प्रा. मंजिरी घरत
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
डॉक्टरांच्या चिठ्ठीविना, स्वत:च औषधे घेणाऱ्या लोकांना आधी फक्त गूगलची साथ होती; आता ऑनलाइन फार्मसीही आहेत आणि त्यावर नियंत्रणासाठी कायदाच नाही. वाटेल ती औषधं घेऊन आपण स्वत:च्या शरीरावर रासायनिक हल्ला करत आहोत, याचं भानही लोकांना नाही..
‘‘अंकल, द्या ना ‘त्या’ गोळ्या.’’ नवयुवतीच्या या मागणीने फार्मासिस्ट थोडा चक्रावला. ‘‘बेटा, लास्ट वीकमध्ये पण तू या घेतल्या होत्यास ना, आता परत?’’ ‘‘हा मग काय झाले, द्या ना पटकन.’’ तरुणी जास्तच घाईत होती..
०
‘‘मला ओमेप्रॅझॉल दे’’.. ‘‘मला रॅनटॅक’’.. ‘‘मुझे ‘वो’ ५० पॉवर की गोली दो’’.. ‘‘मला ती लाल बाटली’’.. ‘‘दे की दोन बाटल्या’’..
०
प्राणी आणि मनुष्य यांच्यामधील एक महत्त्वाचा फरक म्हणजे मानवाची औषध घेण्याची इच्छा! ही औषधे घेण्याची इच्छा कुठवर जाईल, पुढे पुढे काय होईल हे मानसशास्त्रीयदृष्टय़ा मोठे कुतूहलाचे असेल, असे जॉन हॉपकिन्स मेडिकल केंद्राचे एक संस्थापक सर विलियम ओस्लर, एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस एका सार्वजनिक सभेत म्हणाले होते. तब्येतीस त्रास झाला की प्राणी काही तरी नैसर्गिक उपाय शोधतात, पण माणसाचा कल मात्र शॉर्टकट शोधण्याकडे असतो, तो असतो औषधांचा- असे त्यांना अभिप्रेत असावे. आता औषधे मुबलक मिळण्याचे सोपे मार्ग, धावपळीची जीवनशैली, ‘इन्स्टंट’चा जमाना अशा अनेक कारणांमुळे स्वमनाने औषधे घेण्याकडे (सेल्फ मेडिकेशन) आणि घेतच राहण्याकडे वाढता कल आहे. १९९७ साली सेल्फ मेडिकेशन ३१ टक्के होते ते २०११ मध्ये तब्बल ७१ टक्क्यांवर गेले, असे एका पाहणीत आढळले. ‘पॉप अप अ पिल’ ही मान‘सिक’ता आज सार्वत्रिक आहे.
लक्षणे योग्यपणे ओळखून काही किरकोळ आजारांवर नॉन-प्रिस्क्रिप्शन औषधे (म्हणजे ज्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी लागत नाही, लेबलवर तांबडी रेघ, फ७ आणि लाल बॉक्समधील सूचना नसते ती पॅरासिटामोलसारखी काही औषधे. ती ‘ओव्हर द काऊंटर’ मिळतात म्हणून त्यांना ‘ओटीसी’ म्हणतात) थोडय़ाच अवधीसाठी घेणे, बरे न वाटल्यास वैद्यकीय सल्ला घेणे हे झाले जबाबदार सेल्फ मेडिकेशन. असे सेल्फ मेडिकेशन आपल्याकडे दिसणे कठीण. अमुकतमुकने सांगितले म्हणून, पूर्वी डॉक्टरांनी दिले होते म्हणून, झटपट परिणाम हवेत म्हणून कोणतीही, प्रिस्क्रिप्शन औषधे असोत वा नॉन-प्रिस्क्रिप्शन औषधे- काही जण स्वमनाने घेतात. बरं ती क्वचित घेतली तर ठीक, पण वारंवार घेतच राहण्याची मानसिकता दिसते. ‘गूगल विद्यापीठा’ने डॉक्टर मंडळी हैराण आहेतच; पण आता तर, डॉक्टरांना ‘बायपास’ करत आपल्या लक्षणांना लागू औषध कोणते याचे ‘गूगलन’ करून औषधाचे नाव, इमेज फार्मासिस्टला मोबाइलवर दाखवत काही ग्राहक औषधाचा आग्रह करतात.
औषधांचा सुकाळ, संयमाचा दुष्काळ अशी परिस्थिती असल्याने अॅसिडिटी, अपचनावरची औषधे, वेदनाशामके कित्येक लोक खाऊसारखी खातात. या औषधप्रेमींना ती इतकी अतिपरिचयाची होतात की, ‘अरे इनो, जेलुसिल काय औषधे आहेत का?’ असे एक रुग्ण, फार्मासिस्टने छेडल्यावर उत्स्फूर्तपणे बोलला. रॅनिटायडीन आणि ओमेप्रॅझॉल किंवा तत्सम औषधे अॅसिडिटीसाठी रुग्णांची लाडकीच आहेत. ही औषधे शेडय़ुल ‘एच’, म्हणजे प्रिस्क्रिप्शन औषधे; पण त्यांची ही विक्रीमर्यादा कुणी मनावर घेत नाही. तीच स्थिती वेदनाशामकांची. पॅरासिटामोल आणि अॅस्पिरिन सोडल्यास सर्व पेनकिलर्स ही प्रिस्क्रिप्शन औषधे, पण अनेक लोक ही वर्षांनुवर्षे स्वमनाने घेत राहतात. अॅसिडिटीवरील गोळ्या सतत खाऊन पचनशक्ती तर बिघडतेच, पोटात इन्फेक्शन्स होतात, किडनीवर घातक परिणाम होऊ शकतो. वेदनाशामकांमुळेही किडनी खराब होणे, अॅसिडिटी, अल्सर असे दुष्परिणाम होतात. पोट बिघडले किंवा घसा लाल झाला की डायरेक्ट- ‘पूर्वी कधी तरी लागू पडलेल्या’ अॅन्टिबायोटिकची मागणी कॉमन आहे. झटपट बारीक किंवा पीळदार होण्याच्या घाईत असणाऱ्या तरुण-तरुणी खूपदा स्टिरॉइड्सची इंजेक्शने घे, गोळ्या खा, वेगवेगळ्या पावडर्स खा असे उद्योग करतात आणि तरुण वयातच उच्च रक्तदाब, हाडे पोकळ होणे असे दुष्परिणाम ओढवून घेतात. स्टिरॉइड असलेल्या क्रीम्सचा अति वापर फंगल इन्फेक्शनसाठी, गोरे होण्यासाठी करून कित्येक ग्राहक स्वत:साठी नवीन समस्या निर्माण करतात आणि मग डॉक्टरांकडे खेटे घालतात राहतात.
इमर्जन्सी गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये (उदा. आयपिल, अनवॉण्टेड ७२ वगैरे) हॉर्मोनचा मोठा डोस असतो. इमर्जन्सी म्हणूनच या पिल्स वापरायच्या. पण या गोळ्यांचा ऊठसूट वापर युवा पिढी करते आहे, भन्नाट तरुणाईला याचे काही दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतात हे कळत नाही. कॉलेजे, टय़ूशन क्लासेस, कॉल सेंटर यांच्या आसपासच्या फार्मसीमध्ये तर अशा गोळ्यांची भरपूर मागणी असते. कुणी फार्मासिस्ट समजवायला गेला किंवा त्याने हटकले तर उद्दामपणे उत्तरे मिळतात किंवा दुसऱ्या दुकानाकडे मोर्चा वळवला जातो. या गोळ्यांसाठी प्रिस्क्रिप्शन लागत नाही. परंतु अतिरिक्त रक्तस्राव, हार्मोन-संतुलन बिघडणे किंवा अजूनही काही गंभीर आजार भावी आयुष्यात अशा पिल्स वारंवार घेतल्यामुळे होऊ शकतात, असे अनेक स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात. या पिल्समुळे कंडोमसारखे गर्भनिरोधक वापरले जात नाही, त्यामुळे एड्स, हिपॅटायटिससारखी इन्फेक्शन्स होण्याची शक्यता वाढते हा या गोळ्यांचा आणखी एक वेगळा साइड इफेक्ट.
सिल्डेनाफिल (उदा. व्हायग्रा) आणि आता कॉमन झालेले टॅडालाफिल ही औषधे लैंगिक दुर्बलतेसाठीची प्रिस्क्रिप्शन औषधे. याची महाग असूनही काऊंटरवर मागणी भरपूर असते. नियमाने वागणाऱ्या एखाद्या कडक फार्मासिस्टने दिले नाही तर दुसऱ्या दुकानातून आणून या फार्मासिस्टला दाखवून डिवचण्याचे किंवा हमरीतुमरीवर येण्याचे प्रकार होतात. जर ग्राहकास हृदयविकार असेल, दुसरी औषधे चालू असतील तर अचानक रक्तदाब धोकादायक पातळीवर कमी होणे, तसेच इतर अनेक साइड इफेक्ट्स या गोळ्यांचे आहेत. अशा गोळ्या खाऊन जिवावर बेतल्याच्या केसेसही ऐकू येतात. ही औषधे घेण्याचा कल तरुण वर्गात वाढत आहे ही खूप चिंतेची बाब आहे. जीवनशैली सुधारण्यापेक्षा शॉर्टकट शोधले जात आहेत.
नशेसाठी, सहज प्राप्त नसणाऱ्या आणि महागडय़ा अमली पदार्थापेक्षा, प्रिस्क्रिप्शन औषधांचा शॉर्टकट शोधला जातो. कोडीन किंवा तत्सम औषधी द्रव्य असलेल्या कफ सिरपचा गैरवापर नशेसाठी, झोपेसाठी, ‘फील गुड’साठी सर्वश्रुत आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या सातत्यपूर्ण कारवाईनंतर कफ सिरप्सच्या गैरवापरावर पूर्वीपेक्षा थोडे नियंत्रण आले. काही फार्मसी अशी कफ सिरप ठेवत नाहीत किंवा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देत नाहीत, मात्र काही दुकानांत ते दिले जाते, विशेषत: रात्री उशिरा कफ सिरपचे चाहते येऊन आपला साठा घेऊन जातात.
‘‘आम्ही अँटिबायोटिक्स, झोपेच्या गोळ्या, कफ सिरप अजिबात चिठ्ठीशिवाय देत नाही, पण कुणाकुणाला नाही म्हणायचे? रुग्ण दुसरीकडून औषधे मिळवतोच, द्विधा मन:स्थिती होते. एकंदर या ‘लूज’ वातावरणात सुधारणा व्हायला हवी,’’ ही एका फार्मासिस्टची प्रतिक्रिया बोलकी आहे. आता तर औषधे ‘ऑनलाइन’ मिळतात; त्यामुळे सेल्फ मेडिकेशनला अगदीच पोषक वातावरण आहे. या प्रकारच्या औषधविक्रीसाठी अद्याप कायदे तयार झालेले नाहीत तरीही औषधांची ऑनलाइन विक्री देशात चालू आहे. काही ऑनलाइन वेबसाइट्सवरून गर्भपाताच्या गोळ्यांपासून सारे काही मिळते. वजन कमी करण्यासाठी डाएट पिल्स घेऊन अलीकडे एक तरुणी मृत्यू पावल्याची दु:खद घटना ताजीच आहे.
सर्व आधुनिक औषधांना साइड इफेक्ट्स असतात, हा काही नवीन शोध नाही, औषधे घ्यावी लागतात हे तर आहेच, पण तज्ज्ञ डॉक्टरनी तपासून औषधे लिहून दिली (सर्व डॉक्टरांनी तार्किक प्रिस्क्रिप्शन लिहावे ही अर्थातच अपेक्षा..) तेव्हाच ती घेणे इष्ट.
विकसित देशांत औषधांची कशी वर्गवारी असते, बेजबाबदार सेल्फ मेडिकेशन होऊ नये म्हणून यंत्रणा कशी असते यावर ‘आरोग्यनामा’त पुढे कधी तरी चर्चा करूच; पण तूर्तास इतकी नोंद घ्यायला हरकत नाही की, स्वमनाने औषधांचा मारा करत राहणे म्हणजे शरीरावर केलेला रासायनिक हल्लाच आहे तो थांबवायलाच हवा. औषधांबाबतचा निष्काळजी दृष्टिकोन बदलायला हवा, तसेच आपले कुटुंबीय, तरुण मुले/मुली काही औषधे सारखी आणतात का, ऑनलाइन मागवतात का, कुटुंबातील कुणी सदस्य वैद्यकीय सल्ल्याशिवाय वारंवार कुठली औषधे घेतो का, याबाबत सजग राहायला हवे.
लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.
ईमेल : symghar@yahoo.com