काही दिवसांपूर्वी रल्वे स्थानकावर कानी आलेला एक संवाद .. ‘‘योगेश, पंधरा-वीस मिनिटे वेळ आहे गाडी सुटायला, एक काम कर पटकन्- बाहेर जाऊन या फाइलची ‘झेरॉक्स’ काढून आण. येता येता मला एक ‘बिसलरी’ही आण आणि चार-पाच ‘कॅडबरीज्’ आण- तिथल्या मुलांना द्यायला खाऊ होईल काही तरी.’’ — हे ऐकताना माझ्यातली बौद्धिक संपदा सल्लागार खडबडून जागी झाली आणि चेहऱ्यावर हास्यही पसरले. गाडी सुटली आणि हा प्रवासी माझ्या शेजारीच येऊन बसला. थोडय़ा गप्पा झाल्यावर मी विचारले, ‘‘ झाली वाटते तुमची सगळी कामे, गाडी सुटायच्या आत?’’ तर तो हातातल्या वस्तू दाखवीत म्हणाला, ‘‘हो, हे काय.. ही राजहंसची ‘बिसलरी’ मिळाली, अमूलच्या ‘कॅडबऱ्या’ मिळाल्या आणि फाइलही ‘झेरॉक्स’ झाली.’’ काही खटकतेय का हे वाचताना?
.. नसेल तर ही चिंतेची बाब आहे.
आपण या लेखमालेत सध्या ट्रेडमार्क्सची माहिती घेतो आहोत. एखाद्या उत्पादनाची ‘ब्रँड व्हॅल्यू’ ग्राहकाच्या मनावर ठसविण्याचे काम ट्रेडमार्क्स करीत असतात. तसेच बाजारातल्या इतर उत्पादनांपासून स्वत:चे उत्पादन वेगळे आहे हे दर्शविण्याचे कामही ट्रेडमार्क्स करतात. वरच्या संभाषणात आलेले ‘झेरॉक्स’, ‘कॅडबरी’, ‘बिसलरी’ हे खरे तर सुप्रसिद्ध ट्रेडमार्क आहेत. छायाप्रती काढणाऱ्या यंत्रांपैकी एक ‘झेरॉक्स’ या नावाचे. बाजारातल्या अनेक बाटलीबंद पाण्यापैकी एक ‘बिसलरी’ किंवा चॉकलेट्सपैकी एक ‘कॅडबरी’. ‘झेरॉॅक्स’शिवाय किती छायाप्रत-यंत्रे आहेत आणि या उत्पादनांपासून विशिष्ट कंपनीच्या उत्पादनाला वेगळे दाखविण्याचे काम ‘झेरॉक्स’ या ट्रेडमार्कने करायला हवे.. पण होते काय? तर आपण फाइल ‘फोटोस्टॅट कर’ न म्हणता, ‘झेरॉक्स करून आण’ म्हणतो.
ट्रेडमार्क हा एक वैशिष्टय़पूर्ण, इतर शब्दांपेक्षा वेगळा शब्द असायला हवा हे आपण आधीच्या लेखात पाहिले; पण या उदाहरणांमध्ये पाहाल तर ट्रेडमार्क हा वैशिष्टय़पूर्ण शब्द उरलेलाच नाही. ‘बिसलरी’, ‘झेरॉक्स’ हे ट्रेडमार्क्स त्या त्या उत्पादनांना मिळाले तेव्हा खरे तर वैशिष्टय़पूर्ण शब्दच होते; पण आता मात्र ते एका विशिष्ट उत्पादकाच्या उत्पादनासाठी नव्हे, तर या प्रकारच्या सर्व उत्पादनांसाठी वापरले जाऊ लागले आहेत. इथे ट्रेडमार्क हे ‘विशेषनाम’ उरलेलेच नाही, तर ‘सामान्यनाम’ होऊन बसले आहे. याला म्हणतात ट्रेडमार्कची ‘जेनेरिसाइड’ वा अतिवापरामुळे सामान्यीकरण होऊन ट्रेडमार्कची झालेली हत्या.
एखादा ट्रेडमार्क नोंदणीकृत करून उत्पादक एक नवे उत्पादन घेऊन बाजारात येतो, तेव्हा त्याबाबत ग्राहक पूर्णपणे अनभिज्ञ असतो. बाजारात हजारोने येणाऱ्या ट्रेडमार्क्सपैकी काही मूठभर मात्र नशीबवान असतात. त्यांचा दर्जा, त्यांच्या जाहिरातींचे तंत्र.. सगळेच असे काही जुळून येते की, ते बाजारात ‘हिट’ होतात. वस्तूपेक्षाही तिचे ‘नाव’ मोठे होते. तिला ‘ब्रँड व्हॅल्यू’ प्राप्त होते. वाटेल ती किंमत देऊन ग्राहक ती विकत घेतात. ट्रेडमार्क इतका प्रसिद्ध होणे ही अर्थातच उत्पादकासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट असते; पण ही प्रसिद्धी कुठे थांबवायची हे मालकाला योग्य वेळी कळायला हवे. यानंतर या प्रसिद्धीचा आलेख असाच चढला, तर ट्रेडमार्क ट्रेडमार्क उरतच नाही. तो इतका प्रसिद्ध पावतो की, त्याच प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रेडमार्क्स असलेल्या इतर वस्तूही त्याच नावाने ओळखल्या जाऊ लागतात. उदा. राजहंसची ‘बिसलरी’! इथे बिसलरी हा शब्द सरळ सरळ ‘बाटलीबंद पाणी’ या अर्थाने वापरला गेला आहे. म्हणजे ट्रेडमार्कचे जे खरे काम आहे- एक विशिष्ट ‘ब्रँड’ तयार करण्याचे- ते संपले आहे. उलट इथे मुळात वैशिष्टय़पूर्ण असलेल्या ब्रँडचे सामान्यीकरण होते आहे.
पण मग असे झाले तर बिघडले कुठे? तर खूप काही बिघडले आहे. एखाद्या ट्रेडमार्कची जर अशा प्रकारे हत्या झाली तर मग मक्तेदारी उरणार कशी? ट्रेडमार्क जर कुणी सरसकटपणे सामान्यनाम म्हणून वापरू लागले आणि त्याचे उल्लंघन करू लागले, तर मग ते रोखणे महा कर्मकठीण होऊन बसते. म्हणजे पाहा.. ‘छायांकनाचे’ काम करणाऱ्या एका दुकानाबाहेर येथे ‘फोटोस्टॅट’ करून मिळेल अशी पाटी न लावता दुकानदाराने ‘झेरॉक्स’ करून मिळेल अशी पाटी लावली आहे. खरे तर दुकानातील छायाप्रती-यंत्र ‘झेरॉक्स’ कंपनीचे नसून दुसऱ्याच कुठल्या कंपनीचे आहे. म्हणून त्याविरोधात झेरॉक्सने ट्रेडमार्क उल्लंघनाचा दावा केला. तर झेरॉक्स हा ट्रेडमार्क उरलेला नाही, तर जनेरिक शब्द झाला आहे असा हा दुकानदार कोर्टात दावा करणार आणि हे त्याला सिद्ध करून दाखविता आले, तर झेरॉक्स काहीच करू शकणार नाही. सामान्यीकरणामुळे हत्या झालेल्या ट्रेडमार्कचे उल्लंघन कुणी करू लागले तर उत्पादक हतबल असतो. त्याला याविरोधात काहीही कारवाई करता येत नाही.
‘अॅस्पिरीन’ हे औषध आपण सर्वानी कधी ना कधी डोके ठणकत असताना घेतले आहे. भारतात अॅस्पिरीन वेगवेगळ्या ब्रँडनेम्सने उपलब्ध आहे. औषधाला एक ब्रँडनेम असते आणि त्यातल्या मूळ औषधी घटकाचे एक जनेरिक नाव असते. उदा. पॅरासिटामॉल हे झाले अशा एका औषधी घटकाचे नाव किंवा ‘जनेरिक नाव’. जगभरातून हा औषधी पदार्थ ‘पॅरासिटामॉल’ याच नावाने ओळखला जातो; पण वेगवेगळ्या औषध कंपन्या मात्र ‘पॅरासिटामॉलच्या’ गोळ्या वा द्रव वेगवेगळ्या नावाने विकतात. उदा. क्रोसिन, मेटॅसिन, कॅलपॉल इ. तर आपल्या सगळ्यांचा असा समज आहे की, ‘अॅस्पिरीन’ हे असेच एक जनेरिक नाव आहे आणि ‘डिस्प्रीन’ किंवा ‘इकोस्प्रीन’ हे या मूळ औषधाचे वेगवेगळे ब्रँड्स आहेत; पण खरे तर या औषधाचे जनेरिक नाव ‘अॅसिटाइल सॅलिसिलिक अॅसिड’. बायर या बलाढय़ जर्मन औषध कंपनीने हे औषध ‘अॅस्पिरीन’ या ब्रँडने विकायला आरंभ केला. ‘अॅस्पिरीन’ हा जर्मनीमध्ये बायरच्या मालकीचा नोंदणीकृत ट्रेडमार्क होता. हा ब्रँड बाजारात सुप्रसिद्ध झाला. १९११ च्या पहिल्या महायुद्धातील जर्मनीच्या पराभवानंतर व्हर्साय इथे तह झाला. या तहामध्ये शिक्षा म्हणून जर्मनीला बायरच्या ‘अॅस्पिरीन’ या सुप्रसिद्ध ट्रेडमार्कवर पाणी सोडावे लागले. अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स या देशांत बायरचा या ट्रेडमार्कवर काहीही अधिकार उरला नाही आणि अशा रीतीने ‘अॅस्पिरीन’ हा ट्रेडमार्क स्वत:च्या प्रसिद्धीने आणि यशामुळे स्वत:च मरण पावला. ही ट्रेडमार्कची आत्महत्या नाही का? एस्केलेटर किंवा सेलोफेन हे असेच काही आत्महत्या केलेले ट्रेडमार्क्स आहेत.
या संदर्भात झेरॉक्सने एकदा केलेली जाहिरात अतिशय बोलकी आहे. ती अशी: ‘व्हेन यू यूज ‘झेरॉक्स’ द वे यू यूज अॅस्पिरीन, वुइ गेट अ हेडेक’.
आपला ब्रँड आणि ट्रेडमार्क सुप्रसिद्ध व्हावा, त्याला बाजारात यश मिळावे, हे अर्थातच त्याच्या मालकाचे स्वप्न असते. मग त्याला यशस्वी होऊ द्यायचे, पण अति यशामुळे त्याची आत्महत्या होऊ द्यायची नाही. यासाठी उत्पादकांनी काय करायचे?
१. ट्रेडमार्कचा वापर क्रियापदासारखा होऊ लागला, तर पुढाकार घेऊन ते थांबवायचे. उदा. ‘गेट धिस झेरॉक्स्ड’ असे कुणी म्हणते तेव्हा इथे ट्रेडमार्क क्रियापदासारखा वापरला गेला, हे लक्षात घ्यायचे.
२. ट्रेडमार्कचा वापर ‘नाम’ म्हणून होऊ द्यायचा नाही. तो नेहमी विशेषणासारखा वापरला जायला हवा. उदा. ‘मी माझ्या मर्सिडीझने आलो’ या वाक्यात ‘मर्सिडीझ’ हा ट्रेडमार्क नाम म्हणून वापरला गेलाय; पण तो ‘मी माझ्या मर्सिडीझ कारने आलो’ असा वापरला जायला हवा.
३. ट्रेडमार्कचा अनेकवचनी वापर टाळायला हवा. उदा. ‘मला ४-५ इकलेयर्स दे’ हा शब्दप्रयोग चुकीचा आहे, कारण इथे ट्रेडमार्क बहुवचनात वापरला जातोय. ‘मला इकलेयर चॉकलेट्स दे’ हा योग्य वापर आहे.
पण मग हे असे होऊ लागल्यास ट्रेडमार्कच्या मालकाने करायचे तरी काय? हे थांबवायचे कसे? ‘गुगल’ या सुप्रसिद्ध ट्रेडमार्कच्या बाबतीत गुगलने काय केले हे इथे पाहण्यासारखे आहे. अतिशय लक्षपूर्वक शोधणे या अर्थाने ‘to google’ हे क्रियापद आपण वापरू लागलो आहोत. म्हणजेच गुगलची आत्महत्या होण्याच्या मार्गावर आहे. स्वीडनमध्ये ‘लँग्वेज वॉचडॉग’ नावाची संस्था त्या वर्षांत स्वीडनमध्ये भाषेत नव्याने रूढ झालेले १० नवे शब्द प्रसिद्ध करते. समाज आणि त्याबरोबरच समाजाची बोलीभाषा कशी बदलते आहे याचा यातून मागोवा घेता येतो असे या संस्थेचे म्हणणे आहे. २०११-१२ मधल्या नव्या शब्दांच्या यादीत या संस्थेने ‘गुगल’ या क्रियापदाचा समावेश केला. लगोलग गुगलकडून संस्थेला ई-मेल करण्यात आला की, या शब्दाच्या बाजूला ‘गुगल’ हा ट्रेडमार्क आहे. तो वर्णनात्मक शब्द किंवा क्रियापद म्हणून वापरला जाऊ नये, असा इशारा छापावा. गुगलसारख्या बलाढय़ कंपनीशी वाद नको म्हणून संस्थेने हा शब्द शेवटी संकेतस्थळावरून काढून घेतला.
थोडक्यात काय, तर ट्रेडमार्कच्या मालकाला आपला ट्रेडमार्क सुप्रसिद्ध करण्यासाठी महत्कष्ट लागतात; पण प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अतिप्रसिद्धीमुळे तो ‘जनेरिक’ तर बनत नाही ना याची डोळ्यात तेल घालून राखण करावी लागते. नाही तर अतिवापरामुळे ट्रेडमार्कची आत्महत्या होणार हे नक्की! अतिपरिचयात् अवज्ञा म्हणतात तसेच काहीसे..
प्रा. डॉ. मृदुला बेळे
* लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.
ईमेल : mrudulabele@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा