पेपरबॅक
फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, ब्लॅकबेरी मेसेंजर, जी-चॅट या संवादाच्या माध्यमांनी जग अतिशय जवळ आणलं आहे. विशेषत: तरुण पिढीला या माध्यमांनी पुरतं व्यापून टाकलं आहे. अगदी ट्रेनमध्ये शेजारी शेजारी बसलेल्या दोन मत्रिणी एकमेकींशी ब्लॅकबेरी मेसेंजरवरून बोलताना दिसतात, तर एकमेकांना कधी समोरासमोर न भेटलेले दोन जीव फेसबुकवर एकमेकांचे जीवश्चकंठश्च मित्र बनतात. सोशल नेटवìकगच्या या माध्यमांनी तरुण पिढीला एकमेकांच्या प्रचंड जवळ आणलं आहे. पण त्याच वेळी अशा माध्यमांमुळे तरुणाईतील भावनिक गुंतागुंतही खूप वाढली आहे. त्यामुळेच ‘ट्विट करून तरुणाने आत्महत्या केली’, ‘व्हॉट्सअॅपवर मित्रांना मेसेज पाठवून स्वत:चे जीवन संपवले’, ‘फेसबुकच्या माध्यमातून ओळख वाढवून तरुणीवर अत्याचार’ अशा घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. इथे चर्चा या माध्यमांची नाही, तर अशा माध्यमांमुळे तरुण मनात वाढलेल्या कोलाहलाची आहे. या कोलाहलातूनच प्रेम, मत्री, शारीरिक संबंध अशा हळुवार नात्यांमध्ये संशय, वितुष्ट, विश्वासघात, खून, आत्महत्या असे प्रसंग घडत असतात. सुदीप नगरकर याची ‘इट स्टार्टेड विथ अ फ्रेंड रिक्वेस्ट’ ही कादंबरी तरुण पिढीतील या गुंतागुंतीचीच सत्यकथा आहे.
या कादंबरीची सुरुवात एका मत्रीच्या सुरुवातीपासूनच होते. आदित्य या आपल्या मित्रासोबत डिस्को क्लबमध्ये पार्टी करण्यासाठी गेलेल्या आकाशला तेथे आलिशा दिसते व पाहता क्षणी तो तिच्या प्रेमात पडतो. शिक्षणासाठी कोलकात्यातून मुंबईत आलेली मुक्त विचारांची आलिशा आपल्या वडिलांच्या मित्राची मुलगी असलेल्या तमन्नासोबत राहत असते. ‘डिस्को’मधील पहिल्या भेटीत तिलाही आकाश आवडतो. मग दोघे एकमेकांचा ‘ब्लॅकबेरी पिन’ शेअर करतात व ब्लॅकबेरी मेसेंजरच्या माध्यमातून या मत्रीच्या संवादास सुरुवात होते. मत्रीचं रूपांतर लवकरच प्रेमात होतं आणि आकाश-आलिशाच्या आयुष्यातले गुलाबी दिवस सुरू होतात. कोणत्याही प्रेमीयुगुलाप्रमाणे त्यांच्या नात्यातही किरकोळ चढउतार होत असतात, पण आकाशचा मित्र आदित्य आणि आलिशाची मत्रीण कृतिका प्रत्येक वेळी या दोघांतील तणाव दूर करून त्यांना एकत्र आणतात.
या कहाणीलाच समांतर अशी तमन्नाच्या प्रेमाची कहाणी कथासूत्र पुढे सरकवत असते. हे सुरू असतानाच अशा काही घटना घडतात की, ज्याने आकाश-आलिशाचे नाते तुटण्याच्या वळणावर पोहोचते. आकाशचे प्रेमच नव्हे, तर आयुष्यच संपवू शकणाऱ्या त्या घटनेतून तो कसा सुटतो, आलिशाच्या मनातले गरसमज कसे दूर होतात आणि आदित्य, कृतिका यांच्यासारखे मित्र त्यांना कसे एकत्र आणतात, याची चित्तवेधक चित्रण करणारी अशी ही कहाणी आहे.
‘इट स्टार्टेड.’चा गाभा प्रेम हा असला तरी कादंबरी मत्रीच्या धाग्याने बांधली गेली आहे. आकाश-आदित्य, आलिशा-कृतिका यांच्यातील घट्ट मत्री दाखवणारे प्रसंग कॉलेज कट्टय़ावरील जुन्या मित्रमत्रिणींना आपलेसे वाटणारे आहेत. आकाश-आलिशा यांच्या प्रेमाची गोष्टही वर्तमानातल्या प्रेमसंबंधांचा आरसा आहे. विशेषत: आकाशने आलिशाला प्रेमाची मागणी घालण्यासाठी केलेल्या खटाटोपाचा प्रसंग अतिशय वेगळा आणि भावस्पर्शी आहे. शारीरिक आकर्षणातून दीपवर एकतर्फी प्रेम करणारी तमन्ना आणि त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तिची वृत्ती हे मांडतानाच तमन्नाबद्दल वाचकांच्या मनात चीड किंवा राग निर्माण होण्याऐवजी सहानुभूती निर्माण होईल, याची खबरदारी सुदीपने घेतली आहे.
याशिवाय कॉर्पोरेट जगतातील लंगिक शोषण, स्पध्रेत जिंकण्यासाठी गाठलेली खालची पातळी, कॉलेजजीवनातील मजामस्ती-राडे यांवरही  प्रकाश टाकला आहे. या सर्व गोष्टींमुळे ही कादंबरी वाचनीय बनते.
‘फ्यू थिंग्स लेफ्ट अनसेड’ आणि ‘दॅट्स द वे वुई मेट’ या दोन बेस्टसेलर कादंबऱ्या देणाऱ्या सुदीप नगरकर या ठाण्यातील तरुण लेखकाची ही तिसरी कादंबरीही भारतीय, विशेषत: तरुण वाचकांना भावणारी आहे. विशेष म्हणजे, सुदीपच्या या तिन्ही कादंबऱ्या खऱ्याखुऱ्या घटना/व्यक्तींवर आधारित आहेत. ‘फ्यू िथग्ज.’ आणि ‘दॅट्स द वे..’ या कादंबऱ्या सुदीपच्या स्वत:च्या नातेसंबंधांची कहाणी आहे, तर ‘इट स्टार्टेड विथ..’ त्याच्या मित्राला आलेल्या अनुभवांची कथा आहे. पण ही खरी असेल का, असा प्रश्न पडावा, इतपत या कहाणीत रोमांच, थरार भरला आहे. याचे श्रेय अर्थात सुदीपच्या लिखाण व मांडणीला द्यावे लागेल. पुस्तकाच्या पहिल्या दहा-बारा पानांतच लेखकाने कथेतील मुख्य व्यक्तिरेखांची ओळख करून दिली आहे. त्यामुळे त्यांच्याशी वाचकांचे नाते घट्ट जुळते. कथेमध्ये शेवटपर्यंत रोमांच व रहस्य राहील, याची लेखकाने पुरेपूर खबरदारी घेतली आहे. मात्र, या रहस्याचा भेद सहजतेने केला आहे की, त्यामुळे त्यात अजिबात नाटकीपणा आलेला नाही.
संपूर्ण कादंबरीत खटकणारी गोष्ट म्हणजे पुस्तकाचा ‘प्रोलॉग’. कथेचा आरंभ करण्यापूर्वी तिच्या शेवटाची एक चुणूक दाखवण्यासाठी ‘प्रोलॉग’ मांडला जातो. तो सुदीपने अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. आकाशच्या मनातील खळबळ, त्याच्यावर नुकतेच एक मोठे संकट येऊन गेल्याची जाणीव या ‘प्रोलॉग’मधून वाचकांची उत्कंठा वाढवतात, पण कादंबरीच्या शेवटी हा ‘प्रोलॉग’ अजिबातच दिसत नाही. त्यामुळे प्रोलॉग कशासाठी दिला, असा प्रश्न पडतो. हा एक मुद्दा सोडला तर हे पुस्तक ‘बेस्टसेलर’ यादीसाठी पूर्णपणे पात्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इट स्टार्टेड विथ अ फ्रेंड रिक्वेस्ट :
सुदीप नगरकर,
रँडम हाऊस इंडिया, नवी दिल्ली,
पाने : २१२, किंमत : १२५ रुपये.

इट स्टार्टेड विथ अ फ्रेंड रिक्वेस्ट :
सुदीप नगरकर,
रँडम हाऊस इंडिया, नवी दिल्ली,
पाने : २१२, किंमत : १२५ रुपये.