प्रा. मंजिरी घरत

मोठय़ा प्रमाणात कोविड रुग्ण पूर्ण बरे होत आहेत, ८० टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत किंवा किरकोळ लक्षणे दिसतात, हे सारे खरे.. तरीही ‘करोनासह काही काळ जगावे लागेल’, हे गृहीत धरून मानसिकता बदलण्याची गरज आहे..

‘‘तू कमाल केलीस यार, मलापण जेवढे जमले नाही ते तू करून दाखवलेस.’’ छोटासा करोना दचकलाच. कुणाचा हा मोठ्ठा आवाज- ‘‘तू साऱ्या जगाला तुझ्याभोवती फिरवतोयस, २१३ देश, ५७ लाख लोकांना लागण, साडेतीन लाख मृत्यू! काय लीलया तू इथून तिथं पोहोचतोस.. समाजमाध्यमे वापरणारे लोक एखादे चित्र, व्हिडीओ अनेकांकडे गेल्यावर म्हणतात ‘व्हायरल झाले’; तू त्यांना खरे व्हायरल होणे काय ते दाखवून दिलेस. देशोदेशींचे संशोधक तुला मारण्यासाठी उपाय शोधताहेत, जुनी औषधे काय काय तर्क लावून लागू होतात का तपासताहेत, प्रतिबंधासाठी तुला हाताशी घेऊन लसीचा शोध घेताहेत. हे बघ, पण गाफील राहू नको. चकवा देणे ही आपली खासियत आहे. ती टिकव, नाही तर टिकणार नाहीस. बघ, मी साऱ्यांना पुरून उरलोय. भले औषधे आली माझ्याविरुद्ध, पण तब्बल गेली ३० वर्षे हे सगळे माझ्याविरुद्ध लसी शोधताहेत, पण नुसतेच फशी पडताहेत. पण आपल्या काही बांधवांनी मात्र लवकर शरणागती पत्करली. तो ‘इबोला’ बघ, आली की त्याची लस अवघ्या ५ वर्षांत. मी तर इबोलाशी अबोलाच धरलाय. त्यापेक्षा तो ‘एच १एन१’ बरा, सवाई आहे अजून फ्लूमध्ये. आणि लक्षात घे, मला असे वाटते, तू नशीबवान आहेस, तुला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व दिले जातेय, तुझे ग्लॅमर बघून कधी मला असूयाही वाटते. पण ते असो, बेटा, आगे बढो !’’ – ज्येष्ठ दहशहतवादी विषाणू एचआयव्ही (एड्स विषाणू)ने नवोदित, महापराक्रमी करोना विषाणूशी संभाषण केले, तर ते असेच असेल!

यातील विनोदाचा भाग सोडून देऊ, पण सूक्ष्म जीवांची विजिगीषु वृत्ती, त्यांचे स्वत:ला बदलण्याचे चातुर्य आणि मानवी बुद्धिमत्ता, चिकाटी यांची नेहमीच स्पर्धा चालू असते. यात कधी मानवाची तर कधी सूक्ष्म जीवांची सरशी होते. पाहुण्या करोनाचा मुक्काम अद्याप हलत नाही. कोविडचा प्रवास पँडेमिक (महामारी) ते एंडेमिक (साथ आली आणि गेली असे न होता, कायम रेंगाळत राहते) असा चालू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. साथ म्हणून आला आणि सोबतच राहणार की काय असे चित्र आहे. ‘करोनासह जगायला शिकू या’ असे जागतिक आरोग्य संघटनेपासून सारेच म्हणत आहेत. नवीन विषाणू, नवीन आजार म्हणून त्यामुळे आपल्याला हळूहळू तो उमजतो आहे.

औषध फक्त रोगी व्यक्तींसाठी उपचारांसाठी असते. लस मात्र रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून असते, आणि त्यामुळे ती सरसकट सर्वाना दिली जाते. लसीकरणाने शरीरात त्या विशिष्ट आजाराविरुद्ध प्रतिकारकशक्ती तयार होते. लसींमुळे आपण काही इन्फेक्शन्सचे समूळ उच्चाटन केले तर अनेक रोगांना नियंत्रणात ठेवू शकलो. देवी (स्मॉल पॉक्स) या आजाराविरुद्ध पहिली लस तयार करण्यात आली. काही लसी दीर्घकालीन प्रतिकारशक्ती तयार करतात, काही मर्यादित अवधीसाठी. प्रत्येक देशातील प्रचलित इन्फेक्शन्सप्रमाणे त्या त्या देशाचे राष्ट्रीय लसीकरण नियम ठरतात. उदा. यलो फीव्हरची लस आफ्रिकेत लसीकरण कार्यक्रमात आहे, आपल्याकडे नाही. अमेरिकेत सीझनल फ्लूचीदेखील लस देतात, दर वर्षी. तिथे फ्लूने लाखो लोकांना इन्फेक्शन होते, मृत्यूही होतात. फ्लूचे विषाणू सारखे बदलतात. त्यामुळे दरवर्षी चक्क तिथे फ्लू व्हॅक्सिन अपडेट होते, नवीन व्हर्जन येतात. सर्व इन्फेक्शन्ससाठी लस निर्माण करता येतेच असे नाही. त्यातही विशेषत: विषाणू (जिवाणूंपेक्षा) अतिशय चंचल. याच कारणामुळे तीन दशके लोटली तरी एड्सविरुद्ध लस नाही. संशोधनासाठी विषाणूंची प्रयोगशाळेत वाढ करणेही कठीण असते, कारण त्यांच्याकडे पुनरुत्पादन करायला स्वत:ची अशी काहीही यंत्रणा नसते. त्यांना वाढवायला जिवंत पेशी लागतात, त्यामुळे अँटिव्हायरल औषधे किंवा लस संशोधन हे जास्तच आव्हानात्मक असते.

‘कोविड-१९’विरुद्ध लसीसाठी संशोधकांचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत; पण ते असे झटपट होणारे काम नव्हे. मागच्या लेखात आपण नवीन औषधासाठीची दीर्घ गुंतागुंतीची प्रक्रिया पाहिली, तसेच लसनिर्मितीचेही असते, त्यात तडजोड करता नाही येत. ‘अति घाई संकटात नेई’ हे नवीन लस/औषधनिर्मितीबाबत सत्य. त्यामुळे परिणामकारकता आणि सुरक्षितता याची खात्री झाल्याशिवाय त्यास मान्यता मिळत नाही. कोविडबाबत आत्ता आपण अशा स्थितीत आहोत की सामूहिक प्रतिकारशक्ती तयार होईपर्यंत आणि लस येईपर्यंत कोविड आपल्याभोवती कमीअधिक प्रमाणात रेंगाळत राहणार आहे.

करोनाने आपल्याला ‘नॉर्मल’पासून ‘न्यू नॉर्मल’कडे नेले आहे. मानवी उत्क्रांतीचाही तो एक भाग असेल. आपण कसे वागावे हेसुद्धा विषाणू ठरवताहेत. एखादा आजार स्थानिक (एंडेमिक) होऊ लागला तर त्यापासून बचाव करण्याची मोठी जबाबदारी ही प्रत्येक नागरिकावर येते. कारण व्यक्तीने केलेले वर्तणुकीतील बदल आजाराला नियंत्रण ठेवण्यास मोठी भूमिका बजावतात. त्यासाठीच कोविडभान बाळगणे, नव्हे बाणवणे आता अपरिहार्य झाले आहे. यामुळे कोविडच काय क्षयरोग म्हणजे ‘टीबी’पासून (वर्षांला साधारण साडेचार लाख मृत्यू, दिवसाला हजाराहून जास्त) ते पोटाच्या अनेक इन्फेक्शन्सनाही आपण कमी करू शकतो. एकीकडे काही असे लोक दिसताहेत की अंतरसोवळे फारसे न पाळता बिनधास्त वावरत स्वत:ला, इतरांना धोका निर्माण करताहेत. हे बेशिस्त वर्तन थांबायला हवे. दुसरीकडे असेही दिसते की अनेकांच्या मनात भीतीने (पॅनिक) इतके घर केले आहे की, बाहेरच्या विषाणूपेक्षा मनातील भयाणू अधिक त्रासदायक ठरणार आहे. कोविड लागण झाल्यास पुढच्या सर्व सोपस्कारांच्या विचारानेही माणसे अधिक अस्वस्थ आहेत हेही खरेच. ज्यांना घरून काम किंवा तत्सम सोय आहे किंवा जे ‘हाय रिस्क’ आहेत ते सोडून बाकीच्यांना शासननियमांच्या अधीन राहून कधी ना कधी ऑफिस, व्यवसाय चालू करावे लागेलच. टाळेबंदी संपेल तेव्हा संपेल, पण मनातील टाळेबंदी आधी संपवणे गरजेचे आहे. भीतीची जागा कृतीने घ्यायला हवी. कोविड रुग्णाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनही अतिशय सकारात्मक, समजुतीचा हवा.

लक्षात घेणे गरजेचे आहे की जरी नेमके औषध नसले तरी मोठय़ा प्रमाणात कोविड रुग्ण पूर्ण बरेही होत आहेत, ८० टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत किंवा किरकोळ लक्षणे दिसतात. दाट लोकसंख्येमुळे काही ठिकाणी आव्हाने मोठी आहेत तरी स्वत:ची प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) चांगली ठेवणे, थोडासा धोका असणार हे गृहीत धरून आवश्यक काळजी घेणे, अशा प्रकारे पुढे जायला हवे. प्रत्येकाने आपल्या रोजच्या रूटीनमध्ये कशी कशी काळजी घ्यावी लागेल याची मनात रंगीत तालीम करणे जरुरीचे आहे. अत्यावश्यक सेवेतील लोक अव्याहत राबत आहेत याची कृतज्ञतेने नोंद घेणेही आवश्यक आहे.

नुकतेच अमेरिकेच्या ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल’च्या संकेतस्थळावर काही अपडेट दिलेत, त्यानुसार वस्तू हाताळल्याने, स्पर्श केल्याने विषाणू संक्रमणाची शक्यता कमी (शून्य नव्हे, पण कमी) असते. तरीही आपण सावध असले पाहिजेच; पण सारखा सगळीकडे संशय घेऊन मंत्रचळेपणा करणेही अयोग्य- कारण भित्यापाठी ब्रह्मराक्षस! वस्तुनिष्ठ विचार करायला हवा. रुग्णाशी निकट संपर्क, रुग्णाच्या खोकणे/ शिंकणे/ बोलण्यातून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म थेंबांमार्फत संक्रमणाची सर्वाधिक शक्यता असते. त्यामुळे ‘एकमेकांपासून अंतर’ हे सध्या ‘सामाजिक औषध’ आहे हे मनावर कोरायलाच हवे. कमीतकमी तीन मीटरचे अंतर राखणे, मुखपट्टी, हातांची स्वच्छता, कोणाहीसमोर न खोकणे/थुंकणे ही चारही सूत्रे एकत्रित पाळणे महत्त्वाचे. कार्यालयात किंवा सार्वजनिक ठिकाणी जर काही वस्तूंना (दारे, फाइल्स, कपाटे, हँडल, ट्रेनमधला लोखंडी बार इत्यादी) स्पर्श करण्यावाचून पर्याय नसेल तर हात स्वच्छ केल्याशिवाय बिलकूल चेहऱ्याकडे न्यायचे नाहीत. ही एक मूलभूत काळजी घेतल्यास आपण संक्रमणाची शक्यता कमी करतो. कार्यालयातील, सोसायटीतील स्पर्श होणारे कठडे, लिफ्ट आदी नियमित स्वच्छ करणे, जंतुनाशकाने पुसणे अशी काळजी घेत, कार्यालयातील किंवा घरी येऊ लागलेल्या नोकरवर्गालाही हे शिकवून त्यांनाही कोविड-साक्षर करणे आवश्यक आहे. कोविडसदृश लक्षणे आढळल्यास स्वमनाने उपचार न करता वैद्यकीय सल्ला त्वरित घेणेही आवश्यक!

रेन्होल्ड निबुहर या अस्तिकतावादी अमेरिकन विचारवंतांची शांतता प्रार्थना आहे :

हे ईश्वर, ज्या गोष्टी आम्ही बदलू शकत नाही,

त्या शांतपणे स्वीकारण्याची शक्ती दे

ज्या गोष्टी बदलायला हव्यात,

त्या बदलण्याचे धैर्य दे

आणि वरील दोन्ही गोष्टींमधील फरक

ओळखण्याची हुशारी दे!

कोविडला स्वीकारत, ‘बेशिस्तही नको, भीतीही नको, काळजी घेऊ, सुरक्षित राहू’ हे ब्रीदवाक्य ठेवून स्वत:त बदल घडवून ‘न्यू नॉर्मल’साठी तयार होऊ या.

लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.

ईमेल : symghar@yahoo.com

Story img Loader