प्रा. मंजिरी घरत

फार्मासिस्ट हा आरोग्याशी संबंधित प्रत्येक बाबतीतला महत्त्वाचा शिलेदार असूनही ‘करोना’साथीच्या कठीण काळात त्यांचा विचार होत नाही, म्हणून ते ‘अनामवीर’. वास्तविक, कोणताही आरोग्य-कार्यक्रम वा आरोग्यविषयक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देशातील सात लाख औषध दुकाने ही महत्त्वाची केंद्रे आहेत..

एक जर्मन दंतकथा आहे. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा देव सर्व फुलझाडांचे नामकरण करत होता, कुणाचे रोझ ,कुणाचे जस्मिन वगैरे. एक छोटेसे निळ्या फुलांचे झाड वाट पाहत होते त्याला देव काय नाव देतो याची. पण त्याच्या कडे लक्षच नाही गेले देवाचे. मग ते फुलझाड व्याकुळ होऊन ओरडले, प्लीज मला नका ना विसरू (फरगेट मी नॉट) , तेव्हा देवाचे लक्ष गेले, देव हसून म्हणाला, आता तुझे हेच नाव : ‘फरगेट मी नॉट’. तेव्हापासून या फुलांना तेच नाव पडले आणि पुढे ही फुले म्हणजे अखंड प्रेमाचे,कधीच अंतर न देणाऱ्या नात्याचे प्रतीक मानली जाऊ लागली.

ही कथा आठवण्याचे कारण म्हणजे सध्या निर्माण झालेली फार्मसी व्यवसायातील हिरमुसली भावना. ‘कोविड-१९’मुळे  तर मुळात भरपूर अस्वस्थता आणि कामाचा ताण आहेच, पण आणखी काही कारणे घडली. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अनेक वेगवेगळ्या व्यावसायिकांचा राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर अधिकारी व्यक्तींनी नामोल्लेख केला, त्यांच्या कामावरील निष्ठेचे कौतुक झाले, हे अगदी स्तुत्यच. मनोबल वाढवण्यास आवश्यकही. पण यात कुठेच फार्मासिस्टचा उल्लेख झाला नाही (हा लेख लिहीपर्यंत तरी).. बहुधा चुकून राहिला असावा. दुकान बंद न ठेवता दिवसरात्र औषधे पुरवणाऱ्या, शासकीय  रुग्णालयात औषधे आणि इतर आपत्कालीन सेवा देत राबणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील ‘फार्मासिस्ट’ या महत्त्वाच्या घटकाला विसरले गेले की काय असा सूर उमटला. काहीजण असेही म्हणताना दिसले : हरकत नाही, आम्ही समाजासाठी कर्तव्ये करतच राहू. नाही म्हणायला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ट्विटरवर फार्मासिस्ट्सच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले! एवढेसुद्धा कामास हुरूप येण्यासाठी पुरते.

फार्मसीचे शिक्षण डी. फार्म, बी. फार्म किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला व्यावसायिक म्हणजे फार्मासिस्ट. अनेकविध क्षेत्रांत- औषधनिर्मिती, संशोधन, उत्पादन, वितरण, मार्केटिंग, औषध दुकाने, रुग्णालये अशी करिअरची दालने फार्मसी उमेदवारास काम करण्यास खुली. सर्वसामान्यांना भेटणारा फार्मसी व्यावसायिक म्हणजे औषध दुकानांत किंवा रुग्णालयांतील फार्मासिस्ट. करोनाच्या युध्दात हे सर्वच फार्मासिस्ट आणि त्यांचे सहायक धोका पत्करून अहोरात्र कौतुकास्पदरीत्या लढा देत आहेत. आणीबाणीच्या स्थितीमुळे त्यांनाही पुष्कळ अडचणींना तोंड देत काम करावे लागते आहे. अनेक ठिकाणी स्टाफ कमी आहे, वेगवेगळे रुग्ण, ग्राहक दुकानात येणार, इन्फेकशनचा धोका असल्याने नेहमीच्या कामाच्या पद्धतीत बदल करून छोटय़ाशा दुकानात सोशल डिस्टन्सिंग साठी व्यवस्था करत, मास्क/ग्लोव्हज्/ अ‍ॅप्रन, प्रिस्क्रिप्शनसाठी ट्रे, सॅनिटायझरचा वापर अशी काळजी घेत औषध दुकाने त्यांनी चालू ठेवली आहेत. औषधांचा अनियमित पुरवठा, तुटवडा होऊ नये यासाठी करावी लागणारी धावाधाव, सॅनिटायझर/मास्कचा तुटवडा, लोकांनी केलेली गर्दी, आवश्यक तिथे रुग्णांना माहिती देणे, रुग्णाला कमीतकमी वेळात सेवा देणे, अशा व्यवधानांतून मार्ग काढत फार्मासिस्ट दैनंदिन काम मार्गी लावतो आहे. ‘होम डिलिव्हरी’च्या सूचना निघाल्यावर जमेल तसे तेही पार पाडत आहे.

फार्मासिस्ट हा समाजासाठी ‘फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट’ असतो. किरकोळ शारीरिक तक्रारीं साठी आपण सर्वचजण एरवीही फार्मसीकडे धाव घेतो, सध्या तर अनेक खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले आहेत पण ऑनलाइन वैद्यकीय सल्ला मसलत (टेलिमेडिसिन) झाल्यावर प्रत्यक्ष मेडिसिनसाठी, रुग्णाला सामोरे जाऊन औषधे देण्याची जबाबदारी फार्मासिस्ट व्यवस्थित पार पडत आहे. मधुमेह, हृदयविकार असे जुनाट आजार असलेले रुग्ण औषधे संपल्यावर डॉक्टरांना फोन करून ‘पूर्वीचीच औषधे चालू ठेवा’ असा सल्ला मिळाल्यावर केमिस्टकडून औषधे घेतात, त्यांचे उपचारही सुरळीत चालू रहात आहेत. ‘कठीण समय येता, फार्मासिस्ट कामास येतो’ असे अनेक रुग्णांना वाटले तर त्यात नवल नाही!

‘कोविड-१९’ रुग्णांच्या थेट संपर्कात येणाऱ्या ‘हाय रिस्क’ आरोग्य व्यावसायिकांसाठी शासनाने विमा जाहीर केला आहे जे निश्चितच जरुरीचे, स्वागतार्ह आहे. तशीच काही योजना फार्मासिस्ट आणि इतर जे व्यावसायिक धोका पत्करून समाजाला सेवा देत आहेत त्यांच्यासाठीही आखण्याचा विचार व्हावयास हवा. आज जगभरातील फार्मासिस्ट करोना युद्धात ‘फ्रंट लाइन वॉरियर्स’ (आघाडीचे सैनिक) म्हणून लढत आहेत. स्पेनमध्ये या रोगाने हाहाकार माजवला आहे. आपण शासनाच्या सूचनांनुसार कोविड-१९ फैलावण्याच्या आधीच जी काळजी घेणे चालू केले (आणि ती काळजी सर्व फार्मासिस्ट्सनी चालू ठेवणे गरजेचे आहे) ते स्पेनसारख्या देशांत खूप उशीरा सुरू झाले. परिणामी काही फार्मासिस्ट आणि स्टाफला कोविड-१९ संसर्ग झाला. पण फार्मासिस्ट मागे हटले नाहीत, आणि आता सर्व काळजी घेत त्यांची समर्पित सेवा चालू आहे. दोन दिवसांपूर्वी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी स्वत:ला संसर्ग झालेला असतानाही मुलाखत देऊन सर्व शासकीय आणि खासगी क्षेत्रातील कोविड लढवय्यांचे आभार मानले, त्यात आवर्जून फार्मासिस्टचा उल्लेख करून कौतुक केले.

करोना सारख्या संकटामुळे फार्मासिस्टच्या आरोग्यव्यवस्थेतील स्थानाचे महत्त्व नव्याने जाणवत आहे. फार्मासिस्ट हा औषधविक्री खेरीज अनेकविध रुग्णाभिमुख सेवा देण्यास सक्षम आहे, जे आज आपल्याकडे होत नाहीये. हे केवळ फार्मसी व्यवसायाचे नाही तर समाजाचे मोठे नुकसान आहे. फार्मसी शिक्षण, औषध कायदे अंमलबजावणी, धोरणे, नेतृत्व अशा अनेक आघाडय़ांवर आपण कमी पडल्याचा हा परिपाक आहे; यात सर्वागीण दुरुस्ती होणे निकडीचे आहे. याबाबतची चर्चा आज सयुक्तिक नाही. पण फार्मासिस्टची भूमिका विस्तारून समाजास त्याचा अधिक फायदा होणे यासाठी गांभीर्याने विचार होणे जरुरीचे आहे. आरोग्य साक्षरता अजिबात न रुजलेल्या आपल्या  समाजासाठी फार्मासिस्टची विस्तारित भूमिका आत्यंतिक महत्त्वाची ठरेल.

प्रगत देशांतील शासनापासून ते नागरिकांपर्यंत साऱ्यांसाठी फार्मसिस्ट हा केवळ एक दुकानदार नव्हे, तर एक औषधतज्ज्ञ, रुग्णासमुपदेशक असतो. डॉक्टर्स, नस्रेस, फार्मासिस्ट्स असे मिळून एकमेकांना पूरक काम चालू असते. इंग्लंडसारखा देश ‘राष्ट्रीय आरोग्य योजने’ (एनएचएस) च्या डॉक्टरांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी फार्मासिस्टना अधिकाधिक जबाबदाऱ्या देत आहे. इंग्लंडचे शासन इतके महत्त्व फार्मसिस्टना देते, हे केवळ एक उदाहरण. पण बहुतांश विकसित देशांत असेच चित्र आहे. आपणही आपला फार्मसी व्यवसाय या स्तरापर्यंत का नाही उंचावू शकणार?

आरोग्यक्षेत्रात मनुष्य बळाची कमतरता म्हणून आपल्याकडे  शासन उपाययोजनांचा विचार करतीये. फार्मासिस्ट हे मनुष्यबळ उपलब्ध आहे याकडे शासनाने लक्ष देण्याची वेळ आली आहे. फार्मासिस्ट सामाजिक आरोग्यासाठी   किती चांगले काम समाजासाठी करू शकतात, इच्छुक आहेत (याचा अनुभव क्षयरोग रुग्णांसाठी डॉट्स कार्यक्रम आणि इतर काही उपक्रम फार्मसीच्या दुकानांतून राबवताना प्रस्तुत लेखिकेला आहे). जर देशाच्या कानाकोपऱ्यात काही आरोग्य कार्यक्रम किंवा काही आरोग्यविषयक  माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर देशात सात लाख औषधदुकाने आहेत. करोना आपल्याला खूप काही शिकवतो आहे, फार्मासिस्टचे आरोग्यव्यवस्थेतील स्थान नव्याने अधोरेखित होत आहे.  हीच ती वेळ आहे फार्मसी व्यवसायाला नवीन दिशा देण्याची, सुधारणा करण्याची.

आणखी दोन विनंत्या..

हैड्रोक्सिक्लोरोक्वीन म्हणजे काही ‘ट्रम्प कार्ड’ नाही!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हैड्रोक्सिक्लोरोक्वीन हे ‘कोविड-१९’ साठी ‘गेम चेंजर’ आहे असे म्हणताच, साहजिकच हे औषध मिळावे यासाठी अनेकजण प्रयत्नशील झाले. पण नेमकी वस्तुस्थिती समजून घेऊ :   हैड्रोक्सिक्लोरोक्वीन हे औषध फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननेच घ्यावयाचे औषध आहे. हे औषध नवे नाही. अनेक वर्षांपासून ते मलेरिया, संधिवात, ऑटो-इम्यून प्रकारातील काही आजार यांसाठी मान्यताप्राप्त आहे आणि वापरले जाते. करोना संकटात सामना करताना अलीकडे हे औषध डॉक्टर, नस्रेस, आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले निकटवर्ती यांच्यासाठी वापरण्याची मान्यता मिळालेली आहे. पण सरसकट सर्व रुग्णांसाठी उपचार  किंवा प्रतिबंधात्मक म्हणून  घावे यासाठी नाही. त्यासाठी आणखी बरेच संशोधन होण्याची गरज आहे. या औषधाला बरेच दुष्परिणामही आहेत, त्यामुळे कोणत्याही ग्राहकांनी फार्मसी मध्ये जाऊन या औषधाची मागणी स्वमनाने करू नये. स्वमनाने अझिथ्रोमायसिन किंवा कोणतीही अँटिबायोटिक्सही घेऊ नये व त्यासाठी या आणीबाणीच्या काळात फार्मासिस्टकडे जाऊन त्यासाठी आग्रह धरू नये.

१) फार्मसीत जाताना स्वत:च्या आणि फार्मसी टीमच्या सुरक्षेसाठी, सोशल डिस्टन्सिंगच्या सूचना पाळाव्यात, मास्क लावून जावे.

२) औषधांचा एक महिन्याच्या पेक्षा अधिक साठा मागू नये, फार्मसी चालू राहणार आहेत आणि औषधे मिळत राहतील.

लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.

ईमेल : symghar@yahoo.com

Story img Loader