आपल्या जगण्यात आपल्याला निश्चिंती हवी असते. आयुष्य चिंतामुक्त, सुखाचं सरावं आणि निर्भयतेनं या जगात आपल्याला वावरता यावं, ही आपली खरी ओढ असते. संत आणि सत्पुरुष आपल्याला तसे जगताना दिसतात. त्यांच्या आयुष्यातही ‘अडीअडचणी’ आणि ‘संकटं’ आपल्याला दिसतात तरी त्यांचं जगणं निर्भयतेचं असतं. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानच विलसत असतं. त्यांच्यावर ईश्वराची कृपा आहे, त्यांना सिद्धी प्राप्त आहेत म्हणून ते निर्भय आणि निश्चिंत आहेत, या समजातून आणि तशी निर्भयता आणि निश्चिंती त्यांच्या कृपेनं आपल्याही वाटय़ाला यावी, या हेतूनं आपण संतसत्पुरुषांकडे जातो. याच हेतूनं आपण शिर्डी-शेगाव सारख्या स्थानांना जातो, साईबाबांपासून स्वामी समर्थापर्यंत अनेक साक्षात्कारी विभूतींना मानतो. आपला हेतू आध्यात्मिक असतोच असं नाही किंवा वरकरणी आपला हेतू आध्यात्मिक असला तरी आपली खरी सुप्त इच्छा आपलं भौतिक जीवन सुखाचं व्हावं म्हणजे आपल्याला जगण्यात निश्चिंती आणि समाधान मिळेल, हीच असते. कोणत्याही हेतूनं आपण त्यांच्याकडे गेलो तरी ते माझ्या हिताचं जे आहे तेच करतात. सत्यमार्गदर्शकाकडे आपण जातो तेव्हा आपली स्थिती काय असते आणि त्यांची काय असते? श्रीनिसर्गदत्त महाराज गिरगावात राहात. त्यांच्या दर्शनासाठी अनेक पाश्चात्य लोक येत. त्यांची प्रश्नोत्तरं मोठी गमतीची असत. प्रश्न विचारला जाई इंग्रजीत, महाराज उत्तर देत मराठीत आणि अय्यर नावाचे एक गृहस्थ तात्काळ त्याचे इंग्रजी भाषांतर करी! त्यात एका पाश्चात्याने फार मार्मिक प्रश्न विचारला. त्यानं विचारलं, महाराज, आपण माझ्यासमोर बसला आहात आणि मी आपल्या पायापाशी बसलो आहे. आपल्या दोघांमध्ये मूलत: कोणता फरक आहे?’ विचारणाऱ्यानं सहज म्हणून विचारला असला तरी प्रश्न फार खोल आहे. श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणाले, मूलत: काहीच फरक नाही. त्यावर तो म्हणाला, ‘फरक असलाच पाहिजे. मी तुमच्याकडे येतो तुम्ही काही माझ्याकडे येत नाही!’ वरकरणी हे म्हणणंसुद्धा बरोबर वाटतं पण खरी मेख आपल्या लक्षात येत नाही. ‘आम्ही वैकुंठवासी आलो याचि कारणासी,’ असं तुकोबांनी एका अभंगात लिहिलंय. आपला कायमचा पत्ता सांगितलाय त्यांनी. तेव्हा जो साक्षात्कारी आहे तो अशा ठिकाणहून येतो जिथे आपण पोहोचू शकत नाही. पण आपण तिथे पोहोचावं यासाठीच तो आपल्याला वाट दाखवायला तर आला असतो! साईबाबांना शिर्डीत, गजाननमहाराजांना शेगावात, श्रीब्रह्मचैतन्यांना गोंदवल्यात, स्वामी स्वरूपानंदांना पावसमध्ये, श्रीसमर्थाना अक्कलकोटी येण्याची काय गरज होती? आपलं जगणं आनंदाचं व्हावं, याचसाठी तर ते आपल्याजवळ आले! तेव्हा ‘मी तुमच्याकडे येतो तुम्ही काही येत नाही,’ हे खरं वाटलं तरी खरं नसतं. त्यांच्या येण्यामागचं गूढ आपण जाणत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा