जागतिकीकरण व माहिती-तंत्रज्ञानाच्या काळातही आशिया, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका या तिन्ही खंडांपैकी अनेक देशांमधील सांस्कृतिक धाटणी फार बदलली नाही. नेमक्या याच काळात अमेरिका आणि विशेषत: युरोपात चर्चमध्ये जाणाऱ्या ख्रिश्चनांच्या संख्येस ओहोटी लागली असताना, आशिया, द. अमेरिका वा आफ्रिका येथे ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या प्रयत्नांना मिळू लागलेला प्रतिसाद वाढल्याचे दिसून आले आहे. असे का झाले, याचा वेध घेणारे हे पुस्तक विद्यापीठीय शिस्तीच्या अभ्यासासारखे असल्यामुळे ते धर्मप्रसाराच्या विरुद्ध नाही, तसेच बाजूनेही नाही.. ‘मेगाचर्च’ या संकल्पनेची तपासणी हे पुस्तक करते, तेव्हा धर्माचे झालेले वस्तूकरणच वाचकांपुढे उलगडते..
धर्म या संकल्पनेची सुरुवात कुठून व कशी झाली, याचा शोध घेण्याचे ठरवले तर प्रत्येक धर्मग्रंथात त्याची वेगवेगळी उत्तरे मिळतील. मात्र, प्रत्येक धर्म एका छोटय़ा प्रदेशात उदयास आला आणि पुढे अन्यत्र पसरत गेला. समूहाने राहण्याच्या मानवी गुणधर्मातून समाजाची निर्मिती झाली. या समाजाला एकसंध ठेवणारी आणि आचरणाची दिशा दाखवणारी (म्हणजेच ‘धारणा करणारी’) व्यवस्था म्हणून धर्म ही संकल्पना अस्तित्वात आली. धर्माची ही ‘धारणा’ संकल्पना सर्वमान्य आहे. परंतु ‘धर्मप्रसार’ ही मात्र निरनिराळ्या काळात, वेगवेगळ्या हेतूंनी आणि त्यासाठी विविध मार्ग वापरून साधलेली गोष्ट.. तिचा अभ्यास कधी राजकीय, कधी आर्थिक तर कधी सामाजिक कारणांचा वेध घेत करावा लागतो तो याच वैविध्यामुळे.
जगाच्या अन्य भागांत कशी धर्माधिष्ठित समाजव्यवस्था जगभर पसरत गेली. उदाहरणच द्यायचे झाले तर मध्यपूर्व आशियात ख्रिश्चन धर्माचा उगम झाला. मात्र, तो पुढे युरोप आणि उत्तर अमेरिकेत फोफावत गेला. या दोन खंडांत सर्वाधिक ख्रिश्चन समुदाय एकवटला गेला. मात्र, गेल्या ५० वर्षांच्या काळात हे चित्रदेखील बदलू लागले आहे. एकीकडे उत्तर अमेरिका आणि युरोप या ख्रिस्तबहुल खंडांत अन्य धर्मीय स्थलांतरित आणि निरीश्वरवादी विचारसरणी असलेली लोकसंख्या वाढत असताना ख्रिश्चन धर्माचा प्रसार आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया येथे वाढत चालला आहे. या प्रसाराचा झपाटा इतका आहे की, एकेकाळी युरोप आणि अमेरिका अशा उत्तर गोलार्धातील खंडाचा प्रमुख धर्म असलेला ख्रिश्चन धर्म आता दक्षिण गोलार्धात आपले अस्तित्व वाढवू लागला आहे. ख्रिश्चन धर्माचे हे ‘दक्षिणायन’ केवळ भौगोलिक नसून तर त्याला अनेक ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक कारणेही लाभली आहेत.. परंतु आज जो काही ख्रिस्ती धर्मप्रसार सुरू आहे तो जागतिकीकरणोत्तर काळातला आहे. त्यातही, माहिती-तंत्रज्ञान/ संगणक/ मोठमोठे मॉल किंवा सार्वजनिक कार्यक्रमांचे ‘मेगा इव्हेंट’ अशा जगात जगणाऱ्यांसाठी हा धर्मप्रसार सुरू आहे. या स्थित्यंतराचा वेध ‘अ मूव्हिंग फेथ : मेगाचर्चेस गो साऊथ’ या अभ्यासपूर्ण पुस्तकातून घेण्यात आला आहे. या पुस्तकात भारताचा संदर्भ अगदी कमी प्रमाणात आहे. हे पुस्तक धर्मप्रसाराच्या विरोधात किंवा बाजूने लिहिले गेलेले नसून, ते फक्त अभ्यास मांडणारे आहे.
जोनाथन डी. जेम्स यांनी संपादित केलेले हे विद्यापीठीय वळणाचे, सामाजिक शास्त्रांच्या संशोधनाची शिस्त पाळणारे पुस्तक अतिशय चिकित्सकपणे, केवळ ख्रिश्चन धर्माच्या प्रसार आणि व्याप्तीचा आलेख मांडते. सामाजिक शास्त्रांचे संशोधक ‘काय शोधून काढतात’? याचे ढोबळमानाने मिळणारे उत्तर आधी लक्षात घेऊन मगच हे पुस्तक वाचणे अधिक बरे. हे उत्तर असे की, सामाजिक शास्त्रांमधील ‘संशोधन’ बहुतेकदा, समाजाचा अभ्यास-विचार करण्याच्या ‘संकल्पनां’चा शोध घेणारे किंवा एखादी संकल्पना समोर ठेवून, मग तिची सामाजिक वास्तवाच्या संदर्भात फेरतपासणी करणारे असते. या पुस्तकाच्या केंद्रस्थानी ‘मेगाचर्चेस’ ही संकल्पना ठेवण्यात आली आहे. कोणत्याही धर्माचा अमुक एका प्रदेशातील प्रभाव तेथील धार्मिक स्थळांवरून लक्षात येतो. भारत आणि इंडोनेशियातील मंदिरे या प्रदेशांवर हिंदू धर्माची छाप असल्याचे दाखवून देतात. त्याचप्रमाणे आग्नेय तसेच मध्य पूर्व आशियातील मशिदी तेथील इस्लामिक प्रभावाची साक्ष देतात. युरोपातील चर्च आणि अन्य ठिकाणे त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचे शेकडो वर्षांपासूनचे अस्तित्व दाखवून देतात, परंतु गेल्या चार-पाच दशकांत आफ्रिका, आशिया खंडांतील देशांतही ‘मेगाचर्च’ उभी राहू लागली आहेत. एका वेळी दोन हजार व्यक्ती सामावू शकतील, अशा चर्चसाठी ‘मेगाचर्च’ असे संबोधले जाते. त्यामुळे हे ‘मेगाचर्च’ ख्रिश्चन धर्माच्या दक्षिणायनाचे उदाहरण असल्याचे ‘अ मूव्हिंग फेथ..’मधून देण्यात आले आहे.
‘मेगाचर्च’ या संज्ञेशी रचनात्मक भव्यतेचाच संबंध आहे असे नाही, तर बदलत्या काळानुसार विकसित झालेले तंत्रज्ञान आत्मसात करत नव्या प्रदेशात आपला धर्म वाढवताना बदललेल्या ख्रिश्चन धर्मातील शिकवणीचाही ‘मेगाचर्च’वर प्रभाव दिसतो. २०व्या शतकाच्या सुरुवातीपासून झालेल्या वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय संशोधनामुळे युरोप आणि उत्तर अमेरिका या खंडात निरीश्वरवाद ही संकल्पना मूळ धरू लागली. ख्रिश्चन धर्म हा ‘देव एकच आहे’ या सिद्धांतावर आधारित असला तरी देवाच्या अस्तित्वाबाबत प्रश्न विचारले जाऊ लागले आणि सुरुवातीच्या विरोधानंतर जनमानसातही या प्रश्नावर गांभीर्याने विचार होऊ लागला. यातूनच या दोन खंडांत ख्रिश्चन धर्माचा ऱ्हास होऊ लागला. अशा परिस्थितीत केनिथ कोपलॅण्ड यांच्यासारख्या ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी अमेरिकेतील चर्च हे धर्मप्रसाराचे माध्यम बनवण्याचा प्रयत्न केला. रविवारच्या सामूहिक प्रार्थनेच्या वेळी ख्रिश्चन धर्माची महती सांगणारी पत्रके, पुस्तके वाटण्याची मोहीम पुन्हा जोमाने सुरू झाली आणि म्हणता म्हणता ती युरोपमध्येही पसरत गेली. ‘भव्य ते दिव्य’ असे मानण्याचा सर्वसाधारण मानवी दृष्टिकोन असल्याने आणि जास्तीत जास्त ख्रिस्ती बांधवांना सामावून घेण्यासाठी मोठमोठय़ा चर्चची उभारणी करण्यात आली. येथूनच ‘मेगाचर्च’ अस्तित्वात येऊ लागली.
एकीकडे युरोप, अमेरिकेत या घडामोडी सुरू असताना युरोपीय साम्राज्यांनी आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया या खंडांत आपल्या वसाहती पसरवण्यास सुरुवात केली. हा वसाहतवाद जसा रुजत गेला, तसेच त्या त्या भागात ख्रिश्चन धर्मही रुजत गेला. मात्र हे होत असताना त्या त्या प्रदेशातील संस्कृती, भाषा, विचार, जनतेचे राहणीमान यांचाही विचार झाला. आफ्रिका आणि आशियासारख्या खंडांतील बहुसंख्य जनतेचा दैवी चमत्कारावर प्रचंड विश्वास असल्याने चमत्कारांना ख्रिश्चन धर्मात आणखी अधिक स्थान मिळाले (-हे प्रस्तुत पुस्तकातील मत आहे. बायबलपासून सर्वत्र, चमत्कारांवर ख्रिस्ती धर्माचाही विश्वास असल्याचे इतर पुस्तकांमधून पुरेशा प्रमाणात सिद्ध झालेले आहेच. ‘करुणा’ किंवा अन्य तत्त्वांपेक्षाही ‘चमत्कारा’वर भर देण्याचा मार्ग आशिया/आफिक्रेत अवलंबला गेला, इतकेच.) देवत्वाचा प्रत्यक्ष अनुभव आणि ख्रिश्चन धर्मातील चमत्कारांना अधोरेखित करणारी भाषणे किंवा प्रवचनांतून धर्माचा प्रसार करण्याचे प्रमाण वाढू लागले. याचा मोठा फायदा धर्मप्रसारकांना झाला. त्या त्या प्रदेशात मोठमोठी चर्चेस उभी राहू लागली आणि चर्च हे त्या-त्या भागातील प्रमुख शक्तिकेंद्र ठरू लागले. नायजेरियातील इनोह अदेजारे अदेबोये, ब्राझीलमधील एदीर मॅसेडो आणि दक्षिण कोरियातील डेव्हिड (पॉल) योंगी चो अशा स्थानिक वंशाच्या, स्थानिक भाषा उत्तम बोलणाऱ्या व्यक्ती म्हणजे या नव्या शक्तिकेंद्रांच्या सर्वेसर्वा बनल्या. मेगाचर्चमुळे अशा धर्मप्रसारकांचे विचार ऐकण्यासाठी हजारो लोक एका वेळी जमू लागले. थोडक्यात ‘लोकल’ ठरता ठरता ख्रिश्चन धर्म ‘ग्लोबल’ होत गेला. पुढे बदलत्या तंत्रज्ञानानुसार आलेल्या संगणक आणि इंटरनेटचाही धर्मप्रसारासाठी वापर होऊ लागलेला दिसतो, याची आफ्रिकेतील उदाहरणे या पुस्तकाने दिली आहेत खरी, परंतु ही उदाहरणे म्हणजे चर्चच्या उपक्रमांची माहिती फेसबुकवरून देणे आदींपुरतीच मर्यादित आहेत.
आजघडीला जगभरातील दोन अब्ज ख्रिश्चनांपैकी ६० टक्क्यांहून अधिक ख्रिश्चन आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेत वास्तव्याला आहेत. २०५०पर्यंत हाच आकडा ७५ टक्क्यांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी सरासरी ख्रिश्चन ४० वर्षांचा पाश्चिमात्य पुरुष होता. आज सरासरी ख्रिश्चन २० वर्षांची आफ्रिकन महिला असल्याचे निरीक्षण या पुस्तकात नोंदवण्यात आले आहे. मेगाचर्चेसची सर्वाधिक संख्या आज दक्षिण गोलार्धात आहे. जगातील सरासरी दहापैकी नऊ मेगाचर्चेस आफ्रिका, आशिया आणि दक्षिण अमेरिकेतील आहेत. दक्षिण कोरियातील सोल (सेऊल)मधील चर्चमध्ये आठवडय़ाला सात लाख ‘भाविक’ हजेरी लावतात, तर अमेरिकेतील जोएल ऑस्टिन यांनी स्थापलेल्या लेकवूड चर्चेसमध्ये ही संख्या अवघी ४७ हजार आहे. मुंबईतील न्यू लाइफ या मेगाचर्चमध्येही आठवडय़ाला ७० हजार लोकांची हजेरी असते, असे दाखले देत ‘अ मूव्हिंग फेथ..’मध्ये ख्रिश्चन धर्माच्या दक्षिणायनाचा वेध घेण्यात आला आहे.
दोन वर्षांचे संशोधन, लिखाण आणि संपादनानंतर तयार झालेल्या या पुस्तकात आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया या खंडांतील ख्रिश्चन प्रभावाची सविस्तर प्रकरणे आहेत. तसेच ब्राझील, फिलिपाइन्स, नायजेरिया या देशांसोबत भारतातील मेगाचर्च आणि ख्रिश्चन धर्माची व्याप्ती यांचाही स्वतंत्र आढावा घेण्यात आला आहे. ख्रिश्चन धर्मावर राजकीय आणि आध्यात्मिक अर्थव्यवस्थेचा प्रभाव कितपत आहे याचा उल्लेख पुस्तकात आहेच, परंतु या पुस्तकातून वाचकांसमोर उलगडेल ते, धर्माचे ‘वस्तूकरण’! ‘धार्मिक उत्पादनां’चा प्रसार, धर्माचे विपणन (मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग), माध्यमांद्वारे प्रसाराचे तंत्र, चर्चेसचे बदलते स्वरूप हे सारेच घटक कोणत्याही मानवी व्यवस्थेचे वस्तूकरण होण्याच्या आजच्या काळाशी सुसंगत असेच आहेत. जागतिकीकरणाच्या टप्प्यावर झालेल्या बदलांचे भान अनेक अभ्यासकांनी सोडलेले नाही. त्यामुळेच, पुरुषकेंद्री चर्चव्यवस्था जाऊन महिलांनाही मिळू लागलेले महत्त्व यांसारख्या मुद्दय़ांचाही विश्लेषणाधारित ऊहापोह या पुस्तकात झाला आहे. थोडक्यात सांगायचे तर, ख्रिश्चन धर्माचा बदलता भूगोल ‘अ मूव्हिंग फेथ..’मधून अनुभवायला मिळतो. अभ्यासू लेखकांनी प्रखर संशोधनानंतर लिहिलेल्या प्रकरणांना संपादकीय संस्कारातून एका शृंखलेत गुंफण्यात जोनाथन डी. जेम्स यांना यश आले आहे.
आसिफ बागवान -asif.bagwan@expressindia.com
* ‘अ मूव्हिंग फेथ : मेगाचर्चेस गो साऊथ’
संपादक : जोनाथन डी. जेम्स
प्रकाशक : सेज पब्लिकेशन्स (इंडिया) लि.
पृष्ठे : २६० ; किंमत : ७९५ रु.
ख्रिस्ती धर्माचे ‘मेगा’ दक्षिणायन!
जागतिकीकरण व माहिती-तंत्रज्ञानाच्या काळातही आशिया, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका या तिन्ही खंडांपैकी अनेक देशांमधील सांस्कृतिक धाटणी फार बदलली नाही.
First published on: 29-08-2015 at 06:26 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A moving faith mega churches go south reviews