प्रा. मंजिरी घरत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मधुमेह, रक्तदाब यांसारख्या ‘जीवनशैलीजन्य’ आजारांचे भारतातील प्रमाण गेल्या १६-१७ वर्षांत दुपटीने वाढले. अशा व्याधी असलेल्या व्यक्तींना विषाणूसंसर्गाचा धोका अधिक, हेही दिसून आले आहे. विषाणूवर मात तर अद्याप आपल्या हाती नाही.. पण जीवनशैली बदलून काही व्याधींना आपण दूर ठेवू शकतो!

असे म्हणतात की निरामय- हेल्दी राहाणे स्वस्त आहे; मात्र आजारी पडणे भयंकर महाग! कोविडने आपल्याला अनेक महत्त्वाच्या बाबींची नव्याने जाणीव दिली आहे. या महासाथीत प्रकर्षांने दिसून आलेली एक बाब म्हणजे करोना विषाणूची लागण होण्याची शक्यता आणि झाल्यास होणारी गुंतागुंत, मृत्यू हे मधुमेह, हृदयरोग, अस्थमा अशा जुनाट असंसर्गजन्य (नॉन- कम्युनिकेबल) आजार असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक आहे. संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांची युती म्हणजे ज्याला जुनाट आजार, त्याला विषाणूबाधा होण्याचा धोका अधिक. ही शक्यता कोविडपुरतीच मर्यादित नाही. टीबी, एड्स अशा इतर संसर्गासाठीसुद्धा हे सिद्ध झाले आहे. मधुमेह आणि टीबी यांची मैत्री किंवा हातमिळवणी तर अगदी गहिरी आहे. जुनाट आजारांमुळे प्रतिकारशक्ती कमी होते, त्यात जर आजार नियंत्रित नसेल (अनकन्ट्रोल्ड असेल) तर साथीची इन्फेक्शन्स किंवा एरवीही आपल्या आसपास भटकणाऱ्या संधिसाधू सूक्ष्मजंतूंना अशा व्यक्ती म्हणजे पर्वणी ठरतात.

जागतिक स्तरावर एकूण मृत्यूंपैकी ७१ टक्के मृत्यू हे या प्रकारच्या आजारांनी होतात. या मृत्यूंपैकी तब्बल ७० टक्के मृत्यू हे निम्न आणि मध्यम आर्थिक स्तरांतील देशात होतात. चुकीच्या जीवनशैलीने होणारे हे आजार पूर्वी श्रीमंत, विकसित देशांचे मानले जाणारे; आता गरीब/श्रीमंत, आबालवृद्ध साऱ्यांच्याच ‘राशीला’ आहेत. आपल्या देशात विविध रोगांच्या एकूण ओझ्यामध्ये (डिसीझ बर्डन ) १९९० साली जुनाट आजारांचे प्रमाण केवळ ३० टक्के आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण ३७ टक्के होते, तेच २०१६ मध्ये जुनाट आजारांचे प्रमाण तब्बल ५५ टक्के झाले, तद्नुषंगिक मृत्यूंचे प्रमाण ६१ टक्के झाले. म्हणजे अनारोग्यात सिंहाचा वाटा या व्याधींचा आहे. गेल्या दोन-अडीच दशकांत, विशेषत: मागील दशकात आपण जीवनशैली पार बिघडवून जुनाट आजारांचे प्रमाण दुप्पट केले. प्रदूषणासारख्या समस्यांनी अनारोग्यात अधिकच भर घातली. मधुमेह आणि रक्तदाब (बीपी) हे तर जुळ्यांची साथ (ट्विन एपिडेमिक) आहे. या आजारांचे १९९० ला जे प्रमाण होते त्यात समजा किरकोळच वाढ झाली असती, आता आहे तशी दुप्पट झाली नसती तर आज आपण बऱ्यापैकी ‘स्वस्थ भारत’ असतो. पण तसे होणे नव्हते. त्यामुळेच ‘मधुमेह, हृद्रोग, कर्करोग नियंत्रण राष्ट्रीय कार्यक्रम’ २०१० मध्ये चालू करण्याची वेळ शासनावर आली. मधुमेहाचे कमीतकमी तब्बल आठ कोटी, उच्च रक्तदाबाचे साधारण १५ ते २० कोटी रुग्ण आहेत. आणि हो, ही संख्या जरा फसवीच आहे. कारण का?

कारण हजारो लाखो लोकांना, त्यांना असे काही आजार आहेत आणि त्यानुसार उलथापालथ शरीरात चालू आहे याचा पत्ताच नाही. खरे तर, असे आजाराचे अज्ञान हेच सर्वाधिक काळजीचे कारण आहे. आज कोविडमुळे एसिम्प्टोमॅटिक (लक्षण नसलेला) हा शब्द सर्वाना परिचित झाला आहे, त्याचा आपण धसकाही घेतला आहे. तर या मधुमेह, बीपीसारख्या आजारातही बऱ्याच काळापर्यंत काही रुग्णांमध्ये फारशी नेमकी लक्षणे दिसतातच असे नाही. काहींमध्ये दिसतात, काहींमध्ये नाही. त्यातही समजा लक्षणे दिसली, तरी आपल्याकडे दुर्लक्ष, चालढकल करणे ही सर्वसाधारण सवयच. तर हे आजार ‘सायलेंट किलर’सारखे, चोर पावलांनी येणारे असल्याने आणि आपल्या निष्काळजी वृत्तीमुळे साधारण २५ टक्के ते ५० टक्के लोक हे अनडिटेक्टेड, म्हणजे रोगनिदान न झालेले, आजाराचे लेबल न लागलेले असतात.

तरुणवर्गातही १० पैकी कमीतकमी एक जण हा रक्तदाबाचा रुग्ण असतो. वयाच्या विशी-तिशीतच हे आजार मागे लागत आहेत. आपल्याकडे स्वत:हून वार्षिक वैद्यकीय तपासणी (नोकरीतून तपासण्या झाल्या तरच) वगैरे करण्याची पद्धत फारशी नाही त्यामुळे ‘आजारपूर्व’ स्थितीत किंवा आजाराच्या सुरुवातीच्या स्थितीत (अर्ली फेज) निदान होत नाही. त्यामुळे हार्ट अ‍ॅटॅक, स्ट्रोक, किडनी फेल्युअर अशा इमर्जन्सी आपण ओढवून घेतो.

आपले जीवन कायमस्वरूपी व्यापणाऱ्या या ‘जीवनशैलीजन्य आजारां’चे (लाइफस्टाइल डिसीझ) निदान करणे काही कठीण आहे का हो? बिलकूलच नाही. मधुमेह, बीपी अशा आजारांचे निदान करण्यासाठी तर किती साध्या सोप्या टेस्ट आहेत. आणि हे सर्व आजार आपल्याला अवधी, सुधारायला संधी देतात. तुम्हाला माहीत असेल की १४०/९० च्या वर बीपी सातत्याने राहात असेल तर बीपीचा रुग्ण म्हणून औषधपाणी चालू होते. पण बीपी १३०/८० आणि १४०/९० च्या अधेमधे असेल तर ती आजाराची पूर्वस्थिती.. म्हणजे तेव्हाही आपण आपल्या जीवनशैलीत सुधारणा केली तर आपण ‘रुग्ण’ होणे टाळू शकतो! हीच बाब मधुमेह पूर्वस्थिती असेल तर लागू होते.

आपण कोविडच्या महासाथीविषयी आज बोलतो आहोत, ती आज ना उद्या कमी होईल, पण हे जुनाट आजार तर आपल्या पाचवीलाच पुजले आहेत. तिकडे नव्याने लक्ष देणे जरुरीचे आहे. आजारांची ‘फॅमिली हिस्टरी’ असेल तर अधिकच सतर्क राहायला हवे.

गेल्या काही वर्षांत प्रत्येक छोटय़ा मोठय़ा शहरात अक्षरश: शेकडय़ाने फूड जॉइंट्स, हॉटेले/ रेस्तराँ वाढली. पिझ्झा, फ्रँकी, चायनीजपासून ते केक्स, डोनट्स, आइस्क्रीम/ ज्यूस सेंटर्स पावलोपावली दिसू लागली, त्यांनी शहरे अक्षरश: सुजून गेली. त्यातच बैठी, सुस्त जीवनशैली (फिजिकल इनॅक्टिव्हिटी) वाढत गेली. अमेरिकेतील मेयो क्लिनिकच्या डॉक्टर जेम्स लीव्हाइन यांनी ‘सीटिंग इज स्मोकिंग’ हा विचार २०१५ मध्ये मांडला. अगदी शब्दश: नाही घेऊ शकत याचा अर्थ- कारण धूम्रपान हे तुलनेने खूप जास्त धोकादायक; पण तासन्तास एका जागी बसून काम केल्याने, किंवा मोबाइल/ टीव्ही कॉम्प्युटरच्या ‘स्क्रीन टाइम’मध्ये अडकून पडल्याने अति लठ्ठपणा, मधुमेह, हृद्रोग होण्याची शक्यता निश्चित वाढते, बैठी जीवनशैली हा एक स्वतंत्र धोकादायक फॅक्टर आहे. ‘सीटिंग किल्स, मूव्हिंग हील्स’, हे पुस्तक नासाच्या एक  वैज्ञानिक डॉ. जोन व्हर्निकोस यांनी २०११ मध्ये लिहिले होते. अधूनमधून छोटय़ाछोटय़ा हालचाली, थोडेसे चालणे केल्यासही शरीररूपी मशीन चांगले ‘चालत’ राहते. जरी आनुवंशिकता, वाढते वय, प्रदूषण, ताणतणाव हीसुद्धा काही कारणे या आजारांना कारणीभूत असली; तरी चुकीचा आहार आणि बैठी जीवनशैली ही दोन अशी करणे आहेत की, ज्यावर  काम करणे आपल्या सहज हातात आहे. अर्थात धूम्रपान आणि दारूचे व्यसन ही ‘एव्हरग्रीन’ प्रमुख कारणे या आजारांमागे आहेतच.

‘लॉकडाऊन’च्या काळात २२ मार्चपासून ते जूनच्या आरंभापर्यंत मागूनही जी संधी मिळाली नसती किंवा ठरवूनही जमले नसते अशी हॉटेलिंग, मॉल्स यांपासून दूर राहण्याची अभूतपूर्व संधी करोनाने आपल्याला आपोआप अचानक दिली. बहुतेक लोक घरचे जेवण जेवले. घरातील छोटीमोठी कामे, व्यायामही केला. याचे अनेक चांगले परिणाम बहुतेकांना जाणवत असतील. दारूपासून अनेकांना सक्तीने, नाइलाजाने काही काळ दूर राहावे लागले. कुटुंबीयांसोबत सतत असल्याने धूम्रपानही कमी झाले असणार. आपल्यासाठी अत्यावश्यक काय आणि अनावश्यक काय याचे साक्षात्कार अनेकांना झाले असतील.

इन्फेक्शन्सना कायमचे दूर ठेवण्यासाठी आपण अनेक लसी (व्हॅक्सिन) विकसित केल्या आहेत. सध्या कोविड व्हॅक्सिनसाठी कोटय़वधी रुपये खर्च, मेहनत, यशाची अनिश्चितता या परिस्थितीत आपण आहोत. महासाथ आपण टाळू शकत नाही, या पार्श्वभूमीवर विचार करता जीवनशैलीने होणाऱ्या बऱ्याच आजारांना दूर ठेवणे, यासाठी करण्याचे अनेक साधे सोपे प्रतिबंधात्मक उपाय करणे तर आपल्याच हातात आहे की नाही ? ज्यांना दोन वेळच्या खाण्याची भ्रांत आहे त्यांना कठीण; पण बाकीच्यांनी तरी या संदर्भात विचार आणि कृती करायलाच हवी ना?

जीवनशैलीतील बदल हे सर्वात परिणामकारक, सर्वात स्वस्त, सोपे पण सर्वाधिक दुर्लक्षित ‘औषध’ आहे हे मनात कोरूनच ठेवायला हवे. तर मंडळी, ज्यांनी प्रयत्नपूर्वक आहार-विहार उत्तम ठेवलाय त्यांनी नाही, पण इतर सर्वानी या दृष्टीने गांभीर्याने विचार करावाच. त्यासाठी हे पाच मुद्दे लक्षात घ्यावेत : (१) चुकीच्या आहाराच्या आहारी न जाणे (काय, किती, केव्हा खायचे याबाबत गोंधळ असेल तर ‘माहितीच्या महापुरा’त वाहून न जाता वैद्यकतज्ज्ञांचा सल्ला घेतलेला बरा); (२) आवडेल तो व्यायाम, पण नियमितपणे करणे, घरच्या घरीही हे सहज शक्य आहे, जिम पाहिजेच असे नाही; (३) बैठा व्यवसाय असेल तर दर अर्ध्या तासाने थोडे चालणे, फिरणे; (४) वर्षांतून एकदा तरी काही बेसिक मेडिकल तपासणी करणे; (५) व्यसनांमधून जाणीवपूर्णक सुटका करून घेण्याचा प्रयत्न करणे.

बेंजामिन फ्रँकलिन यांनी जे अग्निसुरक्षेबाबत म्हटले तेच आरोग्याबाबत त्रिवार सत्य आहे : ‘अ‍ॅन औंस ऑफ प्रिव्हेन्शन इज वर्थ अ पाऊण्ड ऑफ क्युअर’.. निरामय राहण्याच्या मणभर यशासाठी कणभर प्रयत्न तर करू या!

लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.

ईमेल : symghar@yahoo.com

मराठीतील सर्व आरोग्यनामा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on get rid of some ailments by changing our lifestyle abn