाजिक- आर्थिक स्थितीतही आढळतात.

वाढती लोकसंख्या

जगातली सुमारे ६० टक्के लोकसंख्या आशिया आणि आफ्रिका खंडांत एकवटलेली आहे. या दोन्ही खंडांत गेल्या काही वर्षांत प्रचंड वेगाने शहरीकरण झाले. त्यासाठी अमाप जंगलतोड करण्यात आली. माणूस, त्याचे पाळीव प्राणी आणि वन्य प्राणी यांत असलेले अंतर घटत गेले. या वन्य प्राण्यांबरोबर आजवर घनदाट जंगलांपुरते सीमित असलेले विषाणू या वस्त्यांत आणि तिथून जगभर पसरले. आशिया खंडातही साधारण अशाच स्वरूपाचे बदल घडले.

हवामान व भौगोलिक स्थिती

आफ्रिकेच्या नकाशाची आशिया किंवा युरोपच्या नकाशाशी तुलना करता लक्षात येते की आफ्रिका खंड हा तुलनेने उभा म्हणजे विविध रेखांशांत पसरलेला आहे. याउलट आशिया, युरोप हे विविध अक्षांशांत पसरलेले आहेत. साहजिकच आफ्रिकेतील विविध देशांत हवामान आणि भौगोलिक स्थितीत प्रचंड विविधता आहे. यात उंच पर्वतराजी, वाळवंटी भागांपासून, गवताळ कुरणे आणि घनदाट पर्जन्यवनांपर्यंत प्रचंड वैविध्य आढळते. येथील तापमान आणि पर्जन्यमान डास आणि अन्यही अनेक विषाणूंच्या उत्पत्तीस आणि वाढीस पोषक वातावरण निर्माण करते. येथील बहुतेक देशांत वारंवार ओला किंवा कोरडा दुष्काळ पडतो. पूर येतात तेव्हा साचलेल्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होते. वाढत्या शहरीकरणासाठी जेव्हा प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केली जाते, तेव्हा तिथल्या तलाव, डबक्यांत वाढलेले हे डास अनेक आजार घेऊन मानवी वस्तीत शिरतात. पुरात पाणी प्रदूषित होऊन कॉलरा आणि काविळीसारखे आजार पसरतात. जिथे दुष्काळ पडतात आणि तापमानात प्रचंड वाढ होते अशा ठिकाणी वणवे लागून श्वसनाचे आजार पसरतात. मेनिन्जायटीससारखे प्राणघातक आजार पसरण्यास असे वातावरण कारणीभूत ठरते. आफ्रिकेची भौगोलिक स्थिती आणि तेथील हवामान हे आरोग्यासाठी अनेक आव्हाने निर्माण करते.

अन्नधान्याचा तुटवडा आणि कुपोषण

सततचे पूर आणि दुष्काळांचा आफ्रिकेतील अन्नधान्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. अद्याप औद्योगिक प्रगतीही पुरेशा प्रमाणात झालेली नाही. त्यामुळे उत्पन्नाची अन्य साधनेही मर्यादित आहेत. अन्नधान्याच्या कमतरतेमुळे कुपोषणाची समस्या गंभीर आहे. जागतिक भूक निर्देशांकात आफ्रिकेतील अनेक देश दरवर्षी तळाशी म्हणजे शंभराव्या स्थानाच्या पुढेच असतात. बहुतांश नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला विषाणू संसर्ग झाल्यास साथीचा उद्रेक होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असते. येथील बहुतेक देश अन्नधान्यासाठी आयातीवर अवलंबून आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे त्यांना होणाऱ्या अन्नधान्याच्या पुरवठ्यात लक्षणीय घट झाली आहे, त्यामुळे आफ्रिकेतील पोषणाची स्थिती अधिक गंभीर होण्याची भीती आहे.

प्राण्यांचे बाजार

वन्य प्राण्यांच्या मांसाचे सेवन हे अनेक साथरोगांच्या केंद्रस्थानी असते. आफ्रिकेत असे अनेक बाजार आहेत जिथे वटवाघळे, काळवीट, उंदीर, माकड आणि विविध प्रकारच्या कीटकांची विक्री केली जाते. याचा एक दुष्परिणाम म्हणजे ठरावीक प्रजातींचे प्रमाण घटत जाते. या घटलेल्या प्रजातींचे भक्ष्य असणाऱ्या प्राण्यांचा सुळसुळाट होऊन हे प्राणी जंगलाच्या सीमा ओलांडून मानवी वस्तीत येऊ लागतात आणि स्वत:सोबत जंगलांतील रोगकारक विषाणूही वस्तीत पसरवतात. अशा प्रकारे एखाद्या प्रजातीची मोठ्या प्रमाणात कत्तल होते तेव्हा सर्वांत आधी उंदरांची संख्या वाढते. याचा दुसरा परिणाम म्हणजे या खुल्या मांसबाजारात वन्य प्राणी आणि मानवाचा निकटचा संपर्क येऊन साथींचा उद्रेक होतो.

निकृष्ट राहणीमान

अतिशय लहान घरे आणि त्यात राहणारे प्रचंड मोठे कुटुंब ही स्थिती आफ्रिकेत सामान्य आहे. एकमेकांना चिकटून बांधलेल्या झोपड्या, त्यांतील अस्वच्छता, त्या झोपड्यांतच बांधले जाणारे पाळीव प्राणी याचा तेथील रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. शिवाय अशा दाटीवाटीच्या आणि रोगप्रतिकारक्षमता अतिशय कमी असलेल्या वस्तीत रोगप्रसारासाठी अतिशय पोषक वातावरण तयार झालेले असते. यातून कोणत्याही साथीचा सहज उद्रेक होतो.

आरोग्यविषयक सुविधांचा अभाव

आरोग्यव्यवस्था उभारण्याकडे येथील देशांनी पूर्ण दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांना लशी आणि औषधांसाठी प्रगत देशांवर अवलंबून राहावे लागते. रुग्णालयांत औषधे उपलब्ध नसल्यामुळे कोणत्याही आजारासाठी केवळ वेदनाशामक औषधे देऊन वेळ मारून नेण्याचे प्रमाण मोठे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील न्यूमोनिया, हगवण, गोवर, एचआयव्ही- एड्स, क्षयरोग, मलेरियासारख्या रोगांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या पाच वर्षांखालील बालकांपैकी ५० टक्के बालके ही आफ्रिकेतील असतात. वेळीच निदान आणि उपचार न झाल्यामुळे, तसेच संसर्गजन्य रोगांच्या काळात काळजी घेण्याएवढी जागरूकता नसल्यामुळे साथरोगांच्या प्रासारासाठी अनुकूल वातावरण निर्माण होते.

राजकीय अस्थिरता आणि विषमता

शेजारी देशांमधील वाद, दहशतवाद, सीमावाद, स्थलांतर अशा अनेक समस्यांनी आफ्रिकेतील बहुतेक देश कायम ग्रासलेले असतात. त्यामुळे अन्नसुरक्षा आणि आरोग्यव्यवस्था याकडे लक्ष देण्यासाठी आवश्यक राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. वांशिक भेदांतून हा खंड अद्याप पुरेसा बाहेर पडलेला नाही. त्याच्याही पाऊलखुणा तेथील नागरिकांच्या जीवनमानावर उमटलेल्या दिसतात.

अशा या विविध घटकांमुळे गेल्या कित्येक दशकांपासून आफ्रिका खंड विविध साथरोगांचे उगमस्थान ठरला आहे. एकाच खेड्यात राहणाऱ्यांना आता ‘ही आमची समस्या नाही,’ असे म्हणण्याची सोय नाही. त्यामुळे अनेक विकसित आणि विकसनशील देश आफ्रिकेला या आरोग्य समस्यांच्या गर्तेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मोफत लस आणि औषधपुरवठा करणे, तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे यापासून ते आर्थिक मदतीपर्यंत सर्व मार्ग अवलंबले जात आहेत. मात्र हे सारे रोग झाल्यानंतरचे उपचार आहेत. हा पुढल्या एखाद्या रोगावरचा प्रतिबंधात्मक उपाय नाही. त्यासाठी या सदैव आजारी खंडासमोरील मूलभूत प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.
vj2345@gmail.com

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A contagious hub in the village of the world pkd