प्रा. मंजिरी घरत
आरोग्य क्षेत्रातील आधीच माहीत असलेले अनेक कच्चे दुवे कोविडमुळे अधिक प्रकर्षांने समोर येत आहेत. सक्षम, सशक्त आरोग्य व्यवस्थेसाठी आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही विषयांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे..
ऑगस्ट महिना. अमेरिकेतील एका विद्यापीठाच्या फार्मसी कॉलेजमध्ये एक कार्यक्रम सुरू होता. फार्मसी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि सोबत त्यांचे पालक उपस्थित होते. नाही, ही ‘फ्रेशर्स पार्टी’ नव्हती. अधिष्ठाता (डीन) स्वागत करून फार्मसी अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, फार्मासिस्ट म्हणजे कोण, आरोग्य क्षेत्रात फार्मासिस्टची भूमिका काय, हे विशद करतात. तर, ‘फार्मसी क्षेत्राचा आत्मा रुग्ण आहे, औषधे नव्हे,’ हे प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाचे सूत्र. संशोधन असो, औषध उत्पादन असो वा औषध दुकान किंवा हॉस्पिटल फार्मसी असो; या प्रत्येक व्यवसायाचा अंतिम उद्देश रुग्ण बरा करणे हाच असतो हे उदाहरणे देऊन ते स्पष्ट करतात. कार्यक्रमात पुढे काही माजी विद्यार्थी अनुभवकथन करतात. यानंतर एकेक विद्यार्थ्यांला स्टेजवर बोलावून सन्मानपूर्वक पांढरा कोट भेट दिला जातो. चढवला जातो. विद्यार्थी भारावून जातात. आपण जे क्षेत्र करिअरसाठी निवडले ते किती जबाबदारीचे आहे याची जाणीव तर होतेच, पण आपण जे शिकू, पुढे जो काही नोकरी-व्यवसाय करू, त्याचा अंतिम उद्देश समाजाभिमुख असायला हवा, आपण रुग्णांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो, ही मोठी संधी आहे याची सुखद जाणीव त्यांना होते, अभिमान वाटतो निवडलेल्या करिअरचा. पांढरा कोट म्हणजे त्यांच्या नवीन आयुष्याची नांदी असते.
अशा या दिशादर्शक आणि स्फूर्तिदायक आगळ्यावेगळ्या समारंभाला म्हणतात ‘व्हाइट कोट सेरेमनी’. अमेरिकेतील बहुतेक सर्व युनिव्हर्सिटींमध्ये आणि इतर काही पाश्चिमात्य देशांत तर तो प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाला आहेच; पण फिलिपाइन्ससारख्या देशानेही ही प्रथा अलीकडे चालू केली आहे. तशी ही ‘व्हाइट कोट सेरेमनी’ची संकल्पना तुलनेने नवीनच. १९९३ मध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीतील कॉलेज ऑफ फिजिशिअन्स अॅण्ड सर्जन्समध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी प्रथम याची सुरुवात झाली. पांढरा कोट हे आरोग्यसेवेत उत्तम व्यावसायिकतेचे (प्रोफेशनॅलिझम)चे, विश्वास आणि निपुणतेचे प्रतीक. म्हणून विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच फक्त वर्गात, परीक्षेत उत्तम कामगिरी पुरेशी नाही हे उमगावे, आपल्याकडून असलेल्या अपेक्षा आणि जबाबदारीची जाणीव व्हावी, समाजात रुग्णसेवेसाठी उत्कृष्ट कामगिरी केली पाहिजे ही दृष्टी मिळावी, त्यांची मानसिकता तयार व्हावी या हेतूने या समारंभाची सुरुवात झाली. बघता बघता मेडिकलसह फार्मसी कॉलेजांमध्ये तो एक महत्त्वाचा भाग बनला.
असे बाळकडू मिळालेले विद्यार्थी अद्ययावत् (अपडेटेड) अभ्यासक्रम, पारंपरिक पद्धत (फळा-खडू, प्रोजेक्टर वापरून शिकवणे) आणि ‘अॅक्टिव्ह लर्निग’ पद्धतीने, (म्हणजे विद्यार्थ्यांला शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सामील करून घेणे) शिकत असतात. उदा. ‘रोल प्ले’ म्हणजे विद्यार्थ्यांने रुग्ण आणि फार्मासिस्टची भूमिका आलटूनपालटून घेत रुग्ण समुपदेशन, प्रिस्क्रिप्शननुसार औषध देणे वगैरे शिकण्यासाठीची परिणामकारक आणि इंटरेस्टिंग ‘नाटकी’ पद्धत. तसेच अनुभवशिक्षण (एक्स्पिरिएन्शिअल लर्निग)वर भर असतो; तोही कोर्सच्या पहिल्या/ दुसऱ्या वर्षांपासूनच. जितके महत्त्व कॉलेजच्या प्राध्यापकांचे तितकेच महत्त्व ‘प्रिसेप्टर’ म्हणजे प्रॅक्टिकल ट्रेनिंग देणाऱ्या हॉस्पिटल/ दुकानातील फार्मासिस्ट प्रशिक्षकाचे असते. वास्तवातील परिस्थितीचे, आव्हानांचे आकलन व्हायला हे अनुभवशिक्षण मदत करते. आपण घेतलेल्या ज्ञानाचा पुढे थेट उपयोग करायचा आहे ही जबाबदारी समजल्याने विद्यार्थीही नुसते पाठांतर करून परीक्षेपुरते शिकत नाहीत आणि तिथली परीक्षा पद्धतीही अर्थात वेगळी आहे. या मुशीतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची रुग्णाभिमुख मनोभूमिका पक्की झालेली असते. बहुतांश देशांतील फार्मसी प्रॅक्टिसचा दर्जा उंचावलेला आहे याचे एक प्रमुख कारण उत्कृष्ट शिक्षण हे आहे. परदेशातील फार्मासिस्ट हा औषधविक्री करणारा दुकानदार न राहता रक्तदाब तपासणे, औषध समुपदेशन, व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन अशी अनेकविध सेवा देतो. रुग्णमित्र, उत्तम मार्गदर्शक असतो. सामाजिक आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. आरोग्य व्यवस्थेवरील भारही हलका करतो. कोविडच्या साथीत अमेरिका आणि काही देशांत कोविड चाचणी करण्यासाठी निवडक फार्मसी दुकानांना परवानगी मिळाली. पुढे येणारे कोविडचे व्हॅक्सिनसुद्धा फार्मासिस्ट देऊ शकतील. फ्लूची लस अनेक देशांतील फार्मासिस्ट देत आहेतच. अर्थात परिपूर्ण शिक्षणासोबत योग्य धोरणे, कायदे असणे हेदेखील महत्त्वाचे आहे.
आरोग्याच्या निर्माण होणाऱ्या नवनवीन गरजांचा परदेशात सातत्याने आढावा घेतला जातो. त्यानुसार अभ्यासक्रमात नवीन विषयांच्या, नवीन कौशल्यांचा समावेश करण्यात येतो. कालबाह्य़ अभ्यासक्रमाला तिथे स्थान नाही. फार्मासिस्टची संख्या, भविष्यातील गरज याचे विश्लेषण करून नवीन फार्मसी कॉलेजेसना परवानगी दिली दिली जाते. कॉलेजेसचे मशरुमिंग तिथे दिसत नाही. एकंदर शिक्षणाला धोरण आहे, दिशा आहे. तयार होणाऱ्या व्यावसायिकाची उद्दिष्टे आणि निष्पत्ती (ऑब्जेक्टिव्ह्ज आणि आउटकम्स) हे ठरलेले आहे. परदेशातील शिक्षणात त्रुटी नाहीत असे नाही; पण हे शिक्षण निश्चितच भावी भूमिकेसाठी फार्मासिस्ट घडवते, केवळ परीक्षार्थी नव्हे. अमेरिकन फार्मासिस्ट असोसिएशनच्या वॉशिंग्टन डीसी येथील देखण्या वास्तूमध्ये फार्मासिस्ट आणि रुग्ण याविषयी एक सुंदर कलाकृती आहे, त्यावर फार्मासिस्टची नेमकी कार्यकक्षा काय याविषयी लिहिलेय- ‘फ्रॉम मेकिंग ऑफ मेडिसिन्स टु मेकिंग मेडिसिन्स वर्क’ म्हणजे औषधे निर्मितीपासून ते औषधांचा रुग्णांमध्ये अपेक्षित परिणाम येथपर्यंतची जबाबदारी, इतका मोठा आवाका या व्यावसायिकाच्या कामाचा आहे.
काही जणांच्या मनात प्रश्न आला असेल शिक्षणाबद्दल चर्चा ‘आरोग्यनामा’त का बरे? पण समाजाला उत्तम प्रतीची आरोग्यसेवा हवी असेल तर आरोग्य व्यावसायिकांना कालानुरूप दर्जेदार ‘प्रॅक्टिस ओरिएंटेड’ शिक्षण असणे ही मूलभूत गरज आहे. आरोग्य क्षेत्रातील आधीच माहीत असलेले अनेक कच्चे दुवे कोविडमुळे अधिक प्रकर्षांने समोर येत आहेत. सक्षम, सशक्त आरोग्य व्यवस्थेसाठी आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही विषयांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. केवळ फार्मसीच नाही तर मेडिकल, नर्सिग या सर्वच आरोग्य शाखांत शिक्षण सुधारणेला भरपूर वाव आहे.
समाजोपयोगी शिक्षण
आपल्याकडील फार्मसी शिक्षणात उणिवा आहेत, सध्याचे शिक्षण ना विद्यार्थ्यांना फार्मा इंडस्ट्रीसाठी सक्षम बनवते ना फार्मसी प्रॅक्टिससाठी, रुग्ण हा शिक्षणाचा केंद्रबिंदू नसतो.. हे वास्तव आहेच; पण त्यातूनही शिकवताना नवनवीन शैक्षणिक पद्धतींचा प्रयोग केला, विद्यार्थ्यांमध्ये इंटरेस्ट निर्माण करून, योग्य दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला, तर शिक्षण ‘नोट्स आणि परीक्षा’ यामध्ये बंदिस्त न होता, थोडे तरी समाजाभिमुख होतेच याचे अनेक अनुभव येतात.
एके दिवशी फोन आला, ‘मॅम, ओळखले मला? मी रोल नंबर ५५, तीन वर्षांपूर्वी आपल्या कॉलेजात होतो.’ उत्साहाने भरलेला आवाज फोनवर समजत होता. ‘तर मॅम मी लोकलमधून जात होतो, मी बसलो होतो, समोरच्या माणसाला अचानक चक्कर आल्यासारखे झाले. मीही एकदम गडबडलोच. पण मला आपल्या लेक्चरमध्ये शिकवलेले ना प्रथमोपचाराबद्दल, त्यातले सर्व आठवायला लागले. अगदी शब्दन्शब्द डोक्यात घुमू लागला. तुम्ही म्हणायचात- तुम्ही फार्मासिस्ट होणार, जे शिकतो त्याचा उपयोग आपण समाजासाठी केलाच पाहिजे. मी ताडकन उठलो. त्या माणसाभोवती सारे बघे लोक जमा झालेले, त्यांना बाजूला सारले. त्याला मोकळी हवा येऊ दिली. त्याचा शर्ट सैल केला, दातखीळ नाही ना बघितले..’ आणि आपण कसे तत्परतेने प्रथमोपचार देऊन रुग्णाचा जीव वाचवला हे तो सांगत गेला. त्याला झालेला आनंद आणि समाधान मोठे होते.
मुंबईतील गजबजल्या फार्मसी दुकानात काम करणारा विद्यार्थी अनुभव सांगत होता- ‘आज काय झाले, मी दुकानात होतो- एक महिला रुग्ण आली. ती गरोदर असावी असा बघून अंदाज आला. तिने एक औषध मागितले. दुकानातील दुसऱ्या मुलानं ते लगेच दिलं. माझं लक्ष होतं. ते औषध खरं तर प्रेग्नन्सीत घेणं योग्य नाही. होणाऱ्या बाळावर दुष्परिणाम होऊ शकतात, हे मी वर्गात शिकलो होतो. आपण ‘केस स्टडीज’सुद्धा केले होते.. मी त्याला म्हटलं, थांब. त्या महिलेशी मी जाऊन बोललो. ती प्रेग्नंट होती आणि औषध तिला स्वत:साठी पाहिजे होतं. मी तिला हे औषध का घेऊ नको ते नीट सांगितलं आणि दुसरे गरोदरपणी सुरक्षित असं औषध दिलं, तिनं माझे खूप आभार मानले.’
लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.
ईमेल : symghar@yahoo.com