अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देशातील अन्य राजकीय पक्षांच्या वर्गात सामील झाले तर! पक्षात आपल्याशिवाय कुणीही वरचढ होता कामा नये, यासाठी सगळ्या राजकीय पक्षांना व्यक्तिकेंद्रित राजकारणाच्या दावणीला बांधणारे नेते आणि केजरीवाल यांच्यात आता कोणताच गुणात्मक फरक राहिलेला दिसत नाही. आपचे नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना पक्षातून काढून टाकण्याची त्यांची खेळी नेमके हेच दर्शवते. सामान्यांच्या मनातील भ्रष्टाचाराबद्दलची चीड व्यक्त करणारा नेता म्हणून केजरीवाल यांना जनतेने पुन्हा निवडून दिले. पण त्यांच्या अवतीभवती असलेल्या सगळ्याच गणंगांना सत्ता मिळाल्यावर पक्षाच्या स्थापनेमागील हेतूचा  विसर पडला आणि सत्ता कोणालाही कशी भ्रष्ट करते, हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ‘एकचालकानुवर्तित्व’ या संकल्पनेला महत्त्व असते. फक्त संघाच्या सरसंघचालकांना अनुसरणे हा त्याचा व्यावहारिक अर्थ. देशातील सगळ्या राजकीय पक्षांनी संघाच्या या पोलादी चौकटीला शिव्याशाप दिले, पण ते सगळे त्याच वाटेने गेले. मग त्या         इंदिरा गांधी असोत, नरेंद्र मोदी असोत, की ममता बॅनर्जी आणि जयललिता. या नेत्यांना पक्षात आपल्यापेक्षा जास्त उंचीचा कोणीही चालत नाही. केजरीवाल यांना यादव आणि भूषण यांची अडचण वाटणे यामुळेच अगदी स्वाभाविक होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ‘आप’ने या दोघांना पक्षातून बाहेर जाण्याचा मार्ग दाखवला. या दोघांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्यांना पक्षाच्या नियामक मंडळातून काढून टाकण्यात आले. या दोघांविरुद्ध बदनामीची मोहीमही राबवण्यात आली आणि आता त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना पक्षातूनच काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. अवघ्या काही वर्षांचे अस्तित्व असलेल्या या पक्षात लोकप्रिय चेहरा म्हणून पुढे आलेल्या अरविंद केजरीवाल यांचा अहंगंड आणि पक्षाला वैचारिक बैठक मिळवून देण्याची भाषा करणारे यादव-भूषण यांच्यातील ही स्पर्धा सामान्यांच्या आकलनापलीकडची आहे. सत्ताकेंद्र आपल्या हाती ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे चक्रव्यूह रचले जात असल्याचा अनुभव देशातील अनेक राजकीय पक्षांनी आजवर घेतला आहे. भाजपमध्ये नरेंद्रांचा रथ दौडत राहावा, यासाठी लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठांना कसे दूर ठेवण्यात आले, हेही अद्याप विस्मरणात गेलेले नाही. सत्ताकेंद्राच्या बचावासाठीच सगळ्यांना कसे वेठीला धरले जाते, याचा अनुभव पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दोन महिन्यांच्या अनुपस्थितीबद्दल समर्थन करताना, झालेल्या फरफटीने नुकताच आला. ममता बॅनर्जी, जयललिता आणि मायावती या तिघींना सत्तापदाचा जो रोग जडला आहे, त्याच्या अनेक सुरस कहाण्या आता माहीत झाल्या आहेत. सत्ता मिळणे आणि ती योग्य रीतीने टिकवणे या दोन वेगळ्या गोष्टी असतात, याचे भान अद्यापही केजरीवाल यांना आलेले दिसत नाही. पक्षात सर्वेसर्वा होण्याचे लाभ असतात. परंतु त्यासाठी सहकाऱ्यांशीही पक्षात राहून स्पर्धा करावी लागते. ती गुणवत्तेवर करण्याची िहमत लागते. केजरीवाल यांना मात्र हे मान्य नाही. ते अतिशय खालच्या पातळीवर जाऊन कोणत्याही चर्चेविना आपले स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात आहेत. हे वर्तन त्यांच्या पक्षाला फायद्याचे की तोटय़ाचे हे आता पाहावे लागेल.

Story img Loader