समूह संगीतात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला, ती धून पूर्णपणे समजून घेणं, ती पाठ करणंही भाग पडलं. जे गायनात तेच समूह वाद्यसंगीतातही. भारतीय समाजजीवनात सर्वाधिक जागा व्यापणाऱ्या चित्रपट संगीतात मेलडी आणि हार्मनी यांच्या संकरातून व्यक्त होणाऱ्या समूह संगीताचं इतकं वैविध्यपूर्ण दर्शन घडत आलं आहे, की त्यानं दिपून जायला व्हावं. मेलडी हे भारतीय संगीताचं वैशिष्टय़, तर हार्मनी हे पाश्चात्त्य संगीताचं..
भारतीय उपखंडातील अभिजात संगीताच्या स्थापनेपूर्वीच्या काळात असलेलं संगीत बव्हंशी समूह संगीतच होतं. मानवाच्या उत्क्रांतीच्या काळात त्याला स्वरांचा जो शोध लागला, त्याच वेळी एकमेकांच्या गळ्यांमधून तो स्वर त्याच ‘दर्जा’चा निघू शकतो, याचंही भान आलं. त्यामुळे सगळ्यांनी मिळून एकाच स्वरात गायचं, हे शास्त्र न समजताही त्या वेळच्या माणसाला कळत होतं. समूहाच्या ताकदीचा अनुभव त्यातून येत होता. आपलं सगळं लोकसंगीत हे या समूहगानातूनच उभं राहिलं. त्यात समूहाच्या सगळ्या भावभावना व्यक्त करण्याची क्षमता होती. त्याची मूळ सुरावट कुणी तयार केली आणि ती इतरांनी कशी आत्मसात केली, असे प्रश्न कुणी कधी विचारले नाहीत. लोकसंगीतातील समूह संगीतात हे कदाचित ऐकून ऐकून समजत असलं पाहिजे. म्हणजे आपण सगळे शाळेत जायला लागल्यानंतर आपल्याला कुठे कोणी ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताची चाल समोर बसवून शिकवली होती? आपल्याला ते आपोआपच येऊ लागलं. कुण्या एकानं धून तयार केली आणि त्यात इतरांनी बदल करत करत ती स्थिरस्थावर झाली असेल. मग सगळे जण तीच स्वरावली पिढय़ान्पिढय़ा जशीच्या तशी म्हणत राहिले असतील. भोंडल्यांची गाणी ऐकताना, आरत्या ऐकताना अनेकदा त्यातला एखादा तीच चाल वेगळ्या पट्टीत गात असल्याचं सहजपणे लक्षात येतं. ते खपून जातं, कारण त्या संगीताचा संगीत म्हणून गाणारे आणि ऐकणारे विचार करत नसतात. ती फक्त एक सामूहिक कृती असते. पुरुष आणि स्त्रिया यांच्या आवाजात नैसर्गिकरीत्या फरक असतो. पुरुष खालच्या पट्टीत तर स्त्रिया वरच्या पट्टीत गातात. समूह संगीतात या दोघांना एकाच पट्टीत गायला लावणं हे आणखी एक कौशल्य असतं. गाणं न येणाऱ्यांच्या बाबतीत त्यामुळेच असे घोटाळे होतात.
उत्क्रांतीच्या काळात माणसामध्ये ज्या बौद्धिक क्षमता उपजू लागल्या, त्याचा परिणाम अभिजाततेची नवी वाट निर्माण होण्यात झाला. परिणामी, निदान संगीतानं स्वत:ची वेगळी वाट चोखाळायचं ठरवलं. संगीत हे सृजन असतं आणि त्यासाठी ते व्यक्त करणाऱ्या कलावंताची प्रतिभा महत्त्वाची असते, असं नवं गृहीत तयार झालं आणि त्यातून एका वेगळ्या संगीतपरंपरेचा भरभक्कम पाया रचला गेला. समूहानं जे संगीत ‘करायचं’ ते या स्वकेंद्रित संगीतापेक्षा वेगळं राहिलं. ते समांतर मात्र राहिलं नाही. त्या संगीतानं स्वत:चं स्थान बळकट करण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. तरीही ते टिकून राहिलं, कारण ती समूहाची गरज होती. पाश्चात्त्य संगीतातील समूह संगीतानं स्वत:चं जे वेगळं स्थान निर्माण केलं, त्यामागे निश्चित विचार होता. चर्चमध्ये गायलं जाणारं संगीत हा तेथील संगीताचा एक अतिशय प्रभावशाली भाग आहे. स्वप्रतिभेनं निर्माण होणाऱ्या संगीताच्या बरोबरीनं चर्च संगीतातही नवे प्रयोग झाले आणि ते सृजनाच्या वरच्या पातळीचेही राहिले. सगळ्यांनी एकत्र येऊन विशिष्ट पद्धतीनं एकाच प्रकारचं संगीत सादर करताना अनेक पूर्वअटी तयार झाल्या. म्हणजे त्या संगीतातील धून आधी निश्चित करणं भाग पडलं. समूह संगीतात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला, ती धून पूर्णपणे समजून घेणं आवश्यक ठरलं. ती पूर्णपणे पाठ करणंही भाग पडलं. सर्वानी एकाच स्वरात तीच धून त्याच पद्धतीनं गायची, तर त्यातल्या कुणालाही त्यात जरासाही बदल करण्याची परवानगी मिळण्याची शक्यताच नाही. म्हणजे धून निर्माण करणाऱ्या संगीतकाराच्या प्रतिभेनुसारच सगळ्या गायक कलावंतांनी गायचं हाच नियम. जे गायनात तेच समूह वाद्यसंगीतातही. जो कोणी अनेक वाद्यांच्या मेळातून तयार होणारी धून लिहून काढतो, त्यात कणभरही बदल न करता, ती जश्शीच्या तश्शी सादर करणं, हेच कलावंतांचं काम. त्यामुळे संगीतकाराची प्रतिभाच महत्त्वाची. तोच या समूहाला नियंत्रित करतो आणि त्याच्या इच्छेनुसारच सगळे वागत राहतात. संगीतकाराला समूह वाद्यसंगीतातून जो परिणाम साधायचा असतो, त्याचा विचार ते संगीत लिखित होण्यापूर्वीच झालेला असतो. पाश्चात्त्य संगीतातील ऑर्केस्ट्रामध्ये प्रत्येक वादकापुढे एका स्टॅण्डवर त्यानं काय वाजवायचं, कुठे वाजवायचं, याची नोंद करणारा स्वरलिपीचा कागदच असतो. ऐन वेळी त्यानं जराशी चूक केली, तर मग त्याची खैरच नाही. संगीत प्रत्यक्षात सादर होण्यापूर्वीच त्याचं अतिशय आखीव आणि रेखीव स्वरूप संगीतकार ठरवून ठेवतो. त्यामुळे सादर होत असताना ऐन वेळी एखाद्या वादकाला नवं काही सुचलं, तरी ती ऊर्मी दाबून टाकून लिखित संगीताच्या बरहुकूम वाजवणं, एवढाच त्याचा धर्म. (जो वाद्यवादकांचा समूह बाखच्या सिम्फनीमध्ये तसूभरही फरक न करता सादर करू शकतो, तोच रसिकांच्या प्रशंसेला पात्र ठरतो, याचं कारण हेच!)
भारतीय संगीतानं या समूह संगीताच्या पलीकडे स्वत:ची अशी एक वेगळी घटना तयार केली. अभिजात संगीतात झालेल्या सगळ्या बदलांमागे व्यक्तिकेंद्रित संगीत अधिकाधिक सर्जनशील कसं होत राहील, यावर लक्ष केंद्रित केलं गेलं. रागसंगीताच्या प्रचंड दुनियेत ते सादर करणाऱ्या प्रत्येक कलावंताच्या प्रतिभेचा विचार महत्त्वाचा ठरला. तिथं संगीत लेखनापुरतं सीमित राहिलं नाही, तर दरक्षणी मेंदूत तयार होणाऱ्या नवोन्मेषी प्रतिभेला साद घालता येईल, अशी अतिशय उन्मुक्त शैली भारतीय उपखंडात विकसित झाली. या मुक्ततेला रागाचं आणि लयीचं कोंदण मिळालं. ती त्या मुक्ततेची बाहय़ परिसीमा. त्याच्या आत राहून हवं ते करण्याचं स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी सर्जनाचं आव्हान सतत घेण्याची क्षमता कलावंताच्या ठायी निपजण्यासाठीचीही व्यवस्था या संगीतात निर्माण झाली. प्रबंध संगीतापासून ते ख्याल गायकीपर्यंतच्या सगळ्या प्रवासात कलावंताच्या प्रज्ञेला नवं काही उत्पन्न करण्याचं आव्हान सतत वाढत गेलं. त्यामुळे समूह संगीताचा संसार आहे तिथंच राहिला आणि एका नव्या शैलीनं संगीताचा सारा परिसर व्यापण्यास सुरुवात झाली. मुस्लिमांच्या आक्रमणानंतर जे संगीत भारतीय संगीतात येऊन मिसळलं, तेही व्यक्तिकेंद्रीच होतं. त्यामुळे हा संकर दुष्कर ठरला नाही. ब्रिटिशांनी संगीतात निर्माण केलेल्या अतिशय संपन्न परंपरा जेव्हा भारतीय संगीतावर येऊन आदळल्या, तेव्हा कदाचित काही काळ भारतीय संगीतानं गोगलगायीसारखंस्वत:ला कोशात ठेवून या संकटाला सामोरं जाण्याचा विचार केला असेल. पाश्चात्त्यांनी स्वरमेळाची म्हणजे हार्मनीची एक नवी कल्पना मांडली आणि त्यात अनेकांनी आपल्या सर्जनानं मोलाची भर घालत, ती कल्पना एका विशाल परंपरेत आणून उभी केली. भारतीय संगीतात मात्र स्थिर स्वर व्यक्त करणारं तंबोऱ्यासारखं वाद्य, कलावंताच्या स्वराला भराव मिळण्यासाठी सारंगीसारखं साथीचं वाद्य आणि लय सांगणारं तालवाद्य एवढीच गरज पुरेशी ठरत होती. एकाच वेळी वेगवेगळे कलावंत आधी ठरवल्याप्रमाणे वेगवेगळ्या पातळ्यांवर संगीत उभं करण्याची पाश्चात्त्यांची संकल्पना मुळातच वेगळी होती. भारतीय संगीतानं मुस्लीम राज्यकर्त्यांबरोबर आलेल्या संगीताचा अभिजात संगीतात सहज समावेश केला, तसा पाश्चात्त्य संगीतानं नव्या काळातील लोकप्रिय संगीतात सहज प्रवेश केला आणि भारतीय चित्रपट संगीताच्या दरबारात अतिशय मानाचं स्थान पटकावलं. विविध वाद्यांमधून निर्माण होणारे स्वरांचे निरनिराळे पोत एकत्र आणून एका नव्या ध्वनीची (साऊंड) निर्मिती करण्याचं आव्हान भारतीय संगीतकारांनी लीलया पेललं. भारतीय समाजजीवनात सर्वाधिक जागा व्यापणाऱ्या चित्रपट संगीतात मेलडी आणि हार्मनी यांच्या संकरातून व्यक्त होणाऱ्या समूह संगीताचं इतकं वैविध्यपूर्ण दर्शन घडत आलं आहे, की त्यानं दिपून जायला व्हावं. मेलडी हे भारतीय संगीताचं वैशिष्टय़, तर हार्मनी हे पाश्चात्त्य संगीताचं. चित्रपट संगीतात या दोन्ही परस्परांहून भिन्न असलेल्या संकल्पनांचं जे कोलाज ऐकायला मिळतं, ते अद्भुत या सदरात मोडतं. समूह संगीतानं त्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला स्वत:चं डोकं वापरण्याची मुभा ठेवली नसली, तरीही चित्रपट संगीताच्या क्षेत्रात मात्र तो सामूहिक सर्जनाचा आविष्कार होतो. प्रतिभांचा हा संगम हे संगीत जनसंगीत या पातळीपर्यंत नेण्यास कारणीभूत ठरतो आहे. भारतीय संगीतावर आलेल्या प्रत्येक आपत्तीचं संधीत कसं रूपांतर झालं, याचं हे एक देखणं उदाहरण! समूह संगीतानं भारतीय सांस्कृतिकतेमध्ये उशिरा प्रवेश केला हे खरं, पण त्यानं हजारो वर्षांच्या भारतीय मानसिकतेमध्येही गुणात्मक बदल घडवून आणले, हे नाकारता येणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा