प्रा. मंजिरी घरत
आरोग्य क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रोगनिदान, उपचार, आरोग्यमाहिती संकलन यासाठीच्या सध्याच्या पद्धतीत, तंत्रात बदल होऊ लागले आहेत. त्या बदलांचा वेध घेणारा या सदरातील हा समापनलेख..
* स्मार्टफोन आणि दंडावर बसवलेल्या छोटय़ा संवेदकाने (सेन्सर) त्याचा रक्तदाब, हृदयाचे ठोके मोजले, ईसीजीही काढला गेला. ना तारांचे भेंडोळे, ना कुठे रुग्णालयात जाणे. सर्व माहिती डॉक्टरांना त्यांच्या मोबाइल/ संगणकावरही पोहोचली. थोडय़ा वेळात डॉक्टरांकडून फोन आला, त्यांनी त्याला औषध बदलून दिले. ई-प्रीस्क्रिप्शन पाठवले.. आणि त्याला निर्माण झालेला धोका टळला.
* तिला मानसिक तणाव, झोप न येणे असे त्रास चालू झाले होते. बरीच औषधे सुरू होती. तिला डॉक्टरांनी एक अनोखा उपाय सुचवला, त्याचाच वापर तिने सुरू केला होता. काय होता हा उपाय? तर.. एक विशिष्ट हेअरबॅण्ड ती डोक्यावर चढवायची आणि थोडय़ा वेळात तिच्या मेंदूतील खळबळ शांत होऊन तिला छानशी झोप येऊ लागायची.
* अमली औषधांच्या विळख्यात अडकलेल्या मुलाला त्यातून बाहेर काढण्यासाठी त्याचे अथक प्रयत्न सुरू होते. बरीच औषधे, समुपदेशन झाले. अगदी नुकत्याच मान्यता मिळालेल्या एका नवीन प्रकारच्या औषधाची, खरे तर संगणकीय प्रोग्रामची माहिती त्याने वाचली होती. त्याबद्दल डॉक्टरांशीही चर्चा केली. डॉक्टरांनी त्याला त्यासाठी प्रीस्क्रिप्शन दिले. मग सॉफ्टवेअर कंपनीला फोन करून त्याने त्या औषधाचे शुल्क, कसे डाऊनलोड करायचे वगैरे चौकशी केली. यथावकाश त्याच्या मुलाच्या संगणकात ते औषध आले. गोळ्या-कॅप्सूल्सबरोबर या नवीन औषधाचा प्रयोगही सुरू झाला.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञानासह (तिसरी औद्योगिक क्रांती) नॅनो-टेक्नोलॉजी, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), वस्तुजाल (इंटरनेट ऑफ थिंग्स), मशीन लर्निग, बिग डेटा अशा नव्याने विकसित झालेल्या अनोख्या शाखा एकत्र करत- ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने ज्यास चौथी औद्योगिक क्रांती संबोधले, अशी- ‘डिजिटल क्रांती’ सर्वच क्षेत्रांत वेगाने बदल घडवत आहे. आरोग्य क्षेत्रात तर ‘डिजिटल हेल्थ’मुळे फार वेगाने भौतिक, जीवशास्त्रीय आणि डिजिटल यांतील सीमारेषा धूसर होत रोगनिदान, उपचार, आरोग्यमाहिती संकलन यासाठीच्या सध्याच्या पद्धतीत, तंत्रात फार मोठे बदल होऊ लागले आहेत. यातील काही तर आपल्या कल्पनेपल्याडचे म्हणावेत असे आहेत.
‘डिजिटल हेल्थ’ प्रकारातील ‘मोबाइल हेल्थ’ तसे आपल्या माहितीतले. यात स्मार्टफोनमध्ये असलेल्या वेगवगळ्या उपयोजन स्थळांद्वारे (अॅप्स) दिवसभरात किती चाललो ते मोजणे (फिटनेस ट्रॅकर्स), कॅलरीज्-हार्ट रेट मोजणे, औषधासाठी स्मरणसूचना देणे (रिमाइण्डर्स) वगैरे शक्य होते. जगात अक्षरश: लाखोंनी हेल्थ अॅप्स आहेत (टीप : सर्व अॅप्स मुळीच अचूक नसतात; तरीही वापरायचेच असतील, तर कोणते अॅप्स वापरायचे हे या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीस विचारावे). ‘टेलिमेडिसिन’ हे क्षेत्र आता भारतातही कोविडच्या साथीपासून व्यापकपणे सुरू झाले. डॉक्टरांशी ऑनलाइन भेट, त्यांनी दूरस्थपणे रुग्णाचे रोगनिदान करणे म्हणजे टेलिमेडिसिन. या प्रकारच्या आरोग्य सेवेला काही मर्यादा असल्या, तरी प्रगत वैद्यकीय सेवा न पोहोचलेल्या दुर्गम भागातील रुग्णांसाठी किंवा वयस्क रुग्णांसाठी टेलिमेडिसिन सोयीचे ठरत आहे. त्यामुळे टेलिमेडिसिनचा दिवसेंदिवस अधिकाधिक प्रसार होणार हे नक्की.
‘हेल्थ वेअरेबल्स’ ही अलीकडे खूप झपाटय़ाने विकसित होत असलेली शाखा. हे ‘वेअरेबल्स’ म्हणजे परिधान करण्याजोगी सुटसुटीत, तारा नसलेली (वायरलेस) वस्तू. उदाहरणार्थ, हातातील कडे, हेअरबॅण्ड, तसेच शरीरावर लावायचे छोटे संवेदक (सेन्सर्स). शरीरातील घडामोडींची- जसे की रक्तदाब, रक्तशर्करा, हृदयाचे ठोके वगैरेंची माहिती जमा करणे, काही गंभीर बदल होत असल्यास इशारा देणे, त्वरित कार्यवाही करणे, डॉक्टर/ नातेवाईकांना संदेश पाठवणे अशी कामे या वस्तू करतात. विस्मरणाचा आजार असलेले लोक घराबाहेर जाताना त्यांचा माग ठेवण्यासाठी हातात घालायचे डिजिटल-कडे आता सर्रास वापरले जाते. हृदयविकाराचा धक्का येण्याची शक्यता असल्यास शरीरातील काही रसायनांचे प्रमाण वाढते; तसे झाल्यास इशारा देणारे जैवसंवेदकही आहेत. मनोविकारांवरील उपचारांसाठी नवनवीन- सुरुवातीच्या दुसऱ्या उदाहरणातील हेअरबॅण्डसारखे – अनेक ‘वेअरेबल्स’ परदेशात वापरले जाताहेत (टीप : वैद्यकीय सल्ल्यांविना इंटरनेटवरून अशा वस्तू मागवून स्वत:वर प्रयोग करू नये).
नुकतेच अमेरिकेत ‘डिजिटल थेरप्युटिक्स’अंतर्गत लहान मुलांमधील अतिचंचलता (एडीएचडी) या आजारासाठी आणि व्यसनमुक्तीसाठी सॉफ्टवेअर प्रोग्रामरूपी औषधास तिथल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मान्यता दिली आणि औषध क्षेत्रातील एक नवीन युग सुरू झाले. टॅब्लेट, गोळी, सीरप, इंजेक्शन्स या औषध प्रकारांच्या पुढे जात चक्क डिजिटल औषध आले, आणि फ७ ची (म्हणजे औषधांसाठी प्रीस्क्रिप्शन देताना लिहिण्याच्या संज्ञेची) जागा ऊळ७ अर्थात ‘डिजिटल थेरप्युटिक्स’ने घेतली. रुग्णांनी औषध घेतले की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी अलीकडे ‘स्मार्ट पिल्स’ ही नवीन संकल्पना आली आहे. यात औषधगोळीमध्ये सूक्ष्म मायक्रोचिप असते; गोळी रुग्णाच्या जठरात गेल्यावर पाचकरसाने मायक्रोचिप विरघळते, त्यातून एक सिग्नल त्याच्या शरीरावर लावलेल्या संवेदकामार्फत डॉक्टरांच्या संगणक वा मोबाइलवर पोहोचतो आणि गोळी घेतल्याची नोंद होते. ही मायक्रोचिप शरीरात काही दुष्परिणाम करत नाही. स्किझोफ्रेनिया या मनोविकारावरील एका ‘स्मार्ट पिल’ला अमेरिकेत मान्यता मिळाली आहे. अशा अचंबित करणाऱ्या नवनव्या ‘हायटेक’ औषधप्रकारांचे भवितव्य काय असेल, हे येणारा काळच सांगेल.
‘थ्रीडी प्रिंटिंग’ हा डिजिटल तंत्रज्ञानातील आणखी एक भन्नाट प्रकार. वैद्यकीय क्षेत्रात ‘बायो थ्रीडी प्रिंटिंग’ने क्रांती होऊ शकते. या तंत्रात नवीन अवयव, विशिष्ट पेशी समूह ‘छापता’ म्हणजे प्रयोगशाळेत तयार करता येतात. असे ‘प्रिंट’ केलेले अवयव रोपणासाठी वापरात येतील आणि ते एक वरदान ठरेल. जो अवयव तयार करायचा, त्याचे ‘डिजिटल मॉडेल’ एक्स रे, सीटी-स्कॅन अशा तंत्रांच्या साहाय्याने बनवले जाते आणि ‘बायोइन्क’ (जिवंत पेशी आणि पॉलिमरपासून बनवलेले द्रव्य) वापरून नवीन अवयव प्रयोगशाळेत तयार करता येतो.
अशा प्रकारे आरोग्य क्षेत्र झपाटय़ाने ‘स्मार्ट’ होताना, या सर्व नवीन उपकरणांना, औषधांना नियंत्रित करणे, त्यांची सुरक्षितता, दुष्परिणाम, उपयुक्तता तपासणे हे मोठे आव्हान नियंत्रकांपुढे आहे. वर उल्लेखलेल्या डिजिटल वस्तू/ औषधे आपल्याकडे अजून तरी थोडय़ा प्रमाणातच दिसतात, पण भविष्यात झपाटय़ाने हे आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला अक्षरश: चहूबाजूंनी वेढलेले असेल अशी परिस्थिती आहे.
‘आरोग्यनामा’ हे सदर लिहायला घेताना विषयांची यादी केली होती. मात्र करोनाच्या आकस्मिक प्रवेशामुळे, आधी ठरवलेले काही विषय बाजूला सारून कोविडसंदर्भात अधिक लिहिले गेले. वेगवेगळ्या विषयांच्या हाताळणीतून आपण आरोग्यसाक्षर व्हावे; पारंपरिक व आधुनिक जीवनशैलीचा योग्य समतोल साधत, उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भर दिला जावा; औषधे घ्यावयास लागलीच, तर मात्र ती डोळसपणे घेतली जावीत असेच सूत्र होते. औषधे आणि वैद्यक व्यवसायासंदर्भात प्रगत देशांतील अनेक चांगल्या पद्धती, धोरणे यांचा विचार आपल्याकडेही व्हावा आणि त्यात पर्यावरणाचा विचार अंगभूत असावा याकडे धोरणकर्त्यांनी लक्ष द्यावे हा आग्रह होता. या लेखात ‘आरोग्यनामा’ला विराम देताना आपणा सर्वाना नवीन वर्ष आनंदाचे आणि उत्तम आरोग्याचे जावो ही सदिच्छा!
लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.
ईमेल : ymghar@yahoo.com