‘संसाराच्या तारा जुळल्या’ ही बातमी (३० जून) वाचून एका निवृत्त न्यायाधीशांनी लिहिलेल्या प्रसंगाची आठवण झाली. त्या न्यायाधीशांपुढे घटस्फोटासाठी अर्ज केलेले एक तरुण दाम्पत्य उभे होते. न्यायमूर्तीना वाईट वाटले. एवढं चांगलं जोडपं घटस्फोट घेणार म्हणून दु:ख झालं. न्यायमूर्तीनी त्या दोघांना समजावण्यासाठी आपल्या चेंबरमध्ये बोलावले.
दोघेही घाबरत त्यांच्यासमोर उभे होते. न्यायमूर्तीनी त्यांना बसायला सांगितले. ते बसल्यावर त्यांनी दोन कप चहाची ऑर्डर दिली.
त्या वेळेस ती तरुणी पटकन म्हणाली, ‘साहेब, हे चहा पीत नाहीत. कॉफी घेतात.’ न्यायमूर्ती पटकन म्हणाले, ‘बघ घटस्फोट घेतानादेखील तू त्याच्या साध्या सवयी विसरू शकत नाहीस. तर मग त्याला विसरू शकशील का?’ न्यायमूर्तीनी असे म्हटल्यावर ती तरुणी रडत म्हणाली, ‘नाही. मी त्यांना विसरू शकणार नाही, मला नको घटस्फोट. ’
मग तो तरुणदेखील म्हणाला, ‘मी देखील हिला विसरू शकणार नाही. साहेब आम्हाला घटस्फोट नको.’ एका चहाच्या कपाने एक घटस्फोट टळला..! एक संसार वाचला..!
सुरेश देशपांडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा