दिल्लीच्या निवडणुकीला पंतप्रधानांनी विनाकारण प्रतिष्ठेचा प्रश्न केले होते, त्यामुळे आता त्यांच्या प्रतिष्ठेवर काही शिंतोडे उडणार. पण याचा अर्थ मोदी युग संपले असा काढता येणार नाही. कुठल्याही पंतप्रधानाची पहिली दोन वर्षे ही लोकप्रियेतत जातात. मोदी यांचा रथ ‘आप’च्या विजयाने थबकला आहे पण पूर्ण थांबलेला नाही. ध्येयनिष्ठ, स्वच्छ, आदर्शवादी राजकारण देशाला देण्याची ‘आप’ची जबाबदारी वाढली आहे..
माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले तेव्हा नील आर्मस्ट्राँग म्हणाला होता, की माझे हे पाऊल माणसासाठी छोटे असले, तरी मानवतेसाठी एक मोठी उडी आहे. आज दूरचित्रवाणीवर दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहताना हे वाक्य आठवत होते. एखाद्या कामात झोकून दिले तर काय घडू शकते ते दिसले. दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल म्हणजे आम आदमी पक्षासारख्या छोटय़ा मुलाकडून मारली गेलेली एक मोठी उडीच आहे. राजकारण बदलण्यासाठी आमचे जे स्वप्न आहे त्या दिशेने हे एक छोटेसे पाऊल आहे.
गेले तीन-चार आठवडे असे वाटत होते, की दिल्लीत हवा नाही तर वादळ येते आहे. जेव्हा मी तसे सांगत होतो, तेव्हा लोक त्याला प्रचाराचा भाग समजत होते पण आम्ही पाहणी केली होती व त्याचे निकाल पत्रकार परिषद बोलावून जाहीरदेखील केले होते. त्या वेळी मी म्हटले होते, की आम आदमी पक्षाला ५१ जागा मिळण्याची शक्यता आहे व तो आकडा ५७ पर्यंत जाऊ शकतो. सगळ्यांनी असा विचार केला की, मी माझी जुनी कमाई राजकीय प्रचारात खर्च करत आहे. एखादा नेता खरे बोलू शकतो यावर आता आपला विश्वास बसत नाही, पण निकाल पाहिले तर मी सांगितले त्याच्याही पलीकडे जास्त जागा देत ही निवडणूक आम आदमी पक्षाला सत्ता देऊन गेली. आपण केलेले भाकीत खोटे ठरल्याचा इतका आनंद कधी झाला नव्हता. कारण मी सांगितल्यापेक्षा खूप जास्त जागा आम आदमी पक्षाला मिळाल्या होत्या.
हा एक ऐतिहासिक विजय आहे. केवळ मताधिक्यातील फरकाच्या अंतरामुळे तो ऐतिहासिक आहे असे म्हणायचे नाही, कारण तामिळनाडूत विरोधी पक्ष एवढय़ा मोठय़ा प्रमाणात एक-दोनदा भुईसपाट झालेले आहेत. आतापर्यंतचे कल पाहिले तर आम आदमी पक्षाला भाजपवर २१ टक्के आधिक्य मिळाले आहे. असा विजय केवळ एखाद्या समाज किंवा गटाच्या पाठिंब्याने मिळत नाही. सुरुवातीला आम आदमी पक्षाने गरीब, मेहनती, झोपडपट्टीत राहणारे लोक यांचा पाठिंबा मिळवला; पण जशा निवडणुका आल्या तसे मध्यमवर्ग व तुलनेने श्रीमंत वर्गही आम आदमी पक्षाकडे झुकत गेला. जे लोक मत देऊ शकले नाहीत त्यांनी आशीर्वाद जरूर दिले. साधारणपणे निवडणुकीच्या निकाल विश्लेषणात जनादेश या शब्दाचा फार दुरुपयोग होतो, पण जर आपल्याला खरा जनादेश पाहायचा असेल, तर तो या निवडणुकीत दिसला आहे. हा विजय दुसऱ्या एका अर्थानेही ऐतिहासिक आहे. केवळ १० महिने आधी (लोकसभा निवडणुकीत) सगळ्या जागा हरलेला व १४ टक्के मतांनी पिछाडीवर गेलेला पक्ष पुन्हा कधी वर येऊ शकलेला नाही, पण आम आदमी पक्षाने ते करून दाखवले. कर्नाटकमध्ये रामकृष्ण हेगडे यांनीही १९८५ मध्ये अशाच परिस्थितीत त्यांच्या पक्षासाठी विजयाची कमाल करून दाखवली होती पण आजचा विजय हा हेगडेंनी मिळवलेल्या विजयालाही मागे टाकणारा आहे.रथ थबकला, दीप उजळला
हा विजय मोठा असल्याने त्याचे निष्कर्षही मोठे-मोठे काढले जातील. मोदी लाट संपली, आता देशाचे राजकारण बदलू लागले आहे, असे सांगितले जाईल पण विजयाच्या या क्षणी अशा लांबलचक बाता मारण्यापासून दूर राहिले पाहिजे. यात काही शंका नाही, की गेल्या वर्षभर भाजपचा अश्वमेध यज्ञाचा घोडा चौखूर उधळला होता, त्याला एका मुलाने (केजरीवाल) रोखले आहे. अपराजित असलेल्या मोदींची जादू ओसरली आहे. पंतप्रधानांनी विनाकारण या निवडणुकीला प्रतिष्ठेचा प्रश्न केले होते, त्यामुळे आता त्यांच्या प्रतिष्ठेवर काही शिंतोडे उडणार यात शंका नाही. पण याचा अर्थ मोदी युग संपले असा काढता येणार नाही. कुठल्याही पंतप्रधानाची पहिले दोन वर्षे ही लोकप्रियेतत जातात, अजून देशाच्या जनेतने मोदी यांना मोडीत काढलेले नाही. त्यांचा रथ थबकला आहे पण पूर्ण थांबलेला नाही. बिहार व उत्तर प्रदेशमध्ये आम आदमी पक्षासारखे राजकीय पर्याय नाहीत त्यामुळे तेथे भाजपच्या पराभवाची भविष्यवाणी करणे वेडेपणाचे ठरेल.
या पराभवामुळे भाजपचा विजय रथ थांबला की नाही ही गोष्ट वेगळी पण एक गोष्ट जरूर झाली आहे ते म्हणजे राजकारणातील आशेचा दीप पुन्हा उजळला आहे. तीन वर्षे अगोदर या देशातील लोकांनी अशी आशा बाळगली होती. राजकीय नेत्यांना राजा तर स्वत:ला हतबल प्रजा मानणाऱ्या जनतेने स्वत:वर विश्वास ठेवायला शिकण्यास सुरुवात केली होती. या विश्वासाचे प्रतीक आम आदमी पक्षाच्या रूपाने जन्मले. आशा खूप होती व पक्ष खूप छोटा होता. शक्यता खूप मोठी होती पण आमची क्षमता छोटी होती. दिल्ली विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत शक्यता अचानक उंचावल्या, लोकसभा निवडणुकीत त्या विझल्या पण त्या खरोखरच्या विझल्या नव्हत्या. राजकारणात प्रथमच आशा बाळगणाऱ्या लोकांना खरोखरच आशेचा दीप विझल्यासारखे वाटले. आज या आशेचा दीप पुन्हा झगमगून गेला आहे. विजयाच्या उन्मादात ती आशा खरी ठरली असे समजणे ही चूक ठरेल.
आदर्शवादाची शक्ती
आम आदमी पक्ष ज्या आंदोलनात जन्मला त्याचे ध्येय दिल्लीच्या निवडणुका जिंकणे हे नव्हते. यात केवळ काँग्रेस व भाजपला विरोध किंवा काँग्रेस-भाजप विरोधाचे प्रकटीकरण करायचा हेतू नव्हता. हे आंदोलन देशातील सत्तेच्या विरोधात आम आदमीचा आवाज आहे. लोकशाहीत ज्यांचा आवाज दाबला गेलेला आहे, त्यांची ही आर्त हाक आहे. निवडणुका जिंकून राजकीय पर्याय उभा करणे हे त्याचे एकमेव ध्येय नाही, या आंदोलनाचे उद्दिष्ट देशभरात पर्यायी राजकारण उभे करण्याची आहे. हे काम सोपे नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणे एका रात्रीत होणारे काम नाही. देश बदलण्याचे काम जादूच्या छडीने होणार नाही, त्यासाठी लाखो युवकांना राजकारणाच्या युगधर्माशी जोडून घ्यावे लागेल. प्रत्येक गाव, गल्लीत आदर्शवादाची शक्ती प्रस्थापित करावी लागेल, त्यात केवळ बोलघेवडेपणा करणे किंवा घाईने काही करणे घातक ठरेल.
चंद्रावर गुरुत्वाकर्षणशक्ती कमी असल्याने आपली पावले पटापट पडतात किंबहुना उडय़ा मारतच चालावे लागते त्यामुळे अंतराळवीर जड पोशाख घालून पाय जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करतात. आजचा विजय हा असाच हलकेपणा जाणवून देणारा वाटू शकतो. कदाचित त्यामुळे आपले पाय जमिनीवर असणार नाहीत आपण तरंगतो आहोत असे वाटेल पण जनतेच्या आशा-आकांक्षांपेक्षा दुसरी कुठलीच वजनदार वस्तू या जगात नाही जी तुम्हाला तुमचे पाय जमिनीवर ठेवायला भाग पाडते. त्यामुळे या विजयामुळे एकदम भारावून न जाता जनतेच्या आशा-आकांक्षांची जाण ठेवून त्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
योगेंद्र यादव
विजयाइतकीच जबाबदारीही मोठी
दिल्लीच्या निवडणुकीला पंतप्रधानांनी विनाकारण प्रतिष्ठेचा प्रश्न केले होते, त्यामुळे आता त्यांच्या प्रतिष्ठेवर काही शिंतोडे उडणार.
First published on: 11-02-2015 at 01:02 IST
मराठीतील सर्व देशकाल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aam aadmi party responsibility become big after the historical victory in delhi