कुशाभाऊंबद्दल बुवा आणि दादासाहेब जे म्हणाले, ते ऐकून हृदयेंद्रचं कुतूहल चाळवलं गेलं होतं. कुशाभाऊंच्या जीवनाबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता त्याच्या मनात आली. त्यानं तसं बोलूनही दाखवलं. त्यावर हसत अवघडून कुशाभाऊ म्हणाले..
कुशाभाऊ – अहो माझा बा खरा चळवळीतला. त्यांच्या काळी हे शाहिरी जलसे फार जोरात होते. माय सांगायची. माझा जल्म झाला ना तेव्हा बी बा ‘शेतकरी परिषदे’साठी दौऱ्यावर होता. मग कलापथक आलं. अण्णांच्या पोवाडय़ांनी गावंच्या गावं दुमदुमली.. ते सारे संस्कार आपसूक झाले.. बाला येड लाल ताऱ्याचं तर मायला काळ्या विठ्ठलाचं! तिच्या रुपानं जणू सात्त्विकताच जल्माला आलेली.. तिचा घरातला वावर, शेतातलं खपणं, गायीगुरांशी प्रेमानं बोलणं सारी कशी भक्तीच होती बघा.. पहाटे कामधामं आटोपली की शेतावर जाण्याआधी देवाच्या तसबिरींना लय आवडीनं फुलमाळा घालायची, हात जोडायची.. आतल्या खोलीत एका कपाटाला मार्क्सबाबाचं पोष्टर चिकटलेलं होतं. त्याला बी हात जोडायची. मी हासून एकदा म्हटलं, माये ह्य़ो काही देव नाही! तर म्हनली, ‘‘काय का असना, तुझ्या बाची दारु तर सुटली याच्या नादानं!’’ त्या नादापायी झालं काय की अण्णा भाऊ, अमर शेख, गवाणकर यांच्या पोवाडय़ांतले सूर ओसरीवर घुमायचे तर माजघरात तुकारामबुवा, माउली, नाथांच्या अभंगातले सूर दरवळायचे..
हृदयेंद्र – पण दोन्हींतलं तुम्हाला काय आवडायचं?
कुशाभाऊ – पंचपक्वान्नातली पाचही का न आवडावी? (सर्वानाच हसू येतं) अहो जे चांगलं आहे ते चांगलंच असतं नवं? ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी’ हे शब्द शेतकऱ्याच्याच काळजाला स्पर्श करणारच.. मग हेबी ऐका.. (जोमात ताल धरत गाऊ लागतात)
कणसं मक्याची हुरडय़ाला आली
बसली हळद लाजून खाली
तूर शेंगांनं आपल्या न्हाली
गहू खपलीचा लहरा मारी
भुईमूग रोवून बसला आरी
आला रंगात राळा माझा
फुलं उधळितो कारळा तुझा
साऱ्या धान्याचा शाळू राजा
ऊस वाऱ्यावर डोलतोय भारी
सर्जा-दख्खनला दे ललकारी।।
हृदयेंद्र – वा! भाऊ या वयातही खणखणीत आवाज आहे हो तुमचा!
कुशाभाऊ – अण्णा भाऊंनी प्रत्येक पिकलेकराचं इतकं मायेनं वर्णन केलंय.. का आवडायचं नाही ते शेतकऱ्याला? बरं जेमतेम मराठी वाचता येणाऱ्या या माणसानं लेबर कॅम्पातल्या झोपडपट्टीत राहून पंधरा वर्षांत चाळीस कादंबऱ्या, दोन-तीन नाटकं, शंभर गोष्टी, अकरा वगनाटय़ं लिहिली.. पण मराठी कादंबरीच्या इतिहासात त्यांचं नावबी न्हाई! आताशा संतांना गौण ठरवणारं लिहितात ना लोक? त्यामागेबी हीच बोच आहे. बहुतेक संत बहुजन समाजातले. त्यांनी ज्ञान सांगावं हे कसं सहन होणार? मग काय त्यांची कशी कुवतच नव्हती, हेच पालुपद चालवायचं.. ज्यानं-त्यानं मापात रहावं, हा हेतू..
दादासाहेब – (हसत) कुशा तुझा वर्गसंघर्ष इथे आणू नकोस बाबा.. (गप्पांना नको ते टोकदार वळण लागणार, ही भीती हृदयेंद्रच्या मनालाही शिवली होती, दादासाहेबांच्या उद्गारांनी त्याला हायसं वाटलं)
कुशाभाऊ – आता वर्गसंघर्षांसाठी तरी वर्ग उरलाच आहे कुठे? सगळे एकाच वर्गात आहेत.. आहे रे, होणारे रे, मिळणारे रे! नाही रे तर कुणाच्या लेखीच नाही रे!
ज्ञानेंद्र – (संकोचून) भाऊ क्षमा करा.. पण आमच्या चर्चेत राजकारणाला स्पर्श करायचा नाही, असा एक अलिखित नियम आहे..
हृदयेंद्र – भाऊ बाकीच्या गोष्टी राहू देत.. ज्याचं त्याला लखलाभ.. इतके चांगले अभंग सोडून या चर्चेनं आपली जीभ का मलीन करायची?
कुशाभाऊ – अगदी माय पण हेच म्हणायची बघा! तरी जे एवढय़ा वर्षांत साधलं नाही ते आता कसं साधावं हो? आणि मला सांगा, या सगळ्या गोष्टीं न पाहाता डोळ्यावर कातडं ओढून घ्यायचं तर मग.. ऐकावे विठ्ठल धुरे। विनंती माझी हो सत्वरें।। करी संसाराची बोहरी। इतकेुं मागतों श्रीहरी।। यातली उद्वेग शमल्यानंतरची धीरवीर स्थिती समजत्ये का हो?
चैतन्य प्रेम
११३. निर्वाणीचं मागणं
कुशाभाऊंबद्दल बुवा आणि दादासाहेब जे म्हणाले, ते ऐकून हृदयेंद्रचं कुतूहल चाळवलं गेलं होतं. कुशाभाऊंच्या जीवनाबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता त्याच्या मनात आली.
First published on: 10-06-2015 at 01:15 IST
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhangdhara by loksatta newspaper