प्रा. मंजिरी घरत
औषधनिर्मितीपासून ते वैद्यकीय क्षेत्रापर्यंतची सारी क्षेत्रे निरोगीच असावीत, त्यांत अपप्रवृत्ती असू नयेत, यासाठी ग्राहकांना, रुग्णांना औषधांची योग्य माहिती देणे हा एक महत्त्वाचा भाग असतो.. जणू उपचारासारखाच! पण आपल्याकडे अशी माहिती देण्याची बंधने पुरेशी नसल्यामुळे ती ‘औपचारिकता’च उरली आहे..
‘‘कोणतं औषध घेतेयस तू?’’ भारतात सुट्टीवर आलेल्या आणि किरकोळ बरे नसलेल्या परदेशस्थ मैत्रिणीशी फोनवर बोलताना सहज विचारले मी. मला नुसते एखादे ‘ब्रँड’नाव अपेक्षित होते. पण तिने तर अगदी सविस्तर औषध पुराण ऐकवले. ‘‘सांगते.. पहिलं आहे आयबुप्रोफेन, ते नुसतं तापावर नाही तर स्नायूतल्या वेदना, सूज उतरवायलापण आहे, आणि क्लोरफेनिरामिन आहे ना, ते वाहणारं नाक, सर्दी, डोळ्यातून सारखं पाणी वाहणं, नाक चोंदणे वगैरे अॅलर्जीसाठी आहे’’.. काय काळजी घायची, कॉमन साइड इफेक्ट्स कोणते अशी पटापट माहिती सफाईदारपणे मैत्रीण देत गेली, मी चकित झाले. ना ती डॉक्टर होती; ना फार्मासिस्ट, ना नर्स. आणि तो काळ होता सन १९९८ च्या सुमारास. जेव्हा इंटरनेट, स्मार्ट फोन, ‘गूगल विद्यापीठ’ नव्हते. मग तिला ही इतकी सविस्तर माहिती कुठून मिळाली? न राहवून मी विचारले, ‘‘काय गं, इंग्लंडला जाऊन फार्मसी, मेडिकल असं काही शिकलीस की काय?’’ ती हसून म्हणली, ‘‘मी इंग्लंडहून आणलेलं जे औषध घेत आहे ना त्याच्या पॅकवरल्या लेबलावर साग्रसंगीत माहिती आहे’’. नंतरच्या भेटीत मी आवर्जून त्या गोळ्यांच्या स्ट्रिप्सचे पॅक बघितले आणि त्यावरील लेबलिंगच्या प्रेमातच पडले. भिंग न घेता, डोळे बारीक न करता सहज वाचता येऊ शकेल अशा फॉण्टमध्ये सुटसुटीत, ठसठशीत अशी ही सविस्तर ग्राहकोपयोगी माहिती होती. बॉक्सच्या आतमध्ये आणखी एक छोटे पण सोप्या भाषेतील औषध माहितीपत्रक होतेच. आपल्याकडच्या चकाकत्या स्ट्रिपवरील अतिबारीक अक्षरातील अगदीच जुजबी माहिती डोळे मोठ्ठे करून कसेबसे वाचण्याची सवय असलेल्या मला ते औषध लेबल अगदी सुखावून गेले.
औषधविषयक सविस्तर माहिती कुणाकुणाला असावी? आरोग्य व्यावसायिकांना आणि त्याचबरोबर ‘एन्ड यूजर’ म्हणजे ग्राहक / रुग्णांना! याविषयी विचार अमेरिकेत चालू झाला पार १९६०च्या दशकात. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने १९६८ मध्ये ग्राहकांना औषधसोबत औषधमाहितीपत्रक दिले जावे असा नियम केला. माहितीचा दर्जा (अचूकता, निष्पक्षपातीपणा), वाचन-योग्यता (रीडेबलिटी) यांचा अभ्यास चालू ठेवला. २००६ साली प्रशासनाने ग्राहक औषध माहिती नेमकी कशी असली पाहिजे, त्यात काय अंतर्भूत असावे याविषयी सुस्पष्ट नियमावली केली. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणाऱ्या ‘ओटीसी’ औषधांच्या पॅकवरील ‘ड्रग फॅक्ट्स’ असे नाव असलेली अमेरिकन औषध लेबल्स माहितीचा उत्कृष्ट नमुना आहेत. औषधाचे नाव, डोसेज, उपयोग, दुष्परिणाम, काय करावे/करू नये, ओव्हरडोस झाल्यास कुठे संपर्क करावा, औषधातील इतर घटक, साठवण कशी करावी अशी सविस्तर माहिती यावर असते. समजा गोळ्यांची स्ट्रिप छोटी असली तरीही आवश्यक माहिती सुटसुटीत मोठय़ा अक्षरात सामावण्याइतका मोठय़ा आकाराचा बॉक्स गोळ्यांसाठी करावा लागतो.
ऑस्ट्रेलियात १९९० च्या सुमारास औषधांची निर्मिती, शिफारस (प्रिस्क्रायबिंग), वापर यासाठी ग्राहक चळवळीने मोठा आवाज उठवला. परिणामी ‘क्वालिटी यूज ऑफ मेडिसिन्स’ असे धोरण तिथल्या सरकारने लागू केले. याअंतर्गत ग्राहकांसाठी योग्य माहिती, त्याविषयीचे नियम आले. यथावकाश ऑस्ट्रेलियातील फार्मसीच्या दुकानात मिळणारी आरोग्य आणि औषधविषयक आकर्षक फॅक्ट कार्ड्स, पत्रके जगप्रसिद्ध झाली. बहुतांश देशांत ग्राहकांना औषधविषयक माहिती देणे- ‘कन्झ्युमर मेडिसिन इन्फर्मेशन’- हे कंपन्यांवर बंधनकारक आहे. ही माहिती ‘ओटीसी’ औषधांच्या लेबलवर देणे, सर्व (ओटीसी आणि प्रिस्क्रिप्शन) औषधांसोबत माहितीपत्रक देणे, ते संकेतस्थळावर उपलब्ध करणे अशी धोरणे या देशांत आहेत. अनेक लेबल्सवर ब्रेल लिपीत (अंध व्यक्तींसाठी) सुद्धा माहिती दिली जाते. आणखी नावीन्यपूर्ण बाब म्हणजे काही औषधांची माहिती श्रवणीय स्वरूपात (ऑडिओ फॉर्मॅटमध्ये) उपलब्ध आहे.
काहीही करून औषध माहिती प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचावी जेणेकरून औषधांचा जबाबदारीने वापर होईल, औषधीय चुका टळतील हा यामागील उद्देश. ग्राहकांपासून औषधविषयक कोणतीही माहिती लपवायची नाही, त्यांना सजग ठेवायचे असा विचार परदेशात रुजला आहे.
आपल्याकडे काय परिस्थिती आहे? सहसा आपल्याकडे गोळ्यांच्या लूज स्ट्रिप्स येतात, त्यासोबत बॉक्स फारच कमी गोळ्यांना असतो. औषध माहितीपत्रक जरी असेल तरी ते सहसा रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर, हॉस्पिटल, पॅथॉलॉजी लॅब यांच्या माहितीसाठी सामान्य माणसाला अगम्य असलेल्या वैद्यकीय भाषेतील पत्रक असते. आय ड्रॉप्स, इन्हेलर्स यांसारख्या अगदी थोडय़ा उत्पादनांसोबत ग्राहकांसाठी पत्रक (पेशंट पॅकेज इन्सर्ट/पेशंट इन्फॉर्मेशन लीफलेट) असते. प्रिस्क्रिप्शन औषधांच्या लेबलवर त्यातील औषधाचा उपयोग, दुष्परिणाम वगैरे काही माहिती नसते ते नियमानुसारच. पण ओटीसी औषधांच्या लेबलवर मात्र सर्व माहिती असायला हवी. कारण ही औषधे रुग्ण स्वमनानेसुद्धा घेत असतात, त्यामुळे या औषधांच्या बाबतीत ते पूर्ण इन्फॉर्मड्- माहीतगार आणि सजग- असणे गरजेचे. पण मुळात आपल्याकडे ओटीसी औषधांचा वेगळा गट नाही, जी प्रिस्क्रिप्शन गटात मोडत नाहीत ती ओटीसी (नोन-प्रिस्क्रिप्शन). पॅरासिटामोल, अॅस्पिरिन, व्हिटॅमिन्स, रेचके, अँटासिड्स वगैरे या गटात मोडतात. गेल्या काही वर्षांत पॅरासिटामोलच्या लेबलवर ‘२४ तासांत एकूण पॅरासिटामोल ४ ग्रॅमपेक्षा जास्त घेतल्यास दुष्परिणाम’ किंवा अॅस्पिरिनच्या लेबलवर ‘गर्भारपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये देऊ नये’ अशा काही वॉर्निग लिहिणे बंधनकारक, ही थोडीशी का होईना पण प्रगती स्वागतार्हच, पण औषधांचे लेबल वाचणे हे मुळात अत्यंत जिकिरीचे आहे. त्यामुळे समजा ग्राहकांसाठी कितीही उपयुक्त सूचना लिहिल्या तरी जोपर्यंत वाचनेबल नाहीत (आणि इंग्लिशमध्येच असतात हा एक मुद्दाही आहेच) तोपर्यंत त्याचा फारसा उपयोग नाही.
काही वर्षांपूर्वीपर्यंत तरी – अशी औषध माहिती द्यायची तर मग औषधांची किंमत वाढेल का? आपल्या देशातील साक्षरता काय? अशा माहितीचा उपयोग नक्की किती? सर्व दुष्परिणाम वाचले तर रुग्ण औषध घेईल का? किंवा, रुग्णास अधिक माहिती दिली तर दुरुपयोग होईल का, माहिती वाचून रुग्ण स्वमनाने औषधे घेईल का? असे अनेक प्रश्न शंकाकुशंका चर्चिल्या जातात. आता इंटरनेटच्या जमान्यात, जिथे एका क्लिकवर खरी-खोटी माहिती उपलब्ध होते तिथे सेल्फ मेडिकेशन वाढेल, किंवा साइड इफेक्ट्स जाणल्याने उपचार सोडले जातील, या भीतीला फारसा आधार नाही. शिवाय काही प्रमाणात लोक स्वमनाने औषधे घेत असतातच, देशातील ७ लाख औषध दुकानांत अनेक ठिकाणी कायद्यानुसार अत्यावश्यक नोंदणीकृत फार्मासिस्ट नसतो, अनेक प्रिस्क्रिप्शन औषधे ‘जो जे वांछील तो ते लाहो’ अशी सहज मिळत असतात. आता तर ऑनलाइन औषधखरेदीचा मार्गही मोकळाच आहे.
या औषध साक्षरता क्षेत्रात काम चालू केले तेव्हा २००५ साली प्रायोगिक प्रकल्प राबवला; त्यात पाच नेहमी वापरल्या जाणाऱ्या प्रिस्क्रिप्शन औषधांविषयी सहज सोपी माहितीपत्रके इंग्लिश आणि मराठीमध्ये बनवली, प्रकल्पात सामील होण्यास इच्छुक असणाऱ्या फार्मासिस्ट्सना प्रशिक्षण देऊन त्यांच्यातर्फे ही माहितीपत्रके त्या त्या औषधासोबत रुग्णांना दिली. रुग्णांचा प्रतिसाद प्रचंड होता आणि अशी माहिती मिळाली पाहिजे, आवश्यक आहे असा प्रकल्पाचा निष्कर्ष होता.
आज आपल्याकडे देशात वापरल्या जाणाऱ्या सर्व मूळ औषधांची संपूर्ण अद्ययावत सूची, प्रत्येक औषधाची संपूर्ण माहिती ही एका ठिकाणी (संकेतस्थळावरही) मिळणे कठीण. ग्राहकांसाठी सोडाच पण आरोग्य व्यावसायिकांसाठीसुद्धा, इतर देशांत असते तसे अत्यंत नि:पक्षपाती, अचूक, दर्जेदार माहितीचा स्रोत असे एक अधिकृत स्टँडर्ड पुस्तक उदा. – ब्रिटिश नॅशनल फॉम्र्युलरी, ऑस्ट्रेलियन मेडिसिन हँडबुक, अमेरिकन ऑरेंज बुक, फिजिशियन डेस्क रेफरन्स अशी पुस्तके आणि दरवर्षी ती अपडेट होणे वगैरे प्रकार आपल्याकडे नाही. नॅशनल फॉम्र्युलरी ऑफ इंडिया आहे; पण ती पुस्तके कैक वर्षांनी येतात, त्यांतही सर्वच औषधे समाविष्ट असतात असे नाही.
हे सगळे नक्कीच पालटले पाहिजे. आणि त्यासाठी ग्राहकांनी अधिक जागरूक होऊन मागण्या करत राहणेही जरुरीचे आहे. मंडळी, काय वाटते आपल्याला? आपले विचार जरूर कळवा.
लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.
ईमेल : ymghar@yahoo.com