पुनर्जन्म हा मानवी आयुष्याला व्यापून उरणारा चिरंतन प्रश्न आहे. हे वास्तव आहे की केवळ कल्पना, याबाबत एकमत होऊ शकत नसले तरीही आयुष्यात काही प्रसंग असे घडतात, की ज्या वेळी हा प्रसंग आपण ‘आधीच अनुभवला’ आहे अशी आपली धारणा असते. सध्या जीवनात असलेले ताणतणाव आणि दडपणे लक्षात घेत आपल्याच ‘पूर्वजन्माच्या’ अशा आठवणींचा प्रभावी उपचार पद्धत म्हणून वापर करता येईल का, आणि करायचा तर तो कसा या मध्यवर्ती संकल्पनेवर डॉ. ब्रायन वेस यांचे ‘मिरॅकल्स हॅपन’ हे पुस्तक बेतले आहे. अगदी एकाच वाक्यात सांगायचे तर ‘पुनर्जन्माच्या संकल्पनेची मदत घेऊन जीवनाच्या मानसिक, भौतिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही अंगांसाठीची ही उपचारपद्धती’ असल्याचा दावा लेखकाने केला आहे.
यात एकंदर १२ प्रकरणे आहेत. ही उपचारपद्धती नेमकी काय आहे, तिचा उगम कसा झाला, लेखकाच्या जीवनात ती सर्वप्रथम कशी आली, त्यांचे व्यक्तिगत अनुभव काय होते, या पद्धतीचा प्रभाव किती दिवस राहू शकतो अशा विविध प्रश्नांची उत्तरे या पुस्तकामधून उलगडत जातात. व्यक्तिमत्त्व विकासाच्या पुस्तकांमध्ये आढळणारे निरीक्षण-अनुभव आणि तथ्यांश हे सूत्रच या पुस्तकात आहे. ‘व्हॅलिडेटिंग द मेमरीज’ या दुसऱ्या प्रकरणात सातत्याने आपल्याला ‘भासणाऱ्या’ गतजन्मीच्या आठवणी या खऱ्या आहेत की ते भास आहेत, याबद्दल उपचार घेत असलेल्या व्यक्तीच्या मनात संशय निर्माण होतो.. अशा वेळी त्या अनुभवांची खातरजमा करण्याच्या पद्धती आणि त्याचे महत्त्व अनेक उदाहरणांद्वारे पटवून दिले आहे. लेखकाच्या आयुष्यातील वेदनादायी प्रसंगांना सामोरे जाताना त्यांनीही या उपचारपद्धतीचा आधार घेतला होता.
आपल्या मनात पूर्वजन्मीच्या आठवणींचे ओझे असते, ते आपल्याला काही वेळा ‘भार वाहणे’ वाटू शकते, पण त्याच जन्मातील काही प्रसंग- काही क्षण आपल्याला स्वत:च्या क्षमतांविषयी आत्मविश्वासही देतात आणि त्यातूनच तणावापासून मुक्त होण्यास मदत होते, अशी या उपचारपद्धतीची तात्त्विक पाश्र्वभूमी आहे. जाणिवांचा उंचावलेला स्तर आणि एखाद्या घटनेबद्दल आपल्याला असणारी समज जसजशी वाढत जाते, तसतसा आयुष्याकडे पाहण्याचा, ते अनुभवण्याचा दृष्टिकोन विशाल होतो, असे डॉ. वेस यांनी तिसऱ्या प्रकरणात नमूद केले आहे.
पुस्तकाचे चौथे आणि पाचवे प्रकरण अधिक रंगले आहे. आपल्या गतजन्मीच्या मृत्यूच्या प्रसंगांबद्दल वेस यांनी लिहून ठेवले आहे. काही जन्मांमध्ये मृत्यू येतेवेळी आपण कसे एकटे पडलो होतो आणि त्या वेळी एकटेपणाच्या भावनेची जखम किती खोलवर रुजली होती यावर त्यांनी सविस्तर लिहिले आहे. एका जन्मात मी कसा एकलकोंडी महिला पत्रकार होतो आणि अपघाती मृत्यूनंतर माझा मृतदेह घेण्यासाठी कोणीच न आल्याचा प्रसंग पचवताना आपल्याला या जन्मात किती दु:ख झाले हे त्यांनी लिहिले. मात्र त्यातूनच अतिअंतर्मुखता ही आपली चूक उलगडली आणि त्यातून आपण समाजकार्याकडे कसे वळलो, हेही नमूद केले आहे.
दु:ख कुरवाळत बसू नये आणि अंत:स्थ प्रेरणेकडे कधीही दुर्लक्ष करू नये, ही सहाव्या व सातव्या प्रकरणाची मध्यवर्ती कल्पना आहे. नववे प्रकरण निसर्ग आणि प्राणी यांच्यावर बेतलेले आहे.  थोडक्यात असे म्हणता येईल की, भारतीय विचार परंपरेत ‘काळ हा अनंत आहे’ हे जे सूत्र सांगितले जाते, त्याभोवती हे पुस्तक फिरते. त्या काळात ज्या ज्या भूमिका आपण वठवतो, त्यांचे कळत-नकळत एक ओझे आपल्या मनावर तयार होते आणि ते धागे दृढ होतात. ही वीण उसवून त्यातून बाहेर पडणे, हा ‘मिरॅकल्स हॅपन’ मंत्र आहे.
मिरॅकल्स हॅपन’- द ट्रान्स्फॉर्मेशनल हीलिंग पॉवर ऑफ
पास्ट लाइफ मेमरीज : डॉ. ब्रायन वेस,
हे हाऊस इंडिया, नवी दिल्ली,
पाने : ३५१, किंमत : ३९९ रुपये.

Story img Loader