प्रा. मंजिरी घरत

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Babasaheb Ambedkar , RSS , RSS Karad branch,
संघाविषयी आंबेडकरांच्या ‘आपुलकी’चे सर्व दावे संशयास्पद! 
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
17 bogus doctors found in a year annual review meeting of the District Health Department concluded thane news
बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे आव्हान; वर्षभरात १७ बोगस डॉक्टर आढळले, जिल्हा आरोग्य विभागाची वार्षिक आढावा बैठक संपन्न
patients of gastro Sangli, gastro, Drainage water ,
सांगलीत गॅस्ट्रो साथीचे ५० रुग्ण आढळले, पाणी पिण्याच्या जलवाहिनीत ड्रेनेजचे पाणी शिरले
neet pg 2024 percentile reduced to 15 percent
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पात्रता निकष शिथिल, पर्सेंटाईल १५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा राष्ट्रीय परीक्षा मंडळाचा निर्णय
nashik Dialysis center service
नाशिक महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयात आता डायलिसीस केंद्र

चुकूनमाकून करोना घरात शिरलाच तर, ही शक्यता गृहीत धरून आपल्या भागातील फिव्हर क्लिनिक आदींची माहिती हवी- आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याविना मिळवण्याचा प्रयोग नकोच.. हे सांगणारा हा लेखांक कोविडभेटीनंतरचा!

एक सुफी कथा आहे. बगदाद शहराच्या वेशीवर एक फकीर राहात होता. एके रात्री शहरात शिरणाऱ्या एका काळ्याकुट्ट सावलीला त्याने रोखले. शहरात जाण्याचे प्रयोजन विचारले. आपण महामारी असून बगदादमधील केवळ पाचशे लोकांचा बळी घेऊन परत जाणार असे सावली सांगते. यथावकाश महामारीने धुमाकूळ माजवला, तब्बल पाच हजार लोकांचा बळी गेल्यावर मगच महामारी परत जाऊ लागली. तेव्हा फकिराने जाब विचारला, पाचशेऐवजी पाच हजार लोकांना का मारलेस? महामारी म्हणाली, मी ठरल्याप्रमाणे केवळ पाचशे लोकांनाच मारले, पण बाकीचे साडेचार हजार लोक माझ्या धास्तीनेच मृत्यू पावले.

..ही कथा काल्पनिक आहे, यात अतिशयोक्ती आहे, हे कबूल; पण तरीही यातून महामारीच्या काळातील समाजातील भयग्रस्त मानसिकतेचे दर्शन होते. (या कथेचा संदर्भ आरोग्यनामाचे वाचक डॉ. रवीन्द्र बेंबरे यांच्या एका लेखातून घेतला आहे) हा लेख लिहिताना नेहमीप्रमाणे वाचन, तज्ज्ञांशी चर्चा केलीच पण हा मुख्यत: स्वानुभवातून जाणवलेल्या बाबींमधून लिहिला आहे. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे. मनात बिलकूल भयाणू नसून, सर्व काळजी घेऊनही विषाणू मला (आणि घरातील सर्वानाच) भेटायला आलाच. पंधरवडय़ापूर्वीचा आरोग्यनामातील लेख करोनाचा पाहुणचार करतच लिहिला होता. आता करोनामुक्त होत आहे.

कोविड जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन मानवजातीचा खरपूस समाचार घेतोय. आपल्या इथे प्रत्येकाच्या मनात करोना आपल्याही घरावर टकटक करेल की काय अशी स्वाभाविक धास्ती आहे. सर्व काळजी घेऊनही जर चुकूनमाकून करोना घरात शिरलाच तर काय? याचा विचार (रोडमॅप), त्यासाठी नेमकी माहिती आपल्याला असली तर ‘पॉझिटिव्ह’ आल्याच्या भीतीने गाळण उडण्यापेक्षा आवश्यक ती कृती वेळेत होईल. अनेकांना लागण होणारही नाहीये, पण साथ जोरात असताना कुणाला होणार, कुणाला नाही याचे ठाम गणित नाही ना आपण मांडू शकत! म्हणून मला होणारच नाही करोना असा अति-आत्मविश्वास नको आणि ‘नको बुवा त्याचा विचारच करायला’ अशी नकारात्मक, घाबरलेली, पलायनवादी मानसिकताही नको. एक महत्त्वाची बाब म्हणजे ही साथ येऊन आता बरेच महिने झाले आहेत. त्यामुळे या चतुर विषाणूला आपण पूर्वीपेक्षा तुलनेने अधिक ओळखतो, त्याचे सारे उद्योग अजूनही १०० टक्के माहीत नाहीत, पण कोणते उपचार लागू होतात याचे ज्ञान आता अधिक अवगत झाले आहे. टेस्टिंगची सुविधा वाढली आहे. शासन, प्रशासन, आरोग्य व्यावसायिक यांनी अक्षरश: दिवसरात्र राबून कोविडचा सामना करण्यासाठी व्यवस्था निर्माण केली आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वास आपणही बाळगला पाहिजे.

लक्षणविरहित, अतिसौम्य, सौम्य, मध्यम तीव्र, तीव्र अशी वर्गवारी कोविड रुग्णाची केली जाते. साधारण ८० टक्के (हो ऐंशी टक्के!) रुग्णांमध्ये अतिसौम्य लक्षणे दिसतात किंवा लक्षणे दिसतही नाहीत. तुमच्याही आसपास असे सहजरीत्या करोनायुक्त ते करोनामुक्त झालेले लोक तुम्ही पाहिले असतील. मात्र काही थोडय़ा लोकांमध्ये आजाराला गंभीर वळण लागते, त्यातून काहीजण पूर्ण बरे होतात पण काहींचे मृत्यू होतात. वयस्कर व्यक्ती, जुनाट आजार असलेले आणि रुग्णालयात वेळेवर दाखल न झालेल्यांमध्ये मुख्यत: मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. कोविडमध्ये योग्य वेळेत कृती खूप महत्त्वाच्या आहेत. टेस्टिंगची केंद्रे,  विभागवार आरोग्य अधिकारी, फिव्हर क्लिनिक, शासनाचे नियम, अ‍ॅम्ब्युलन्स नंबर यांची माहिती असणे हितावह. ज्यांना मधुमेह, अतिरक्तदाब आहे त्यांनी ते नियंत्रणात आहेत ना यावर नजर ठेवणे गरजेचे आहे

ताप, घशात खवखव, खोकला, सर्दी, थकवा, स्नायूंत वेदना, श्वास घ्यायला त्रास, धाप लागणे, चव/वास जाणे, पोट बिघडणे किंवा इतर काही तक्रारी चालू झाल्यास त्वरित सतर्क होणे महत्त्वाचे. ही लक्षणे इतर कारणानेही असू शकतात; पण कोविडही असू शकतो याचे भान ठेवून लगोलग पावले उचलणे योग्य. लक्षणे असलेल्या व्यक्तीने स्वत:हून किंवा इतरांनी त्यास समजावून घरातच विलग होणे, रुग्णाईताच्या वस्तू, कपडे वेगळे ठेवणे, ते जंतुनाशक घालून वेगळे धुणे, त्या व्यक्तीने, त्याची काळजी घेणाऱ्या सदस्याने मास्क वापरणे हे सगळे त्वरित अमलात आणणे आवश्यक असते.

फार्मसीमधून औषधे आणत राहाणे, स्वमनाने वेगवेगळी अँटिबायोटिक्स वापरणे, असे अजिबात न करता त्वरित फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेणे किंवा शासनाच्या ‘फिव्हर क्लिनिक’ला जाणे आवश्यक. डॉक्टरांनी सांगितल्यास वेळ न दवडता, कोविड टेस्ट करायची. घशातील /नाकातील द्राव टेस्टिंगसाठी घेतात, काही त्रास होत नाही. रिपोर्टला एक-दोन दिवस लागू शकतात. शारीरिक तापमान, ऑक्सिजन पातळी, यांवर नजर ठेवायची. घरात थर्मोमीटर बहुधा असतो, पण पल्स ऑक्सिमीटर (केमिस्टच्या दुकानात मिळतो) आणल्यास ऑक्सिजनची पातळी मोजता येते. सहसा ऑक्सिजन पातळी ९५ ते ९९ दरम्यान असते, ९४पेक्षा खाली जात असेल (याची कोविडखेरीज इतर कारणेही असू शकतात) तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यायचा. असे दिसून आलेय की जे मधुमेही नाहीत त्यांचीही रक्त-शर्करा कोविड संसर्ग झाल्यावर वाढू शकते, ही वाढलेली साखर गुंतागुंत निर्माण करते. म्हणून रक्त-शर्करेवर नजर ठेवली (ग्लुकोमीटर आणून किंवा लॅबमध्ये टेस्ट करून) तर उत्तम. जर रुग्णाची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलीच तर आपल्या विभागातील आरोग्य अधिकाऱ्यास (तसेच ऑफिस, सोसायटी वगैरेंना) त्वरित माहिती देणे. घरात लक्षणविरहित सदस्य असू शकतो, नेमके कुणी कुणाला इन्फेक्शन दिले ते कळत नाही, म्हणून घरातील सर्वाची टेस्ट केली तर उत्तम. निकट संपर्कातील अन्य व्यक्तींनाही पुढील काही दिवसांत लक्षणे नाहीत ना, असल्यास त्यांनाही टेस्ट करायला सांगायचे. झटपट रिझल्ट देणारी अँटिजेन टेस्टही नुकतीच चालू झाली आहे.

कोविड ही एकेकटय़ाची लढाई असते, कुटुंब, मित्रमंडळींनी सहवेदना, सकारात्मकता  दाखवत (तेही फक्त फोन/मेसेजने शक्य) रुग्णाचे मनोबल उच्च ठेवण्याचा प्रयत्न करणे जरुरीचे असते. लक्षणे अतिसौम्य/ लक्षणविरहित असल्यास घरी सोय असल्यास घरीच विलगीकरणाचा पर्याय निवडता येतो. या काळात नीट स्वपरीक्षण करत राहणे, शासकीय सूचना पाळणे आवश्यक. ‘हॅपी हायपॉक्सिया’ (६ मिनिटे चालून ऑक्सिजन पातळी कमी होते का पाहाणे) टेस्टविषयी डॉक्टरांकडून जाणून घेणे. बाकी रुग्णांनी रुग्णालयात वैद्यकीय निरीक्षणाखाली असणे हे सुरक्षित आहे. कारण तब्येतीत अचानक अनपेक्षित चढउतार होऊ शकतात. त्यावर त्वरित उपचार गरजेचे असतात. काही रुग्णांमध्ये इन्फेक्शनमुळे रोगप्रतिकारशक्ती भरकटून दाहक रसायनांचे वादळ (सायटोकाईन स्टॉर्म) आतल्याआत चालू होते, ऑक्सिजन पातळी कमी होऊ लागते. या वादळात फुफ्फुसांना सूज येते, हृदयावर परिणाम होतो, रक्तात गुठळ्या होऊ लागतात, रुग्ण झपाटय़ाने गंभीर अवस्थेत जातो, व्हेंटिलेटर लागू शकतो. पण दिलासा देणारी बाब म्हणजे दाहक रसायने तयार होत आहेत का याचा अंदाज रक्त तपासणीने घेता येतो. वेळीच उपचार सुरू करता येतात. परत मुद्दा हाच की कोविडमध्ये कोणताही विलंब सोपे काम अवघड करतो. काही रुग्ण खूप दिवस ताप वगैरे अंगावर काढतात, टेस्ट करायला घाबरतात..मग डॉक्टरांना त्यांचा जीव वाचवणे कठीण होते.

सध्या रेम्डेसिविर आणि टॉसिलीझूमाब ही औषधे चर्चेत आहेत. त्यांची टंचाई आहे. रासायनिक वादळ चालू झालेल्या गंभीर रुग्णांसाठी(च) टॉसिलीझूमाब हे वरदान आहे. रेम्डेसिविर हे ‘अँटिव्हायरल’ आहे. मात्र ही औषधे प्रत्येक करोना पॉझिटिव्हला देण्याची औषधे नव्हेत. ती कुणाला द्यावीत यासाठी सुस्पष्ट मार्गर्दर्शक तत्त्वे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि राज्य शासनाने दिलेली आहेत. ही आधीच महागडी औषधे काळाबाजारात चढय़ा भावाने विकणाऱ्यांना मुंबईत अन्न-औषध प्रशासनाने (एफडीए) पकडले. गुजरातमध्ये तर नकली इंजेक्शन्सचा माल डॉक्टरांच्या सावधगिरीमुळे पकडला गेला. ही नफेखोर मनोवृत्ती चीड आणणारी आहे. असे लोक मूठभर असतात, पण त्यामुळे सर्व व्यवस्था वेठीस धरली जाते. ही औषधे तुमच्या ओळखीने कुठे मिळतील का असे पॅनिक कॉल्स गेल्या १५ दिवसांत किती तरी आले. रुग्णाच्या नातेवाइकांनी ‘येनकेनमार्गाने’ ही औषधे न घेता केवळ अधिकृत मार्गानेच घ्यावीत. जर रुग्ण वेळीच अ‍ॅडमिट झालेला असेल तर ‘रासायनिक वादळ’ थोपवायला जुने अगदी स्वस्त, डेक्सामिथाझोनसारखे औषधही उपयुक्त ठरत असल्याने पुढचा धोका, खर्च टळू शकतो .

सारांश, कोविड बहुतांश लोकांमध्ये फार त्रासदायक ठरत नाही, पण काही थोडय़ांमध्ये मात्र धोकादायक ठरतो. अवास्तव भीती न बाळगता योग्य माहिती, झटपट कृती हा धोकाही कमी करू शकते!

लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.

ईमेल : symghar@yahoo.com

Story img Loader