जगत असताना जगाच्या आसक्तीत न जगता, जगाविषयीचा मोह आणि भ्रम यांचं ओझं घेऊन न जगता आत्मतृप्तीनं जगता येणं, हीच मुक्ती आहे. ही स्थिती सद्गुरुशिवाय प्राप्त होणं आणि टिकणं केवळ अशक्य. एकानं म्हंटलंय की, ‘पाल्हाळ न लावता तुम्हाला सत्य गवसलं असेल तर ते सांगा’. ते सत्य गवसणं म्हणजेच मुक्त होणंच की. ज्याला ते गवसलं आहे त्याची लिहायची, वाचायची, बोलायची, ऐकायची ओढ कशाला उरेल? ‘कोटय़धीश कसे व्हाल’ हे पुस्तक लिहिणारा कोटय़धीश नसतोच! नाहीतर पैशाचा उपभोग घ्यायचं सोडून तो पुस्तक कशाला लिहिता?  तेव्हा ज्याला सत्य गवसलं तो सत्यस्वरूपच होऊन जातो. आपली ती स्थिती आहे की नाही, याचं मोजमाप करून देणारं कबीरांचं एक भजन आहे. ते म्हणतात, मन मस्त हुआ तब क्यों बोले।। मन मुक्त झालं, मस्त झालं तर बोलणंच सरेल की. त्या मस्तीत, त्या नशेत ते सदोदित मग्न राहील. शब्दांचं कामच संपेल. हीरा पायो गाँठ गँठियायो, बार बार बाको क्यों खोले।। हीरा मिळाला आणि तो एका थैलीत घट्ट बांधून ठेवला आता क्षणोक्षणी ती थैली उघडून कोण कशाला पाहील? हंसा पाये मान सरोवर, ताल तलैया क्यों डोले।।  एकदा मानसरोवरात डुंबायला लागलं की नदीनाल्यांत डुंबायची आस मनात का राहील? तेरा साहेब है घट माहीं, बाहर नैना क्यों खोले।। तो परमेश्वर अंतरात आहे, त्याचं दर्शन झालं मग त्याला अंतर देऊन जगाकडे कोण कशाला पाहील? याच प्रश्नांचा सरळ अर्थ असा की  जर बोलायची हौस आहे तर मन मस्त झालेलं नाही, जर मिळवत राहाण्याची आस आहे तोवर खरी प्राप्ती झालेली नाही, जोवर परनिंदा आणि आत्मस्तुतीच्या डबक्यात डुंबण्यात आनंद वाटतो तोवर आत्मतृप्तीत बुडालेलो नाही, जोवर डोळे जगाच्या आशेने जगाकडे लागले आहेत तोवर अंतर्मुख होणं साधलेलं नाही. जो आत्मानंदात मग्न आहे त्याची स्थिती दाखविणारं कबीरांचं भजन पाहून आपण कबीरविषयक चिंतनाचा समारोप करणार आहोत. हे भजन असं आहे-
हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या।
रहें आजाद या जग में, हमें दुनिया से यारी क्या ।। टेक।।
जो बिछुडम्े हैं पियारे से, भटकते दर-बदर फिरते।
हमारा यार है हम में, हमन को इन्तजारी क्या।। १।।
खलक सब नाम अपने को, बहुत कर सिर पटकता है।
हमन गुरु ज्ञान आलिम हैं, हमन को नामदारी क्या।। २।।
न पल बिछुडम्े पिया हम से, न हम बिछुडम् पियारे से।
हो एसी लव लगी हरदम, हमन को बेकरारी क्या।।३।।
कबीरा इश्क का माता, दुई को दूर कर दिल से।
ये चलना राह नाजुक है, हमन शिर बोझ भारी क्या।।४।।

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा